‘नमामि चंद्रभागा’ योजना प्रत्यक्षात कधी ?
देशातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने नद्या शुद्धीकरणाचे काम हाती घेतले. त्या अंतर्गत ‘नमामि गंगा’ प्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील चंद्रभागा नदीचा वर्ष २०१६ मध्ये ‘नमामि चंद्रभागा’ योजनेच्या अंतर्गत समावेश करण्यात आला. तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘नमामि चंद्रभागा’ अभियानाची घोषणा करून २० कोटी रुपयांची तरतूदही केली होती. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांसह अनेक मंत्र्यांनी पंढरपूर येथे येऊन या अभियानाचा प्रारंभ केला; मात्र गेल्या दीड वर्षांत राज्य सरकारने या संदर्भात एकही बैठक घेतलेली नाही, तसेच एका रुपयाच्याही निधीची तरतूद केलेली नाही. त्यामुळे ही योजना अद्याप कागदावरच राहिली आहे. पंढरपूर तालुक्यातील चंद्रभागा नदीत अनेक कारखाने आणि उद्योगांचे रसायनमिश्रित पाणी, तसेच नगरपालिकांचे सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत आहे आणि जलचर प्राण्यांसमवेत नदीकाठच्या ग्रामस्थांच्याही आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यासाठी केंद्र सरकारने ‘नमामि चंद्रभागा’ या योजनेतून जिल्ह्यातील चंद्रभागा नदीमध्ये थेट येणार्या पाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी नदीत सोडण्याचा संकल्प केला होता; मात्र त्यावर अजूनही कार्यवाही चालू झालेली नाही.
‘माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा ॥’ या ओळीत संत एकनाथ महाराजांनी वारकर्यांच्या मनातील भावना मार्मिकपणे शब्दबद्ध केल्या आहेत. वारकर्यांसाठी चंद्रभागा प्रिय आहे. चंद्रभागा म्हणजेच भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे झालेला आहे. भीमेच्या खोर्याची एकूण लांबी ७० सहस्र ६१४ चौरस किलोमीटर आहे, तसेच त्यातील ७५ टक्के खोरे महाराष्ट्रात आहे. त्यामुळे ‘नमामि चंद्रभागा’ ही योजना केवळ पंढरपूरपुरती मर्यादित न ठेवता उगमापासून संगमापर्यंत नदीची स्वच्छता करणे आवश्यक आहे. साखर कारखान्यांद्वारे मिसळणारे सांडपाणी रोखण्याची व्यवस्था करण्यासह ते मिसळणार्यांवर कठोर कारवाईही आवश्यक आहे. तसेच योजनांची कार्यवाही होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करायला हवेत. सरकारने इच्छाशक्ती दाखवून खर्या अर्थाने चंद्रभागेचे पावित्र्य टिकवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे वारकरी आणि भाविक यांना वाटते !
– वर्षा कुलकर्णी, सोलापूर