‘विठाई’ बसवरील श्री विठ्ठलाचे चित्र बसच्या आतील बाजूने लावण्यात यावे ! – राष्ट्रीय वारकरी परिषदेची परिवहनमंत्र्यांकडे मागणी
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात आरंभ करण्यात आलेली ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळा’ची ‘विठाई’ बससेवा लोकप्रिय झाली आणि तिचा राज्यभरात विस्तार करण्यात आला. श्री विठुमाऊलीच्या नावाने आरंभ करण्यात आलेली ही बससेवा स्तुत्यच असून या माध्यमातून सरकारने वारकर्यांच्या श्रद्धांचा मान राखला आहे; मात्र सध्या ‘विठाई’च्या काही बसगाड्यांच्या बाहेरील भागात असलेल्या श्री विठ्ठलाच्या चित्रावर थुंकल्याचे डाग, चिखलाचे डाग, तसेच धूळ दिसून येत आहे. श्री विठ्ठलाची ही विटंबना रोखण्यासाठी बसच्या बाहेरील भागात असलेले विठुरायाचे चित्र बसच्या आतील बाजूला लावण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ जुलै या दिवशी याच मागणीचे निवेदन परिवहनमंत्र्यांना संगणकीय पत्राद्वारे पाठवले होते. त्याचप्रमाणे कर्नाटक येथील राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्ल्याळीकर आणि नगर येथील ह.भ.प. वेणुनाथ महाराज विखे यांनीही संगणकीय पत्राद्वारे मुख्यमंत्री अन् परिवहनमंत्री यांना निवेदन पाठवले आहे.