केवळ एकच मूल जन्माला घातल्यास हिंदूच हिंदूंची लोकसंख्या न्यून करतील ! – विश्‍व हिंदु परिषद

उत्तरप्रदेश शासनाच्या लोकसंख्या नियंत्रण विधेयकामध्ये एकच मूल असणार्‍यांना विशेष तरतुदी

धर्मांधांच्या वाढत्या हिंदुविरोधी कारवायांमुळे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी हिंदूंनी लोकसंख्या वाढवणे, हा त्या समस्येवरील उपाय नसून हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांना आध्यात्मिकदृष्ट्या बलसंपन्न करणे, हाच खरा उपाय आहे. अशा हिंदूंना ईश्‍वर साहाय्य करील आणि त्यांच्या सर्व समस्या सुटतील !

विश्‍व हिंदु परिषदेचे सरचिटणीस मिलिंद परांडे

नवी देहली – जर कुटुंबामध्ये एकच मूल असेल, तर हिंदू स्वतःहून हिंदूंची लोकसंख्या न्यून करतील. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणावर विचार करतांना हिंदूंचे प्रभुत्व  कायम राहील, याचा विचार हिंदूंनी केला पाहिजे; कारण हिंदूंच्या लोकसंख्येच्या प्रभुत्वामुळे देशातील राजकारण, धर्मनिरपेक्षता आणि सहिष्णुता यांचे संचालन केले जात आहे, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना मांडले. उत्तरप्रदेश शासनाने लोकसंख्या नियंत्रण विधेयक सिद्ध केले आहे. त्यात एकच मूल असणार्‍यांना सोयीसुविधा देण्याच्या तरतुदी आहेत. त्यावर परांडे यांना प्रश्‍न विचारण्यात आल्यावर त्यांनी वरील उत्तर दिले.

परांडे पुढे म्हणाले की, हिंदूंनी स्वतःला देशात लोकसंख्येच्या आधारे बहुमतामध्ये ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत. एक मूल असण्याची नीती समाजामधील लोकसंख्येमध्ये असमतोल बनवील.

मंदिरांचे सरकारीकरण रहित होण्यासाठी प्रयत्न करणार !

फरीदाबाद (हरियाणा) येथे विहिंपची संचालन परिषद आणि न्याय मंडळ यांची दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सरकारीकरण झालेली मंदिरे, धर्मांतर आणि बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेला हिंसाचार यांवर विशेष चर्चा होत आहे.
या बैठकीविषयी परांडे म्हणाले की, मंदिरांचे व्यवस्थापन समाजाकडून केले गेले पाहिजे; मात्र अनेक राज्यांमध्ये मोठी मंदिरे सरकारच्या नियंत्रणात आहेत. या बैठकीत मंदिरे सरकारी नियंत्रणातून कशी मुक्त करता येतील, यावर चर्चा करण्यात येणार आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्यापर्यंतच्या उपायांचाही विचार करण्यात येईल. तसेच धर्मांतरावर लगाम लावण्यासाठी केंद्र स्तरावर कायदा बनवण्यावरही चर्चा करण्यात येणार आहे. ख्रिस्ती धर्मप्रचारक आणि जिहादी यांच्याकडून हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. ही एक राष्ट्रव्यापी समस्या आहे. यावर चर्चा करून प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.