नागपूर येथे कोरोनाच्या कारणामुळे यंदाही ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्तीवरील बंदीला स्थगिती !
नागपूर – केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्तींवर बंदी आणली होती; मात्र गेल्या वर्षी तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बंदीचा निर्णय १ वर्षासाठी स्थगित केला होता. कोरोनाच्या कारणामुळे यावर्षीही ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्तीवरील बंदीला स्थगिती देण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवात ३० टक्के गणेशमूर्ती मातीच्या, तर उर्वरित ७० टक्के मूर्ती ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या सिद्ध करण्यात येत होत्या. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीमुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी गेल्या १० वर्षांपासून प्रयत्न चालू आहेत. वर्ष २०१० मध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या संदर्भातील बंदीविषयी मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली होती; मात्र मूर्तीकारांनी त्याला विरोध दर्शवला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळ स्वत: या बंदीविषयी जनजागृती करत असतांना सरकारची धरसोड वृत्ती मात्र त्यात अडथळा आणत आहे.
गेल्या वर्षी यात न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर मे २०२० मध्ये ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीवर बंदी घातली गेली; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने बंदीच्या निर्णयाला १ वर्षासाठी स्थगिती दिली. त्याचा लाभ घेत ही बंदी कायमस्वरूपी हटवण्यासाठी मूर्तीकारांनी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. न्यायालयाने त्यांना राष्ट्रीय हरित लवादाकडे न्याय मागण्यास सांगितले.
‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्तींचा प्रवेश रोखायला हवा ! – विजय घुगे, अध्यक्ष, निसर्ग विज्ञान मंडळ
पर्यावरणतज्ञ आणि निसर्ग विज्ञान मंडळाचे अध्यक्ष विजय घुगे म्हणाले, ‘‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीमुळे जलप्रदूषणासमवेतच पारंपरिक कुंभारांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. यामुळे तलावातील पाण्याचे स्रोत नाहीसे होऊन तलाव मृत होत आहेत. याला सरकार आणि प्रशासन दोघेही उत्तरदायी आहेत. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’वरील बंदीसाठी समिती स्थापन करून शहराच्या सीमेवरच या मूर्तींचा प्रवेश रोखला पाहिजे; मात्र प्रतिवर्षी यात राजकारण आड येते.’’
‘प्लास्टर ऑफ पॅरिस’मुळे पाण्याची साठवण क्षमता अल्प होते ! – कौस्तुभ चॅटर्जी, पर्यावरणतज्ञ
पर्यावरणतज्ञ कौस्तुभ चॅटर्जी म्हणाले, ‘‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने वर्षानुवर्षे तशाच पडून रहातात. यात वापरण्यात येणारे रासायनिक रंग आणि त्यातील जड धातूंचा जलीय परिसंस्थेवर परिणाम होतो. ‘बोरिक ॲसिड’, ‘पोटॅशियम सल्फेट’, ‘सिलिका’, ‘कॉपर’ हे प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारे घटक आहेत. त्यामुळे मूर्तीचे पाण्यात विसर्जन झाल्यानंतर पाणी जड होते. हे रंग पाण्यावर तरंगतात आणि त्यामुळे पाण्यातील प्राणवायूला ते बाधा आणतात. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ हे तलावाच्या तळाशी जमा होत असल्याने पाण्याची साठवण क्षमताही अल्प होते.’’