‘विठाई’ बसवरील चित्राद्वारे श्री विठ्ठलाची होत असलेली विटंबना रोखा ! – हिंदु जनजागृती समितीची परिवहनमंत्र्यांकडे मागणी
सोलापूर, १६ जुलै (वार्ता.) – शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात आरंभ करण्यात आलेली ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळा’ची ‘विठाई’ बससेवा लोकप्रिय झाली आणि तिचा राज्यभरात विस्तार करण्यात आला. श्री विठुमाऊलीच्या नावे आरंभ करण्यात आलेली ही बससेवा स्तुत्यच असून या माध्यमातून सरकारने वारकर्यांच्या श्रद्धांचा मान राखला आहे; मात्र सध्या ‘विठाई’च्या काही बसगाड्यांच्या बाहेरील भागात असलेल्या श्री विठ्ठलाच्या चित्रावर थुंकल्याचे डाग, चिखलाचे डाग, तसेच धूळ दिसून येत आहे. ही एकप्रकारे श्री विठ्ठलाच्या चित्राची विटंबनाच आहे. यासाठी ‘विठाई’ बसच्या बाहेर असलेले श्री विठ्ठलाचे चित्र त्वरित काढून श्री विठ्ठलाच्या चित्राची होत असलेली विटंबना रोखावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. यावर उपाय म्हणून श्री विठ्ठलाचे चित्र प्रत्येक बसच्या आतमध्ये एकाच ठिकाणी लावावे आणि प्रतिदिन त्या चित्राचे पूजन करून त्याचे पावित्र्य जपावे, अशी विनंतीही समितीने केली आहे.
या संदर्भातील निवेदन परब यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना संगणकीय पत्राद्वारे पाठवण्यात आले आहे. यांसह सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले, तर सोलापूर जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेले निवेदन नायब तहसीलदार संदीप लटके यांनी हे निवेदन स्वीकारले.
या निवेदनात म्हटले आहे की,
१. बसमधील प्रवासी जाणीवपूर्वक ही विटंबना करत नाहीत. तथापि ते खिडकीतून बाहेर थुंकणे, चूळ भरणे, तोंड धुणे, उलटी करणे आदी कृत्ये करतांना श्री विठुरायाच्या चित्रावर त्याचे शिंतोडे उडतात, तसेच सध्या पावसाळा असल्याने अनेकदा रस्त्यावरील चिखल श्री विठुरायाच्या चित्रावर उडतो. प्रतिदिन आपण ज्या विठ्ठलाला पुजतो, त्याला घाणीने माखलेले पहाणे, हे अतिशय वेदनादायी आहे.
२. अध्यात्मशास्त्रानुसार, ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असते’, म्हणजेच ‘जेथे देवतेचे नाव अन् रूप (चित्र) असते, तेथे देवतेची शक्ती कार्यरत असते (प्रत्यक्ष देवताच असते).’ या सिद्धांतानुसार जेथे श्री विठ्ठलाचे चित्र आहे, तेथे साक्षात् श्री विठुमाऊली असतेच; म्हणून ‘विठाई’ बसच्या बाहेर असलेल्या श्री विठ्ठलाच्या चित्राची विटंबना तात्काळ रोखावी, असे आवाहन समितीने केले आहे.