सावंतवाडीत एम्.टी.डी.सी.च्या कामातील भ्रष्टाचाराला शिवसेना आणि भाजप उत्तरदायी ! – परशुराम उपरकर, सरचिटणीस, मनसे
आरोप-प्रत्यारोप करण्यात राजकारणी सुसाट आणि भ्रष्टाचार करणारे मोकाट !
सावंतवाडी – शहरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एम्.टी.डी.सी.च्या) वतीने झालेल्या कामात अपहार झाल्याचे आरोप-प्रत्यारोप शिवसेना आणि भाजप या पक्षांकडून एकमेकांवर केले जात आहेत; मात्र हेच दोन्ही पक्ष यापूर्वी एकत्र सत्तेत होते. आता वेगळे झाल्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून ते जनतेला फसवत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार यांनी जनतेचा विकास न करता स्वतःचा विकास केला, हे जनतेने आता ओळखले पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
सावंतवाडी शहरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून झालेल्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे नगराध्यक्ष संजू परब यांनी केला, तसेच याला शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर आणि माजी नगराध्यक्ष उत्तरदायी असल्याचा आरोप केला होता; तर प्रत्युत्तरादाखल आमदार केसरकर यांनी शहरातील पाणपोया उभारण्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नगराध्यक्ष परब यांना लक्ष केले होते. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत उपरकर पुढे म्हणाले, ‘‘आमदार केसरकर पालकमंत्री असतांना निधी आणल्याचे सांगतात, मग तो निधी गेला कुठे ? ते दोघेही एकाच माळेचे मणी आहेत. आमदार केसरकर यांनी आणलेली ‘चांदा ते बांदा’ ही योजना चांगली होती; परंतु ती राबवण्यात आमदार केसरकर अल्प पडले. आमदार केसरकर यांनी भ्रष्टाचाराविषयी न बोलता याविषयी थेट विधानसभेत प्रश्न उपस्थित करून चौकशीची मागणी केली पाहिजे. शहरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कामात जो घोटाळा झाला, त्याला दोन्ही पक्षाचे नेते आणि पदाधिकारी उत्तरदायी आहेत.’’