सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ऑगस्टला ‘राष्ट्रीय लोक न्यायालया’चे आयोजन

तडजोडीने सोडवण्यासाठी ठेवण्यात आली आहेत २ सहस्र ३३४ प्रकरणे

नागरिकांनी लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा

सिंधुदुर्ग – जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने १ ऑगस्ट २०२१ या दिवशी ‘राष्ट्रीय लोक न्यायालया’चे (अदालतीचे) आयोजन करण्यात आले आहे. या लोक न्यायालयात न्यायालयाकडे प्रलंबित असलेली २ सहस्र ३३४ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. तरी जिल्ह्यातील (पक्षकारांनी) नागरिकांनी या लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश डी.बी. म्हालटकर आणि जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता  राजेंद्र रावराणे यांनी पत्रकार परिषदेत केले.
या वेळी अधिवक्ता राजेंद्र रावराणे यांनी सांगितले की, गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे न्यायालयाचे कामकाज पूर्ण क्षमतेने करता आले नाही. त्यामुळे न्यायालयात मोठ्या प्रमाणात विविध प्रकरणे प्रलंबित आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात दळणवळण बंदी लागू करण्यात आल्याने न्यायालयाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणातील पक्षकारांना प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित रहाता आले नाही. ही अडचण लक्षात घेऊन आता लोक न्यायालयाच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणे सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीने मिटवता यावीत, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा, यासाठीच जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक न्यायालयाचे (अदालतीचे) आयोजन करण्यात आले आहे. या लोक न्यायालयात संबंधित पक्षकारांना प्रत्यक्ष उपस्थित राहून अथवा ‘ऑनलाइन’ पद्धतीने सहभागी होऊन आपले म्हणणे मांडता येणार आहे.

न्यायाधीश म्हालटकर म्हणाले की, प्रलंबित राहिलेली प्रकरणे लोक न्यायालयाच्या माध्यमातून चर्चेतून सोडवण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित पक्षकारांनी सहकार्य करण्याच्या भूमिकेत उपस्थित रहावे.