भुईबावडा घाटात कोसळलेली दरड हटवल्याने एकेरी वाहतूक चालू
सिंधुदुर्ग – १८ जुलैला सकाळी मुसळधार पडलेल्या पावसामुळे वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटात पुन्हा दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती; मात्र पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या पथकाने दरड हटवल्यानंतर दुपारी एकेरी वाहतूक चालू करण्यात आली. यापूर्वी करूळ घाटाचा काही भाग कोसळल्याने हा मार्ग दुरुस्तीच्या कामासाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक भुईबावडा घाटमार्गे वळवण्यात आली होती. या भुईबावडा घाटात २ दिवसांपूर्वी दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक चालू ठेवण्यात आली होती; मात्र १८ जुलैला पूर्ण रस्त्यावरच दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना जोडणारा करूळ घाट सध्या बंद आहे, तर भुईबावडा घाटात अधुनमधून दरड कोसळत असल्याने वाहनचालक आणि प्रवासी यांची गैरसोय होत आहे.