मुसलमान आणि ब्रिटीश राजवटीतही पंढरपूरच्या वारीत खंड पडला नव्हता ! – विश्व हिंदु परिषद

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रत्येक दिंडीतील २ वारकर्‍यांना पायी जाण्यास अनुमती देण्याची विश्व हिंदू परिषदेची मागणी

नगर, १६ जुलै – शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पंढरपूरच्या वारीमध्ये मुसलमान आणि ब्रिटीश राजवटीमध्येही खंड पडला नव्हता; परंतु सध्याच्या राज्य सरकारने हिंदुविरोधी भूमिका घेतल्याने प्रथमच वारीमध्ये खंड पडला आहे. चर्चेला बोलावून दिशाभूल केली जात आहे. वारीला निघालेले संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी कह्यात घेतले. हिंदूंच्या निरपराध संतांना अटक करून त्यांना अपराध्याची वागणूक देणार्‍या मुख्यमंत्र्यांनी वारकर्‍यांची तात्काळ क्षमा मागितली पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला; मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदुत्वविरोधी भूमिका घेत आहेत. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रत्येक दिंडीतील २ वारकर्‍यांना पायी जाण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. ती सरकारपर्यंत पोचवण्यासाठी १७ जुलै या दिवशी विहिंप आणि बजरंग दल यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘भजन दिंडी’ काढण्यात येणार आहे, अशी माहिती विहिंपचे प्रांत सहमंत्री श्री. विवेक कुलकर्णी यांनी दिली.

श्री. कुलकर्णी पुढे म्हणाले की, आषाढी एकादशीपासून विविध धार्मिक ठिकाणी चातुर्मास, पारंपरिक उत्सव, सप्ताह, प्रवचने आदी धार्मिक कार्यक्रम चालू होतात. यावरील बंधने सरकारने दूर करावीत. सरकारने वारकर्‍यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात; अन्यथा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात सरकारी पूजेसाठी येऊ देणार नाही. पंढरीच्या वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी नियम पाळून वारी करण्याची आमची सिद्धता आहे. संसर्ग टाळण्यासाठी दिवसा शक्य नसेल, तर वारकरी रात्री प्रवास करतील. गावात न थांबता माळरानावर मुक्काम केला जाईल.


वारीला विरोध म्हणजे सरकारने अस्मानी संकटांचा अपलाभ घेत पोलीस प्रशासनाच्या बळाने वारकर्‍यांवर जाणीवपूर्वक केलेले सुलतानी अत्याचार आहेत ! – ह.भ.प. शिवाजी मोरे, तुकाराम महाराजांचे वंशज

सरकारचा वारीला विरोध म्हणजे सरकारने अस्मानी संकटांचा लाभ घेत पोलीस प्रशासनाच्या बळाने वारकर्‍यांवर जाणीवपूर्वक केलेले सुलतानी अत्याचार आहेत. महाराष्ट्राचे ज्येष्ठ कीर्तनकार संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना केलेली अटक, त्यानंतर फसवून केलेली त्यांची स्थानबद्धता हा त्याचाच एक प्रकार आहे. भर रस्त्यात वारकर्‍यांचे पारंपरिक गणवेश उतरवायला लावून हिंदुत्वाचे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या भागवत धर्माच्या पताकाची अवहेलना करणार्‍या निरपराध संतांना अटक करून त्यांना अपराध्याची वागणूक देणार्‍या मुख्यमंत्र्यांनी वारकर्‍यांची तात्काळ क्षमा मागितली पाहिजे. जागोजागी अडवणूक केलेल्या सर्व वारकर्‍यांना सन्मानपूर्वक तात्काळ मुक्त करावे आणि त्यांच्यावर लावलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. शिवाजी मोरे यांनी केली आहे.


पारतंत्र्यात किंवा स्वतंत्र भारतात उपासनेसाठी धर्मसत्तेने कधीही राजसत्तेकडे अनुमती मागितली नाही ! – शंकर गायकर, क्षेत्रमंत्री विश्व हिंदू परिषद

मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकरणाचे नैतिक दायित्व स्वीकारून सरकारी पूजेसाठी पंढरपुरात येऊ नये. महाराष्ट्राची भूमी ही साधू-संतांची महान परंपरा लाभलेली पुण्यभूमी आहे. याच परंपरेतील वारी हा वारकरी संप्रदाय आणि वारकरी यांच्या उपासनेचा अन् महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. शेकडो वर्षांची पायी वारीची ही परंपरा मोगल, तसेच इंग्रजांच्या काळातही अबाधित होती; परंतु गेल्या वर्षी कोरोना संक्रमणामुळे पायी वारीची परंपरा खंडित झाली. पारतंत्र्यात किंवा स्वतंत्र भारतात उपासनेकरिता कधीही कुणाचीही अनुमती घेण्याची आवश्यकता भासली नाही किंवा धर्मसत्तेने कधीही राज्यसत्तेकडे तशी अनुमतीही मागितली नाही; परंतु आज वारकर्‍यांचा उपासनेचा अधिकार हिरावून घेतला जात आहे.