महाराष्ट्राचा इयत्ता १० वीचा निकाल ९९.९५ टक्के !
कोकण विभाग १०० टक्के निकालासह राज्यात प्रथम !
सिंधुदुर्ग – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता १० वीचा निकाल १६ जुलैला घोषित करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल ९९.९५ टक्के लागला असून कोकण विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. सर्वांत अल्प निकाल नागपूर विभागाचा ९९.८४ टक्के लागला आहे. कोरोना महामारीमुळे यावर्षी इयत्ता १० वीची परीक्षा रहित करण्यात आली होती; मात्र विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन आणि विद्यार्थ्यांचा इयत्ता ९ वीच्या वार्षिक परीक्षेचा निकाल यांच्या आधारे निकाल घोषित करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागांतर्गत हा निकाल घोषित करण्यात आला. इतिहासात प्रथमच अशा पद्धतीने परीक्षा रहित झाल्याने निकाल घोषित करण्यात आला. राज्यातील २२ सहस्र ७६७ शाळांपैकी २२ सहस्र ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. राज्यातील ९ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.
महामंडळाच्या कोकण विभागातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील सर्व शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २१ सहस्र ८० विद्यार्थी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० सहस्र ८८ विद्यार्थी ,असे एकूण ३१ सहस्र १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यावर्षी परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा क्रमांक दिले गेले नाहीत. त्यामुळे ‘ऑनलाईन’ निकाल पहाण्यासाठी विद्यार्थ्यांचे नाव, जन्मदिनांक आणि आईचे नाव महामंडळाच्या संकेतस्थळावर टंकलिखित केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पहाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. निकाल दुपारी १ वाजता ‘ऑनलाईन’ घोषित होणार, असे राज्य शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले होते; मात्र ४ घंटे झाले तरी विद्यार्थ्यांंना संकेतस्थळावर निकाल पहाता येत नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकही संतप्त झाले होते.