नाशिक येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) मंजुषा जोशी (वय ५५ वर्षे) यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१७.४.२०२१ या दिवशी नाशिक येथील सौ. मंजुषा शशिधर जोशी यांचे निधन झाले.१५.७.२०२१ या दिवशी त्यांचे तिसरे मासिक श्राद्ध झाले. त्यानिमित्त सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्री. संतोष आणि सौ. माधुरी गोसावी, लासलगाव, जिल्हा नाशिक.
१. साधकांना साधनेत साहाय्य करणे
‘सौ. जोशीकाकू नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, देवगाव, कोठुरे, पिंपळस आणि गाजरवाडी या गावांत प्रसारासाठी जात असत. त्या इतरांना साधना करण्यासाठी प्रोत्साहित करत असत. सर्व साधकांच्या व्यष्टी साधनेची घडी बसवण्यासाठी त्या तळमळीने प्रयत्न करत असत. ‘भाववृद्धी करण्यासाठी भावप्रयोग करणे, पहाटे नामजपाला बसणे’ इत्यादी करण्यासाठी त्या साधकांना भ्रमणभाष करून आठवण करून देत असत.
(‘कोरोना महामारी आणि दळणवळण बंदी यांमुळे साधकांना एकमेकांना भेटणे अशक्य असल्याने साधक कोरोना संसर्गात आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी ठराविक वेळेत नामजप करत असत. याचा सर्वांना लाभ होत असे.’ – संकलक)
२. काकू ‘मनमोकळेपणा, सहजता, इतरांना साहाय्य करणे, साधनेतील अडचणी सोडवण्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा घेणे’, या गुणांची खाण होत्या.
३. प्रेमभाव
अ. काकू आम्हाला आमच्या चुकांची जाणीव करून देत असत. ‘आम्ही साधनेत कुठे न्यून पडत आहोत ?’, हे त्या आमच्या लक्षात आणून देत असत.
आ. काकू १ – २ भेटींतच समोरच्या साधकाला आपलेसे करून घेत असत. त्या इतरांची विचारपूस करत असत. सेवेनिमित्त काकूंच्या घरी गेल्यावर त्यांना कितीही घाई असली, तरी त्या आम्हाला काहीतरी खाऊ देत असत.
४. गुरुदेवांप्रतीची श्रद्धा आणि भाव
काकू नेहमी म्हणत, ‘‘परम पूज्य आहेत ना ? ते बघतील. काळजी करू नका. ते सेवा करवून घेतील.’’ त्या प्रत्येक वाक्याला गुरुदेवांचे गुणगान करत असत.’
सौ. नीलिमा कुलकर्णी, लासलगाव, जिल्हा नाशिक.
१. ‘सतत हसतमुख असणे’, हे त्यांचे प्रमुख गुणवैशिष्ट्य होते.
२. साधकांचा आध्यात्मिक आधारस्तंभ असलेल्या जोशीकाकू !
निफाडमधील कोणत्याही साधकाला अडचण आली, तर जोशीकाकूंचे नाव डोळ्यांसमोर येत असे. जोशीकाकूंना कधीही संपर्क केला, तरी त्या साधकांच्या साधनेतील अडचणी सोडवत असत.
श्री. नीलेश बोरा, लासलगाव, जिल्हा नाशिक.
सौ. जोशीकाकू म्हणजे साधकांची आध्यात्मिक आई !
‘सौ. जोशीकाकूंच्या घरी गेल्यानंतर ‘आपण परक्या ठिकाणी आलो आहोत’, असे कधी वाटले नाही. त्यांनी आम्हाला स्वतःच्या मुलांप्रमाणे जीव लावला. आम्हाला त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलता येत असे. मला अजूनही त्यांची आठवण येते.’ (६.६.२०२१)