‘आपत्काळ’ हीसुद्धा भगवंताची एक लीला असून परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति ( (सौ.) अंजली गाडगीळ यांना शरण जाऊन आपत्काळाला सामोरे जाऊया !
‘मनुष्य म्हटले की ‘मी’पणा आलाच; मात्र ‘हा ‘मी’ कोण ?’, हे कुणालाच कळत नाही. आता चालू झालेल्या आपत्काळात साधकांना अनेक स्तरांवर झुंज द्यावी लागत आहे. कुणाला कौटुंबिक, कुणाला सामाजिक, कुणाला आर्थिक, कुणाला शारीरिक, कुणाला मानसिक, तर कुणाला बौद्धिक ! आपत्काळ म्हणजे ईश्वराची परीक्षा आहे. या परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण व्हायचे आहे आणि श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांची कृपा संपादन करायची आहे. आपल्याला श्रीरामाचे वानर आणि श्रीकृष्णाचे पांडव व्हायचे आहे. आपत्काळ हा आपल्या सर्वांसाठी एक युद्धच आहे. त्याला सामोरे जाणे, ही साधनाच आहे. श्रीविष्णूची ही परीक्षा आपले प्रारब्ध आणि संचित यांची परीक्षा असून ही आपल्या गुरुनिष्ठेची अन् श्रद्धेचीही परीक्षा आहे. ही परीक्षा जेवढी कठीण आहे, तेवढाच या परीक्षेचा शेवट पुष्कळ गोड आहे; म्हणून ‘सनातनचे तीन गुरु आणि साधक यांचे काय नाते आहे ?’, हे जाणून घेऊया.
१. ‘श्रीविष्णूची लीला समजू शकेल’, असे या जगात कुणी नाही !
चराचर सृष्टीचा पालक वैकुंठपती श्रीविष्णूने जेव्हा श्रीकृष्णावतार धारण केला, तेव्हा अर्जुनाला सांगितले होते, न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः । अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक २ अर्थ : माझी उत्पत्ती, म्हणजेच ‘लीलेने प्रकट होणे’, हे ना देव जाणतात ना महर्षि; कारण मी सर्वप्रकारे देवांचे आणि महर्षींचे आदिकारण आहे.
१ अ. कलियुगात ‘श्रीविष्णूचा अवतार असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांचे दैवी कार्य जाणू शकेल’, असे कुणीही नसून ‘जगभरात भीषण आपत्काळाला प्रारंभ होणे’, ही भगवंताची लीलाच असणे : ‘भगवंताची लीला जाणू शकतो’, असे कुणीही नाही. त्याचप्रमाणे कलियुगात ‘श्रीविष्णूचा अवतार असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दैवी कार्य जाणू शकेल’, असेही कुणी नाही. देव-देवता, ॠषी-मुनी आणि भगवद्भक्त-संत यांना हे ठाऊक असल्याने ते ‘ईश्वराची पुढची लीला काय असेल ?’, हे जाणण्याच्या मागे न लागता केवळ त्याची लीला आनंदाने अनुभवतात आणि त्याची अनुभूती घेतात. ‘संपूर्ण जगभरात भीषण आपत्काळाला प्रारंभ होणे’, हीसुद्धा भगवंताची एक लीलाच आहे.
१ आ. सनातनच्या प्रारंभापासून आतापर्यंत घडलेल्या सर्व घटना आणि गुरुदेवांनी करून घेतलेला धर्मप्रसार म्हणजे श्रीमन्नारायणाची लीलाच असणे : सनातनचे कार्य प्रारंभ होऊन आता ३१ वर्षे झाली आहेत. सनातन संस्थेची स्थापना भारताच्या पश्चिम भागात होणे, गुरुदेवांनी एक एक साधकाला शोधून त्यांना सिद्ध करणे, काळानुसार आणि टप्प्याटप्याने साधना शिकवणे, ग्रंथ लिहिणे, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके प्रकाशित करणे, गावोगावी प्रवचने आणि सत्संग घेणे, १ सहस्रपेक्षा अधिक हिंदु धर्मजागृती सभांचे आयोजन करणे, धर्मजागृती मोहिमा राबवणे, संकेतस्थळाद्वारे प्रसार करणे, विदेशात प्रसार करणे, तसेच हिंदु राष्ट्र अधिवेशने आयोजित करणे, हे सर्व म्हणजे श्रीमन्नारायणाची लीलाच आहे.
२. भगवान श्रीविष्णु आणि त्याच्या २ शक्ती – ‘ श्रीचित्शक्ति’ आणि ‘ श्रीसत्शक्ति’ यांचे कार्य !
२ अ. गुरुदेवांशी जोडण्यासाठी प्रत्येकाच्या अंतरात्म्याला झालेली ईश्वरी प्रेरणा, म्हणजे ‘ श्रीचित्शक्ति ’ आणि अंतरात्म्यात गुरुदेवांविषयी जी श्रद्धा निर्माण झाली, ती म्हणजे ‘ श्रीसत्शक्ति ’ ! : भगवान श्रीविष्णूच्या शक्तीचे दुसरे नाव म्हणजे श्रीसत्शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति ((सौ.) अंजली गाडगीळ ! या दोघी तत्त्वरूपाने ‘श्रीसत्शक्ति ’ आणि ‘श्रीचित्शक्ति ’ आहेत. आपण सर्व साधक साधनेत आलो. साधनेत येण्याच्या वेळी कोणतेतरी एक निमित्त झाले आणि आपण गुरुदेवांशी जोडले गेलो. गुरुदेवांशी जोडण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या अंतरात्म्याला झालेली ईश्वरी प्रेरणा, म्हणजे ‘श्रीचित्शक्ति’ होय ! गुरुदेवांशी जोडल्यावर अल्पावधीत आपल्या प्रत्येकाच्या अंतरात्म्यात गुरुदेवांविषयी जी श्रद्धा निर्माण झाली, ती म्हणजे ‘श्रीसत्शक्ति’ होय !
२ आ. हिंदु राष्ट्र-जागृती सभेला जाण्याची प्रेरणा म्हणजे ‘श्रीचित्शक्ति’ आणि प्रवचन ऐकून धर्माप्रती काहीतरी करण्याचा विचार निर्माण करते, ती ‘ श्रीसत्शक्ति ’ ! : आपल्याला वाटते की, हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अमुक सहस्र लोक आले; मात्र गुरुदेवांनी त्या लोकांना सभेला जाण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे ते आले. ती प्रेरणा म्हणजे श्रीचित्शक्ति च होय. प्रेरणा होऊन आलेले लोक अनेक घंटे बसून प्रवचन ऐकू शकले आणि त्यांच्यामध्ये धर्माप्रती काहीतरी करण्याचे विचार निर्माण झाले, हे म्हणजे श्रीसत्शक्ति होय.
२ इ. गुरुदेवांनी श्रीसत्शक्तिआणि श्रीचित्शक्ति यांच्या माध्यमातून समाजातील जिज्ञासूंकडून सेवा करवून घेणे : सत्संग असो किंवा भावसत्संग असो, समाजातील हितचिंतक असोत किंवा विज्ञापनदाते असोत, न्यायालयीन लढा देतांना बाजू मांडणारे अधिवक्ता असोत किंवा धर्मरक्षणासाठी कार्य करणारे असोत, या सर्वांकडून गुरुदेवांनी श्रीचित्शक्ति आणि श्रीसत्शक्ति यांच्या माध्यमातून सेवा करवून घेतली. आपण सर्व साधक श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेव, तसेच श्रीसत्शक्ति आणि श्रीचित्शक्ति यांचेच माध्यम आहोत. खरेतर आपल्या नकळत सनातनच्या तिन्ही गुरूंनी सर्व साधकांकडून धर्मसंस्थापनेचे कार्य लीलया करवून घेतले आणि यापुढेही ते करवून घेणार आहेत.
३. ‘आपत्काळ येणे’, ही भगवंताची लीला !
सध्या पृथ्वीवर सगळीकडे भीषण आपत्काळाला प्रारंभ झाला असून हा आपत्काळ टप्प्याटप्प्याने वाढत जाणार आहे. आपत्काळ हाही भगवंताची लीलाच आहे. ‘आपत्काळ येत आहे, तर ‘मी शहर सोडू कि नको सोडू ?’, ‘मी हे करू कि ते करू ?’, ‘मी माझ्या मनाचे ऐकू कि संतांचे ऐकू ?’, अशी द्विधा मनःस्थिती असणारच आहे. भगवान श्रीविष्णु आपल्या योगमायेने साधकांच्या जीवनात असे अनेक प्रसंग निर्माण करणार आणि त्यामुळे भक्त असलेल्या सनातनच्या साधकांची कसोटी असणार आहे. अशा वेळी जो साधक आपत्काळाला न घाबरता श्रीविष्णुस्वरूप गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पाऊल टाकणार, त्या साधकाची सर्व काळजी ईश्वर घेणार, हेच सत्य आहे.
४. आपत्काळात ‘विकल्प’ आणि ‘नकारात्मक विचार’ हेच साधकांचे शत्रू असणे
आता काळ असा आला आहे की, ‘विकल्प’ आणि ‘नकारात्मक विचार’ या दोन्ही गोष्टींना स्थानच नाही. हे आपले शत्रू आहेत. आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे ते आत शिरतात अन् घर करून बसतात. या शत्रूंना जर वेळेत बाहेर काढले नाही, तर जेव्हा प्रत्यक्ष प्रसंग येतो, तेव्हा हे दोघे आपल्यावरच आवरण आणतात. आपल्याला वाटते, ‘आपल्याला प्रकाश का दिसत नाही ? मार्ग का सापडत नाही ?’; मात्र आपण तेव्हाही विकल्प आणि नकारात्मक विचार करणे सोडत नाही.
५. आपत्काळात ‘श्रद्धा’ आणि ‘शरणागती’, हेच साधकांचे मित्र असणे
या आपत्काळात प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकण्याचे महत्त्व लक्षात येते; मात्र खरेतर आता विचार करायलाही वेळ नाही. पूर्वी काळाची गती प्रतिदिवसाला पालटायची; पण आता ती प्रतिघंट्यालाच पालटत आहे. अशा आपत्काळात ‘जेथे मी जिवंत रहाणार का ?’, हाच विचार सर्वांच्या मनात असतांना ‘श्रद्धा’ आणि ‘शरणागती’ हेच आपले मित्र आहेत. आपत्काळात ईश्वर सनातनच्या तिन्ही गुरूंच्या माध्यमातून साधकांची परीक्षा घेईल. गुरु शिष्याची परीक्षा घेतात आणि त्याला उत्तीर्ण होण्याचा मार्गही दाखवतात. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तिन्ही गुरूंनीच साधकांना ‘श्रद्धा’ आणि ‘शरणागती’ हा मार्ग दाखवला आहे.
६. आपत्काळाला तोंड देण्यासाठी ‘गुरुदेवांना शरण जाणे’, हाच एकमेव पर्याय असणे
श्रीविष्णूच्या हातातून सुदर्शनचक्र निघते, ते त्याला दिलेले कार्य पूर्ण करूनच परत श्रीविष्णूच्या करंगळीवर येते. आपत्काळ हे श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांचे सुदर्शनचक्र आहे. या आपत्काळाला शरण जाण्यावाचून अन्य कोणताही मार्ग आपल्याकडे नाही. अर्जुन श्रीकृष्णाच्या चरणी शरण गेल्यावरच त्याला त्याचा मार्ग दिसला आणि त्याने सर्व भय आणि नकारात्मक विचार सोडून युद्ध केले. ‘गुरुदेवांना शरण जाणे’, हाच आपल्याकडे असलेला एकमेव पर्याय आहे. ‘त्यांनी साधकांना ज्या प्रवाहात टाकले आहे, त्या प्रवाहात मार्गही तेच दाखवणार आहेत’, ही श्रद्धा बाळगूया आणि त्यांच्या चरणी शरण जाऊन आपत्काळाला तोंड देऊया.
७. सनातनच्या तिन्ही गुरूंच्या चरणी प्रार्थना !
हे श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले, हे श्रीसत्शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ आणि हे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, या आपत्काळात आम्हा साधक-जिवांना साधनेच्या बळावर तरण्याचा मार्ग दाखवावा. आम्ही अडाणी आणि मूर्ख आहोत. आम्हाला काही कळत नाही. तुम्हीच आमच्याकडून साधना करवून घ्या. आम्ही सर्व साधक तुमच्या चरणी शरण आलो आहोत. मार्गही तुम्हीच, ध्येयही तुम्हीच आणि महाकाळही तुम्हीच आहात. ‘आम्हा साधकांची प्रार्थना स्वीकारून आम्हा सर्वांना आपत्काळातून हिंदु राष्ट्राकडे न्यावे’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.