घर, चाकरी आणि सेवा यांची योग्‍य सांगड घालत कठीण परिस्‍थिती स्‍वीकारून आनंदाने सेवा करणार्‍या कै. (श्रीमती) सुधा पाळंदेआजी (वय ८२ वर्षे) !

घर, चाकरी आणि सेवा यांची योग्‍य सांगड घालत कठीण परिस्‍थिती स्‍वीकारून आनंदाने सेवा करणार्‍या नौपाडा, ठाणे येथील ६४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या कै. (श्रीमती) सुधा पाळंदेआजी (वय ८२ वर्षे) !

नौपाडा, ठाणे येथील ६४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या श्रीमती सुधा मधुसूदन पाळंदे (वय ८२ वर्षे) यांचे २०.५.२०२१ या दिवशी निधन झाले. त्‍यांच्‍याविषयी त्‍यांची मुलगी सौ. वृषाली रवींद्र प्रभुदेसाई (पितांबरी उद्योग समुहाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्‍या पत्नी) आणि आजींच्‍या समवेत सेवा करणारे साधक यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कै. श्रीमती सुधा मधुसूदन पाळंदे

सौ. वृषाली रवींद्र प्रभुदेसाई (मुलगी), ठाणे. 

१. बालपण

‘आईचे बालपण अतिशय कष्‍टात गेले. तिच्‍या घरची आर्थिक परिस्‍थिती गरिबीची होती. आईला ५ भावंडे होती. आई सर्वांत मोठी होती. ती लहान भावंडांचे सर्व करून आजीला  (आईच्‍या आईला) घरकामात साहाय्‍यही करायची.

सौ. वृषाली रवींद्र प्रभुदेसाई

२. शिक्षण

२ अ. ‘मॅट्रिक’ची परीक्षा बाहेरून देऊन उत्तीर्ण होणे : आईला शिक्षणाची अतिशय आवड होती; पण त्‍या काळात ‘मुलींनी शिकून काय उपयोग ?’, असा दृष्‍टीकोन असल्‍याने तिचे ७ वी पर्यंतचे शिक्षण झाल्‍यावर आजीने तिला शाळेतून काढले; परंतु आईची शिकण्‍याची आवड पाहून आजोबांनी तिला बाहेरून ‘मॅट्रिक’च्‍या परीक्षेला बसवले. आई त्‍या परीक्षेत उत्तीर्ण झाली.

२ आ. अन्‍य कला शिकणे : आईला निरनिराळ्‍या गोष्‍टी शिकण्‍याचीही पुष्‍कळ आवड होती. ती भरतकाम, विणकाम, शिवणकाम इत्‍यादी करायची. ती मण्‍यांचे विविध प्राणीही बनवायची. तिने साईबाबा आणि अष्‍टविनायक यांची सुरेख चित्रेही काढली होती. ती कविताही करायची. तिने बेकरीचा अभ्‍यासक्रमही (कोर्सही) पूर्ण केला होता.

२ इ. पुष्‍कळ संघर्ष करून ‘परिचारिका’ या अभ्‍यासक्रमासाठी (नर्सिंगच्‍या कोर्ससाठी) प्रवेश मिळवणे, नंतर विविध रुग्‍णालयांत परिचारिकेची चाकरी करणे : आईला शेजार्‍यांकडून परिचारिकेच्‍या अभ्‍यासक्रमाविषयी (नर्सिंगच्‍या कोर्सविषयी) समजले. तिने पुष्‍कळ संघर्ष करून त्‍या अभ्‍यासक्रमासाठी प्रवेश मिळवला. तिने नागपूर येथे राहून परिचारिकेचे प्रशिक्षण पूर्ण केले. नंतर तिने वेगवेगळ्‍या रुग्‍णालयांत परिचारिकेची चाकरी केली. तिथे येणार्‍या समस्‍यांना ती धिराने सामोरी गेली. याच काळात तिने समाजसेवेचा अभ्‍यासक्रमही (Diploma in social work) पूर्ण केला.

३. लग्‍नानंतर घर आणि चाकरी यांची योग्‍य सांगड घालणे

आईचे लग्‍न झाल्‍यावर तिने घरातील सर्व कामे करून चाकरी केली. ती प्रतिदिन पहाटे ४ वाजता उठून ५ वाजता घरातून निघून सकाळी ७ वाजता कार्यालयात पोचायची अन् दुपारी ४ वाजता कार्यालयातून निघून संध्‍याकाळी ५.३० वाजता घरी परत यायची.

४. मफतलाल गटाच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या शस्‍त्रकर्म शिबिरातील रुग्‍णांची एक मास विनामूल्‍य सेवा केल्‍याने महाराष्‍ट्र शासनाच्‍या वतीने देण्‍यात येणारा ‘गुणवंत कामगार’ हा पुरस्‍कार राज्‍यपालांच्‍या हस्‍ते मिळणे

आईने शिवडी येथील ‘मफतलाल’ यांच्‍या ‘न्‍यू चायना’ मिलमध्‍ये ४१ वर्षे ‘कंपाऊंडर’ची चाकरी केली. मफतलाल गटाच्‍या वतीने गुजरातमधील ‘दाहोद’ येथे गरीब आणि अंध लोकांसाठी विनामूल्‍य शस्‍त्रकर्म शिबिर आयोजित केले होते. तिथे १,००८ शस्‍त्रकर्मे करण्‍यात आली. आईने तिथे एक मास विनामूल्‍य सेवा केली. महाराष्‍ट्र शासनाच्‍या वतीने प्रत्‍येक वर्षी ‘गुणवंत कामगार’ हा पुरस्‍कार दिला जातो. राज्‍यपालांच्‍या हस्‍ते आईला हा पुरस्‍कार देण्‍यात आला होता.

५. लहानपणापासून देवाची आवड असणे

आईची लहानपणापासून देवावर पुष्‍कळ श्रद्धा होती. ती कार्यालयात जातांना गाडीत नामजप करायची आणि कार्यालयात वेळ मिळाल्‍यास ‘मानसपूजा’ करायची. अनगाव जवळील कवाड (भिवंडी, जिल्‍हा ठाणे) येथे संत सखाराम महाराज यांची संजीवन समाधी आहे. लहानपणी आई आजोबांच्‍या समवेत तिथे जायची. ती ‘चिद़्‍घन, चिद़्‍घन (चैतन्‍यमय, ज्ञानमय)’, असा नामजप करायची. ती कुठल्‍याही संकटात ‘चिद़्‍घन’, असा माऊलीचा धावा करायची.

६. सनातन संस्‍थेशी संपर्क आणि साधनेला प्रारंभ

६ अ. सनातन संस्‍थेशी संपर्क झाल्‍यावर संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करणे आणि भजनांची आवड असूनही ‘सेवेसाठी वेळ मिळावा’, यासाठी भजनीमंडळांत जाणे बंद करणे : साधारणपणे वर्ष १९९८ मध्‍ये आई सनातन संस्‍थेच्‍या संपर्कात आली. तेव्‍हापासून तिने ‘कुलदेवता’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्‍यास प्रारंभ केला. ती नियमितपणे सत्‍संगाला जाऊ लागली. ती तिच्‍या संपर्कातील प्रत्‍येकाला सत्‍संगात समजलेली साधना सांगायची. आईला भजनांचीही आवड होती. भजनीमंडळांच्‍या समवेत ती निरनिराळ्‍या ठिकाणी भजने म्‍हणायला जायची; परंतु नंतर ‘साधनेला अधिक वेळ देता यावा’, यासाठी तिने भजनीमंडळांत जाणे बंद केले.

६ आ. सेवेची तळमळ

१. नौपाडा, ठाणे येथे प्रतिदिन सनातन संस्‍थेच्‍या ग्रंथांचे प्रदर्शन असायचे. तिथे सेवेला जाण्‍यासाठी विचारल्‍यावर आईचा नेहमीच होकार असायचा. वयोमानानुसार तिला शारीरिक अडचणी असायच्‍या; पण त्‍यावर मात करून ती तिथे सेवेला जायची. ‘सेवेला कधीही ‘नाही’ म्‍हणायचे नाही’, असे ती आम्‍हाला सांगायची.

२. ज्‍येष्‍ठ नागरिकांचे काही कार्यक्रम असायचे. तेव्‍हा आई तिथे सनातन संस्‍थेविषयी माहिती सांगायची आणि सनातनच्‍या उत्‍पादनांचे वितरणही करायची.

७. परिस्‍थिती स्‍वीकारून नामजप करत आनंदाने पतीची सेवा करणे

माझ्‍या वडिलांना एक असाध्‍य आजार झाला होता. त्‍यामुळे ते ३ वर्षे अंथरूणाला खिळून होते. अनेक उपचार करूनही त्‍यांना गुण आला नाही. आईने त्‍यांची सेवा नामजप करत आनंदाने केली. ती या कठीण परिस्‍थितीला धिराने सामोरी गेली. बाबा आईला म्‍हणायचे, ‘‘मला मरण यावे’, अशी तू देवाकडे प्रार्थना कर. म्‍हणजे आपल्‍या दोघांची यातून सुटका होईल.’’ तेव्‍हा आई म्‍हणायची, ‘‘मी अशी प्रार्थना करणार नाही. तुम्‍ही जितके दिवस जगाल, तितके दिवस मी आनंदाने तुमची सेवा करीन. आपल्‍याला मिळालेले आयुष्‍य हा देवाचा प्रसाद आहे.’’

८. सतत श्रीकृष्‍णाच्‍या अनुसंधानात राहून आध्‍यात्‍मिक त्रासावर मात करून ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठणे

आईला आध्‍यात्‍मिक त्रास होता. तिला स्‍वप्‍नात काळे नाग दिसायचे. रात्री झोपल्‍यावर तिच्‍या बाजूला रक्‍ताचे ठसे उमटायचे. वर्ष २०१६ मध्‍ये या सर्व त्रासांवर मात करून आईने ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठली. बोलतांना अनेक वेळा ‘तिचे श्रीकृष्‍णाशी काय संभाषण झाले ? बाळकृष्‍णाने कशा खोड्या काढल्‍या ?’, याविषयी ती आम्‍हाला सांगायची. तिचे सतत देवाशी अनुसंधान असायचे.

९. आईची परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना भेटण्‍याची इच्‍छा पूर्ण होणे आणि तिने ते क्षणमोती हृदयात साठवून ठेवणे

‘आईला रामनाथी आश्रमात रहाण्‍याची आणि गुरुदेवांना (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना) भेटण्‍याची तीव्र इच्‍छा होती. देवाच्‍या कृपेने तिची ही इच्‍छा पूर्ण झाली. आम्‍हा काही साधकांचे गोवा येथील रामनाथी आश्रमात जाण्‍याचे नियोजन करण्‍यात आले होते; परंतु गोव्‍याला जाण्‍याच्‍या आदल्‍या दिवशी सर्वत्र मुसळधार पाऊस पडून पूर परिस्‍थिती निर्माण झाली. पुष्‍कळ माणसे लांब पल्‍ल्‍यांच्‍या रेल्‍वेगाड्यांमध्‍ये अडकली होती. त्‍यामुळे आम्‍ही गोव्‍याला जायचेे रहित करण्‍याचा विचार करत होतो; परंतु गुरुदेवांच्‍या कृपेने दुसर्‍या दिवशी परिस्‍थिती पूर्णपणे पालटली आणि आम्‍ही सुखरूपपणे गोव्‍याला पोचलो. आम्‍ही ४ दिवस रामनाथी आश्रमात राहिलो. तेथे आमची परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याशी भेट झाली. ते क्षणमोती आईने हृदयात साठवून ठेवले होते. ती परम पूज्‍यांच्‍या भेटीविषयी अनेक वेळा बोलायची.

१०. मनाने खंबीर असल्‍यामुळे शेवटच्‍या क्षणापर्यंत एकटीने रहाणे

आई मनाने अतिशय खंबीर होती. शेवटपर्यंत ती एकटी रहायची. २५.५.२०२१ या दिवशी ती माझ्‍याकडे नेहमीसाठी रहायला येणार होती; परंतु २०.५.२०२१ या दिवशी तिचे निधन झाले. आम्‍हा सर्वांसाठी हा अनपेक्षित धक्‍का होता; कारण तिला उच्‍च रक्‍तदाब किंवा मधुमेह यांसारखे कुठलेही आजार नव्‍हते. अगदी आदल्‍या दिवशीपर्यंत ती व्‍यवस्‍थित फिरत होती.’

(२२.५.२०१९)

साधक श्री. नंदकिशोर ठाकूर आणि सौ. नम्रता ठाकूर, नौपाडा, ठाणे.

अ. सेवेची तळमळ आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यावर अपार श्रद्धा असणार्‍या श्रीमती सुधा पाळंदेआजी ! : ‘श्रीमती सुधा पाळंदेआजी यांची परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍यावर अपार श्रद्धा होती. त्‍यामुळे त्‍या वयस्‍कर असूनही अवघड मार्ग ओलांडून नियमित ग्रंथप्रदर्शनाच्‍या ठिकाणी सेवेसाठी यायच्‍या. त्‍या त्‍यांच्‍या मैत्रिणींना सनातनची उत्‍पादने देणे, ‘सनातन पंचांग’ वितरण करणे, गुरुपौर्णिमा महोत्‍सवासाठी अर्पण गोळा करणे इत्‍यादी सेवाही आनंदाने करायच्‍या. त्‍यांच्‍यातील सेवेचा उत्‍साह बघून पुष्‍कळ कृतज्ञता वाटायची. त्‍या घरात एकट्याच रहात असूनही त्‍याविषयी त्‍यांचे कधीही गार्‍हाणे नसायचे. ‘त्‍या सतत अनुसंधानात आहेत’, असे आम्‍हाला जाणवायचे.

‘गुरुमाऊलीने आम्‍हाला या गुणी आजींविषयी लिहिण्‍याची संधी दिली’, यासाठी गुरुमाऊलीच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– (२२.५.२०२१)

आईच्‍या जाण्‍याने आपण कायमचे एकटे पडतो ।
वृद्धापकाळाने आई देवाच्‍या कुशीत विसावली ।
तिच्‍या अचानक जाण्‍याने हेलावले माझे मनही ॥ १ ॥

आई असतांना आपण सदैव लहान असतो ।
तिच्‍या जाण्‍याने अचानक मोठे होतो ॥ २ ॥

तिच्‍या जाण्‍याबरोबर बालपण जाते संपून ।
एक रिक्‍त पोकळी रहाते मनात भरून ॥ ३ ॥

ती असतांना ‘ती सदैव असणारच आहे’, असे गृहित धरतो ।
तिच्‍या जाण्‍याने आपण कायमचे एकटे पडतो ॥ ४ ॥

ती जिथे असेल, तिथे आनंदात असावी, असे सदैव वाटते ।
तिची आठवण मनाच्‍या कोपर्‍यात
कुठेतरी जागी असते ॥ ५ ॥

– सौ. वृषाली प्रभुदेसाई (मुलगी), ठाणे. (२१.६.२०२१)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक