परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा ठेवून साधना करणार्‍या साधकांचे ते रक्षण करणार ! – सप्तर्षि

साधकांनी अर्जुनाप्रमाणे शरण जाऊन जगद्गुरु श्रीकृष्णाचा अवतार असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनन्य भावाने पूजा करण्याचे सप्तर्षींनी सांगितलेले महत्त्व

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. डिसेंबर २०१९ ते डिसेंबर २०२२ पर्यंतची ३ वर्षे ही घोर आपत्काळाची असणे आणि या आपत्काळातील जून २०२० पासून शेवटची अडीच वर्षे सूक्ष्म महायुद्धाची असणे

महाभारत युद्ध आरंभ होण्याआधी जगद्गुरु श्रीकृष्णाने पांडवांमध्ये सर्वांत लहान असलेल्या सहदेवाकडून युद्धासाठी मुहूर्त काढला होता. सहदेवाला श्रीकृष्णाच्या कृपेने ज्योतिषशास्त्राचे ज्ञान मिळाले होते. श्रीकृष्णाने सहदेवाला सांगितले होते, ‘महाभारत युद्ध २ अमावास्यांच्या मधल्या काळात पूर्ण व्हायला हवे, असा मुहूर्त काढावा.’ त्याप्रमाणे सहदेवाने मुहूर्त काढला होता. आता कलियुगातही असेच झाले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले साक्षात् श्रीकृष्णाचे अवतार आहेत. डिसेंबर २०१९ ते डिसेंबर २०२२ पर्यंतची ३ वर्षे ही घोर आपत्काळाची आहेत. हा सर्व सूक्ष्मातील युद्धाचा काळ आहे. २६ डिसेंबर २०१९ या अमावास्येच्या दिवशी सूर्यग्रहण होते. या दिवसानंतरच विश्वात ‘कोरोना महामारी’च्या संकटाला आरंभ झाला, तसेच अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या, भूकंप झाले, चक्रीवादळ आले, युद्धासारखी स्थिती निर्माण झाली. २१ जून २०२० या अमावास्येलाही सूर्यग्रहण झाले. जून २०२० पासून पुढील अडीच वर्षांचा काळ हा सूक्ष्मातील महायुद्धाचा काळ असणार आहे !

२. या आपत्काळात श्रीकृष्णस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांचे रक्षण करणार असणे आणि साधकांना आपत्काळात महाभारत युद्धाची आठवण होऊन कुरुक्षेत्रावर उभ्या असलेल्या श्रीकृष्णस्वरूप गुरुदेवांना सतर्कतेने प्रार्थना करणे सोपे जावे; म्हणून गुरुदेवांचे त्या रूपातील छायाचित्र बनवण्यास सांगितले असणे

कुरुक्षेत्रावर उभे असलेल्या श्रीकृष्णाच्या रूपातील गुरुदेवांच्या चित्राच्या पूजनापूर्वी संकल्प करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (५.७.२०२०)

ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने महाभारत युद्धाच्या वेळी पांडवांचे रक्षण केले, त्याप्रमाणेच आता या युद्धकाळात श्रीकृष्णस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांचे रक्षण करणार आहेत. यासाठी सर्व साधकांनी गुरुदेवांना अर्जुनाप्रमाणे शरण जाऊन प्रार्थना करणे आवश्यक आहे. साधकांना महाभारत काळातील युद्धाची आठवण व्हावी आणि येणार्‍या आपत्काळात कुरुक्षेत्रावर उभ्या असलेल्या श्रीकृष्णस्वरूप गुरुदेवांना सतर्कतेने प्रार्थना करणे सोपे जावे; म्हणून आम्ही सप्तर्षींनी कुरुक्षेत्रावर आशीर्वाद देत असलेल्या मुद्रेत उभे असलेल्या गुरुदेवांचे श्रीकृष्णाच्या रूपातील छायाचित्र बनवण्यास सांगितले.

या चित्रामध्ये गुरुदेवांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी गुरुदेवांच्या चरणांशी अर्जुनाप्रमाणे बसून सर्व साधकांच्या वतीने आपत्काळात रक्षण होण्यासाठी श्रीकृष्णरूपातील गुरुदेवांना प्रार्थना करायची आहे. (याप्रमाणे चित्र बनवून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्याचे पूजन केले. – संकलक)

साधकांनी अर्जुनाप्रमाणे शरण जाऊन जगद्गुरु श्रीकृष्णाचे रूप असलेल्या गुरुदेवांची अनन्यभावाने पूजा करावी. गुरुदेवांवर श्रद्धा ठेवणार्‍या आणि त्यांची अनन्य भक्ती करणार्‍या साधकांचे रक्षण ते स्वयं करणार आहेत, यात शंका नाही !’

– सप्तर्षि (पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या नाडीपट्टीवाचनाच्या माध्यमातून (२९.६.२०२०))


वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेच्या वेळी गुरुपूजन सांगतांना आलेल्या अनुभूती

१. गुरुपूजनाच्या आरंभी : ‘कुरुक्षेत्रावर गीता सांगण्यापूर्वी जसे वातावरण स्तब्ध झाले होते आणि कालचक्रच थांबले होते, तसेच गुरुपूजनाच्या आरंभी वातावरण स्तब्ध झाले आहे’, असे मला जाणवले.

२. गुरुपूजन चालू असतांना : गुरुपूजन करतांना ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ मोठ्या मोठ्या होत गेल्या’, असे मला जाणवले. संपूर्ण व्यासपीठ निर्गुणात जात असल्याचे जाणवून तेथे मला केवळ भगवान नारायणस्वरूपात परात्पर गुरुदेवांचे दर्शन झाले. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली.’

– श्री. ईशान जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.६.२०२०)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या श्रीकृष्णरूपातील चित्राची ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या श्रीकृष्णरूपातील चित्रामध्ये पुष्कळ प्रमाणात श्रीकृष्णतत्त्व (चैतन्य) असणे

‘हे चित्र सनातनच्या साधक-चित्रकारांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार स्पंदनशास्त्राचा सुयोग्य अभ्यास करून भावपूर्ण काढले आहे. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हे अध्यात्मातील तत्त्व आहे. ‘श्रीकृष्णरूपातील चित्रामध्ये अधिकाधिक श्रीकृष्णतत्त्व आकृष्ट व्हावे’, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी साधक-चित्रकारांना चित्राच्या संदर्भात अमूल्य मार्गदर्शन केले. त्यामुळे या चित्रामध्ये अधिकाधिक श्रीकृष्णतत्त्व आकृष्ट करून ते प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. चाचणीतून चित्रामध्ये आरंभीही (३२१.१८ मीटर) पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असल्याचे आढळून आले. परात्पर गुरु डॉक्टरांनी या चित्राला हस्तस्पर्श केल्याने त्यामध्ये चैतन्य संक्रमित झाले. त्यामुळे चित्राच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होऊन तिची प्रभावळ ४८७ मीटर झाली.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या श्रीकृष्णरूपातील चित्राचे भावपूर्ण पूजन केल्याने चित्रातील श्रीकृष्णतत्त्व जागृत होणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या श्रीकृष्णरूपातील चित्राचे अत्यंत भावपूर्ण पूजन केले. त्यामुळे चित्रातील श्रीकृष्णतत्त्व जागृत होऊन साधकांच्या रक्षणासाठी कार्यरत झाले. गुरुपूजनानंतर चित्राच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होऊन तिची प्रभावळ ६४४.५० मीटर झाल्याचे आढळून आले.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (८.८.२०२०)

ई-मेल : mav.research2014@gmail.com

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक