सर्वोच्च न्यायालयाच्या चेतावणीनंतर उत्तरप्रदेशातील कावड यात्रा रहित !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चेतावणीनंतर उत्तरप्रदेश शासनाने राज्यातील कावड यात्रेला दिलेली अनुमती रहित केली आहे. कावड यात्रा २५ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणार होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने म्हटले होते ‘नागरिकांचे आरोग्य आणि त्यांचा जगण्याचा अधिकार सर्वांत महत्त्वाचे आहे. इतर सर्व भावना, मग त्या धार्मिक का असेनात, या सर्वांत प्राथमिक अशा मूलभूत अधिकाराच्या अधीन आहेत.’ उत्तरप्रदेश शासनाने कावड यात्रेला अनुमती दिल्यावर न्यायालयाने स्वतःहून याचिका प्रविष्ट करून घेतली होती. याविषयी न्यायालयाने केंद्रशासन, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड शासन यांना नोटीस बजावत त्यांचे म्हणणे १९ जुलै या दिवशी मांडण्यास सांगितले होते. उत्तराखंड शासनाने या यात्रेला अनुमती दिलेली नव्हती.
The Uttar Pradesh government announced that the #KanwarYatra is being cancelled in view of the coronavirus pandemic, as per a report https://t.co/t5yLnsTrZv
— Hindustan Times (@htTweets) July 17, 2021
काय आहे कावड यात्रा ?
श्रावण मासामध्ये कावड यात्रा आयोजित केली जाते. पहिली कावड यात्रा शिवभक्त भगवान परशुरामाने आयोजित केल्याची आख्यायिका आहे. यात्रेच्या वेळी शिवभक्त भगवेवस्त्र परिधान करून गंगानदीसह अन्य पवित्र नद्यांमधून पाणी घेऊन अनवाणी पदयात्रा काढतात. उत्तराखंडमधील हरिद्वार, गोमुख आणि गंगोत्री, बिहारमधील सुलतानगंज आणि उत्तरप्रदेशमधील प्रयागराज, अयोध्या आणि वाराणसी अशा तीर्थक्षेत्रांतून भाविक पवित्र जल घेऊन त्यांच्या गावाकडे परतात. भाविक हे जल शंकराची पूजा करण्यासाठी वापरतात. वर्ष २०१९ मध्ये या यात्रेच्या काळात साडेतीन कोटी भाविकांनी हरिद्वारला भेट दिली. या काळात उत्तरप्रदेशातील विविध यात्रास्थळांना २-३ कोटी भाविक भेट देतात.