मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम करणार्‍या ठेकेदारावर गुन्हा नोंद करण्याची मागणी

कणकवलीतील उड्डाणपुलावरील रस्ता खचल्याचे प्रकरण

सातत्याने आवाज उठवूनही महामार्गाचे काम निकृष्ट केले जाते, याचा अर्थ ‘ठेकेदाराचे हात वरपर्यंत पोचलेले आहेत’, असाच समजायचा का ?

खचलेल्या रस्त्याची बाजू वाहतुकीसाठी बंद करण्यात आली

कणकवली – शहरातील मुंबई-गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाच्या एका बाजूच्या रस्त्याचा काही भाग खचल्यामुळे पुलावरील वाहतूक तात्काळ बंद करावी आणि वेगवेगळ्या न्यायसंस्थांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सदर धोकादायक बांधकाम काढून टाकावे. न्यायसंस्थांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्याचे संबंधितांच्या निदर्शनास आणून देत संबंधित ठेकेदार आस्थापन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कामाची तपासणी करणारी त्रयस्थ संस्था यांच्यावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी कणकवलीचे पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यानुसार सध्या खचलेल्या रस्त्याची बाजू वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी महामार्गावरील कोसळलेल्या भागाचे काम पुन्हा करण्याचा आणि अतीधोकादायक बांधकाम हटवण्याविषयी ठेकेदाराला आदेश देण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, संबंधित ठेकेदार आस्थापन आणि तपासणी करणारी त्रयस्थ संस्था यांनी आश्वासनदेखील दिले होते; मात्र त्या वेळी ‘पावसाळ्यानंतर कार्यवाही करू’, असे सांगत काम करण्यास टाळाटाळ करण्यात आली होती. यावर्षी देखील मुसळधार पावसामुळे गतवर्षीसारखी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. ‘मास्क न वापरणार्‍यावर गुन्हा नोंद होतो; मग जनतेच्या जीविताशी खेळणार्‍या ठेकेदार आस्थापनावर गुन्हा नोंद का होत नाही ?, असा प्रश्न या निवेदनाद्वारे विचारण्यात आला आहे. (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कामाची तपासणी करणारी संस्था असूनही रस्त्याचे काम निकृष्ट होते. वेळोवेळी जनता आणि स्थानिक लोकप्रनिधी यांनी लक्षात आणून दिलेल्या त्रुटींकडेही दुर्लक्ष केले जाऊन काम पूर्णत्वास नेले जाते, याचा अर्थ काय ? – संपादक)

या वेळी पोलीस निरीक्षक मुल्ला यांनी ‘याविषयी संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यात येईल आणि गुन्हा नोंद करण्याविषयी वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल’, असे आश्वासन दिले.