गुन्हेगारी रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणार ! – मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, नगर
नगर जिल्ह्यामध्ये राज्यात सर्वांत जास्त गुन्हेगारीच्या घटना
गुन्हेगारी अल्प करण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेसह गुन्हेगारांवर तात्काळ आणि कडक कारवाईही करायला हवी !
राहुरी (जिल्हा नगर) – गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा उपयुक्त ठरेल. तसेच नागरिकांचा सहभाग वाढवण्यात ही योजना महत्त्वाची ठरणार असून कमी कालावधीत गावभर संदेश पोचणार आहे. त्यामुळे ही यंत्रणा प्रत्येक गावात वापरण्याची आवश्यकता आहे. जिल्हाभर ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली जाईल, असे मत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केले. राहुरी येथील व्यंकटेश मंगल कार्यालयात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठीच्या प्रशिक्षणवर्गाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के. गोर्डे यांसह पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, तालुक्यातील पोलीस पाटील, तलाठी, सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.
मनोज पाटील पुढे म्हणाले की, राज्यात सर्वांत जास्त गुन्हेगारीच्या घटना नगर जिल्ह्यामध्ये घडल्या आहेत. गतवर्षी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ४२ सहस्र गुन्ह्यांची, तर पुणे जिल्ह्यात २३ सहस्र गुन्ह्यांची नोंद झाली आहे.