दोडामार्ग तालुक्यात राज्यमार्गांची दुरवस्था : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
|
दोडामार्ग – दोडामार्ग ते वीजघर आणि बांदा ते आयी या २ राज्यमार्गांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले आहेत. शिवाय मार्गांच्या दुतर्फा झाडेझुडपे वाढली आहेत. काही ठिकाणी रस्त्यांना बाजूपट्टी (रस्ता बाजूच्या भूमीशी मिळवून घेणे) नाही, तर जेथे आहेत, त्या पूर्णत: खचल्या आहेत. त्यामुळे या मार्गांवरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. पावसामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांची स्थिती अशीच झालेली आहे. (लाखो रुपये खर्च करूनही प्रत्येक वर्षी रस्त्यांची दुरवस्था होते, याचा अर्थ हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, असा होता. त्यामुळे याला उत्तरदायी असलेल्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे ! – संपादक)
बांदा ते आयी मार्गावर काही ठिकाणी जलवाहिनी टाकण्याचे काम चालू आहे. हे काम करताना बाजूपट्टीसह काही ठिकाणी रस्ताही खोदला आहे; मात्र पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करून हा रस्ता सुस्थितीत करणे आवश्यक होते; परंतु तसे झाले नाही. तालुक्यात मांगेली येथे धबधबा आहे, तसेच तिलारी हे आंतरराज्य धरण आहे. या पर्यटनस्थळांसह गोवा राज्यात जाणारे पर्यटक आणि वाहनचालक यांना याच राज्यमार्गांचा वापर करावा लागतो. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, तेलंगाणा या राज्यांतील पर्यटकांना गोवा राज्यात जाण्यासाठी वीजघर-दोडामार्ग हा रस्ता जवळचा आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ कायम असते. दोडामार्ग ते वीजघर आणि बांदा ते आयी हे रस्ते वळणावळणाचे आहेत. त्यातच रस्त्यांवर आता चिखल, अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, वाढलेली झुडपे यांमुळे वाहन चालवणे कठीण झाले आहे.
या रस्त्यांच्या कामाविषयी सातत्याने आवाज उठवला जाऊनही त्यांची कामे का होत नाहीत ? सार्वजनिक बांधकाम विभाग ही कामे का करत नाही ? असे अनेक प्रश्न येथील जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत.