वारकरी संप्रदाय, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने पुणे येथे आंदोलन !
पालखी सोहळ्यावरील निर्बंध उठवून ह.भ.प. संतवीर बंडातात्या कराडकर आणि इतर वारकरी यांना नजरकैदेतून मुक्त करावे ! – ह.भ.प. मनोहर बुवा सुभेकर
पिंपरी (पुणे), १८ जुलै – पालखी सोहळ्यात वारकर्यांनी सहभागी होण्याविषयी राज्य सरकारने जाचक अटी घातल्या आहेत आणि ह.भ.प. संतवीर बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. याचा निषेध करण्यासाठी पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात टाळ वाजवून वारकरी, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी ‘ज्ञानोबा-माऊली तुकाराम’चा जयघोष करत आंदोलन केले.
ह.भ.प. मनोहर बुवा सुभेकर म्हणाले की, भारतामध्ये यापूर्वी कॉलरा महामारीची साथ आली होती. तेव्हाही तत्कालीन सरकारने पालखी सोहळ्यावर एवढी बंधने घातली नव्हती; परंतु महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ७०० वर्षांची परंपरा असणार्या पालखी सोहळ्यावर जाचक नियम-अटी घातल्या आहेत. हे निर्बंध उठवून ह.भ.प. संतवीर बंडातात्या कराडकर आणि इतर वारकरी यांना नजरकैदेतून मुक्त करावे.
विश्व हिंदु परिषदेचे चिंचवड जिल्हा सहमंत्री धनंजय गावडे म्हणाले की, या सरकारने स्वतंत्रपणे वारी करणार्या वारकर्यांच्या खांद्यावरील भगवी पताका, डोक्यावरील टोपी काढून घेतली. हे अन्यायकारक असून त्याचा वारकरी संप्रदायासह विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल जाहीर निषेध करत आहेत. या आंदोलनात विश्व हिंदू परिषदेचे चिंचवड जिल्हा सहमंत्री धनंजय गावडे, बजरंग दलाचे कुणाल साठे, ह.भ.प. शिवाजी महाराज इंगळे आदींनी सहभाग घेतला.