जपानमधील एका बौद्ध मंदिरात रोबोट करतो पूजाविधी !

पूजाविधी भावपूर्ण केला, तर त्यामुळे चैतन्य निर्माण होऊन त्याचा लाभ समाजाला होतो. रोबोट पूजा करील; मात्र ती भावपूर्ण असेल का ? प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ‘रोबोट’ पुजारी निर्माण करू शकतो; मात्र त्याच्यात भाव, ईश्‍वराप्रती शरणागती हे दैवी गुण कसे निर्माण करणार ? विज्ञानाची मर्यादा यातून दिसून येते !

टोकीयो (जपान) – जपानच्या क्योटो शहरात असलेल्या ४०० वर्षे प्राचीन कोदाइजी बौद्ध मंदिरात एकही पुजारी नाही. त्याऐवजी येथे रोबोटद्वारे धार्मिक विधी केले जातात. विशेष म्हणजे ‘अँड्रॉयड’ नामक हा रोबोट केवळ देवांची पूजाच नव्हे, तर भाविकांना धार्मिक ज्ञानदेखील देतो आणि त्यांच्या शंकांचे निरसनही करतो. हा रोबोट बौद्ध धर्मातील पालटत्या सूत्राप्रमाणे स्वतःच्या ज्ञानात भर घालत आहे. त्यामुळे भाविकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना तो योग्य उत्तर देतो. ‘हा ‘रोबोट’ पुजारी कधीही मरण पावणार नाही आणि पालटत्या काळाप्रमाणे तो स्वत: ला विकसित करणार’, असे सांगितले जात आहे. ६ फूट उंच असलेला ‘अँड्रॉयड’ हा मानवाप्रमाणे दिसतो. अँड्रॉयड सिलिकॉनपासून बनवण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा तोंडवळा, हात, खांदे अगदी मानवाप्रमाणे भासतात. अँड्रॉयडला बनवण्यासाठी १० लाख डॉलर रुपये खर्च करण्यात आले आहेत.