अमेरिकी सैन्याची अफगाणिस्तानमधून माघार आणि भारताची सुरक्षा !
१. अमेरिका अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानकडून भारतात आतंकवाद पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्याने भारताच्या अडचणी वाढणार असणे
‘नोव्हेंबर २००१ मध्ये अमेरिकेवर आतंकवादी आक्रमण झाले होते. त्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांच्या विरोधात युद्ध पुकारले होते. त्यामुळे गेली २० वर्षे अमेरिकेचे सैन्य तेथे तैनात होते. आता अमेरिकेने सैन्याला माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. एवढ्या वर्षांमध्ये अमेरिकेने तेथील सैन्यासाठी प्रचंड प्रमाणात व्यय केला. त्यांचे अडीच सहस्रांहून अधिक सैनिकही तेथे या काळात ठार झाले.
‘सगळ्या जगाचे रक्षण आम्हीच का करावे ?’, असा अमेरिकेचा विचार आहे. अमेरिका सप्टेंबरमध्ये अफगाणिस्तानमधून बाहेर पडेल. ‘तेथील लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन राज्य करावे; पण इसिस किंवा आंतरराष्ट्रीय आतंकवादी गट यांना येथे थारा देऊ नये’, असे अमेरिका तालिबानला सांगण्याचा प्रयत्न करेल. असे असले, तरी तालिबान अमेरिकेचे ऐकणार नाही. इतक्या वर्षांमध्ये अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तपात झाला आहे. तेथे पश्तुन, ताजिक, उज्बेकी आणि हजारा आदी जमाती आहेत. त्यांना एका गटाने नियंत्रित करणे कठीण आहे. सध्या अफगाणिस्तानच्या अनुमाने ६० टक्के भूभागावर तालिबानचे नियंत्रण आहे, तर २५ ते ३० टक्के भूभागावर अफगाणी सरकारचे नियंत्रण आहे. ‘अमेरिका जेव्हा तेथून जाईल, तेव्हा अफगाणी सैन्य देशाला नियंत्रित करू शकेल का ?’, हे काळच सांगेल.
थोडक्यात, अफगाणिस्तानला कुणी समजूच शकले नाही. अफगाणिस्तानवर यापूर्वी ब्रिटन, पूर्वीचा सोवियत संघ आणि अमेरिका या ३ महाशक्तींनी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता; परंतु कुणालाच यश मिळाले नाही. अमेरिकेच्या हातीही काहीच लागले नाही. अमेरिका अफगाणिस्तानमधून काढता पाय घेत असल्याने पाकिस्तानला आनंद झाला आहे. अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या मते, अमेरिका गेल्यावर तेथे तालिबानचे राज्य येईल. पाकिस्तान त्याचा लाभ उठवेल आणि तो भारतात आतंकवाद पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे भारताच्या अडचणी वाढणार आहेत.
२. अमेरिकेच्या अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याच्या दृष्टीने भारताने सतर्क रहाणे आवश्यक !
या पार्श्वभूमीवर भारताने अमेरिकेला विनंती करायला हवी की, तेथून बाहेर पडल्यानंतरही ड्रोन्स आणि जहाजे यांच्या माध्यमातून अमेरिकेने अफगाणिस्तानच्या सैन्याला साहाय्य करणे चालू ठेवावे. तसे केल्यास त्यांना तालिबानच्या विरोधात लढण्यासाठी बळ मिळेल आणि अफगाणिस्तान आतंकवाद्यांसाठी स्वर्ग होणार नाही. भारतीय सैन्य तालिबानी आतंकवाद्यांच्या विरोधात लढेल; पण त्यात मोठ्या प्रमाणात रक्तपात होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानमधून बाहेर पडल्यानंतर अमेरिका त्याची शक्ती चीनच्या विरोधात लावणार असून तो दक्षिण चिनी समुद्रावर लक्ष केंद्रित करील.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.