गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस : सलग ६ व्या दिवशी जनजीवन विस्कळीत
पणजी, १८ जुलै (वार्ता.) – हवामान विभागाने १८ जुलै या दिवशी राज्यात अतीमुसळधार पाऊस पडणार असल्याची (‘रेड अॅलर्ट’) चेतावणी दिली होती आणि यानुसार गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे सलग ६ दिवस राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक ठिकाणच्या सखल भागातील रस्ते आणि भूभाग पाण्याखालीच आहे. पणजी शहरात अनेक ठिकाणी रस्ते अजूनही पाण्याखाली आहेत. राज्यातील नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. अंजुना धरणाची पाण्याची पातळी ८६.०३ मीटर झाली आहे. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ९३ मीटर आहे.
हवामान विभागाने १९ जुलै या दिवशीही राज्यातील विविध भागांत अतीमुसळधार पाऊस पडण्याची (‘रेड अॅलर्ट’), तर २० ते २२ जुलै या कालावधीत मुसळधार पाऊस पडण्याची (‘ऑरेंज अॅलर्ट’) चेतावणी दिली आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गोव्यात पुढील आठवडाभर मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
हणजुणे, कायसूव आणि आजगाव भागांत ६ मासांपूर्वी केलेले हॉटमिक्स डांबरीकरण पहिल्या पावसात उखडले
हणजुणे, कायसूव आणि आजगाव भागांतील रस्त्यांची स्थिती दुर्दशा झाली आहे. येथील रस्त्यांचे ६ मासांपूर्वी हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आले होते; मात्र पावसामुळे अनेक ठिकाणचे डांबरीकरण वाहून गेल्याने रस्ते खड्डेमय झाले आहेत. रस्त्यांच्या बाजूंची गटारे तुंबल्याने रस्त्यावर पाणी साचून रहात आहे, तसेच येथे अपघातातही वाढ झाली आहे. रस्त्याच्या खराब स्थितीमुळे लोकांकडून सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.