देशी गोवंशियांची शुद्धता राखणे महत्त्वाचे !
देशी गोवंश अनेक प्रकारे उपयुक्त आहे. त्याचे संवर्धन आणि जतन यांसाठी आवश्यक ते प्रयत्न होत नाहीत. संकरित गोवंशियांची पैदास केल्याने अनुवांशिकदृष्ट्या लाभणारी शुद्धता लोप पावत आहे. याविषयीचा ऊहापोह खालील लेखात केला आहे.
देशी गोवंश सांभाळण्यातील आव्हाने
पालटती पर्यावरणीय संरचना, पालटती कुटुंबव्यवस्था, लिंग विशिष्ट वीर्याचा उपयोग (सॉर्टेड सिमेन) आणि अभ्यास, पशूंना आहार देण्याच्या पद्धतीमध्ये वेळोवेळी होणारे पालट अशी एक ना अनेक आव्हाने देशी गोवंश सांभाळण्यासाठी उभी ठाकली आहेत. त्यामुळे देशी गोवंशियांचे संवर्धन आणि जतन करण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या आव्हानांचा सामना करता आला, तर निश्चितच देशी गोवंशियांचे संवर्धन आणि जतन करण्याचा उद्देश सफल होईल.
शेती व्यवसायाचा र्हास
भारतामध्ये अनेक प्रजातीचे गोवंश आहेत. देवतांचे वाहन म्हणून अनेक धर्मग्रंथांमध्ये पशूधनाचा उल्लेख आढळून येतो. त्यामुळे भारतामध्ये पशूधनाला आध्यात्मिक महत्त्वही आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी कुटुंबाचा घटक असलेले पशूधन सार्वजनिक उत्सवातही सहभागी करून घेतले जाते; परंतु पाश्चिमात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे भारतामधील एकत्र कुटुंबपद्धत उद़्ध्वस्त होत चालली आहे. त्यामुळे शेतभूमींचे कुटुंबांमध्ये विभाजन होऊन शेती व्यवसायाचा र्हास होत चालला आहे. शेती व्यवसायाला पूरक असणारा पशूपालन व्यवसायही लयाला चालला आहे.
पशूधनाची शुद्ध वंशावळ राखण्यासाठी प्रयत्न हवेत !
पशूपालन व्यवसाय अल्प होत असल्याने पशूधनाची शुद्ध जातीची वंशावळ संपुष्टात येत आहे. वातावरणातील पालट हेही याचे एक मुख्य कारण आहे. देशी गोवंशियांचे महत्त्व लक्षात घेता त्यांच्या संवर्धनासाठी पशूपालक किंवा पैदासकार संघ यांनी प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची आवश्यकता आहे. पशूंची प्रजनन समस्या सोडवणे, विशेष पशूंकडे लक्ष देणे, जनुकीय सुधारणा, अशा विविध गोष्टींवर भर दिला गेला पाहिजे. शेतकर्यांचा पशूपालनाकडे कल वाढावा, यासाठी दूध उत्पादन वाढीवर भर दिला पाहिजे. शेतकरी, पशूपालक आणि पैदासकार संघ यांनी अनुवांशिक सुधारित जातींसाठी जैवतंत्रज्ञानाचा उपयोग वाढवला पाहिजे. जनावरांच्या बाजारपेठांचा अभ्यास करून त्यातील पालट वेळोवेळी लक्षात घेऊन पशूपालनामध्ये योग्य ते पालट केले पाहिजेत.
अनुवांशिक शुद्धता महत्त्वाची !
देशात सध्या ‘गोठा व्यवस्थापन’ ही संकल्पना नव्याने उदयास येऊ लागली आहे. यामध्ये केवळ गोवंशियांपासून मिळणार्या उत्पन्नावर भर न देता, गोवंशियांची अनुवंशिक शुद्धता राखणेही महत्त्वाचे आहे. सध्या सर्वच जनावरे एकाच गोठ्यात ठेवल्यामुळे त्यांच्यामध्ये अनुवंशिक शुद्धता राखली जात नाही. परिणामी चांगल्या आणि योग्य प्रजातीची उत्पत्ती खुंटते. सध्या देशात केवळ २५ टक्के जनावरे शुद्ध वंशावळीची आहेत. वळू निवडीमध्ये वंशावळीला डावलले जात आहे. खिलार जातीच्या जनावरांविषयीही असेच घडत आहे. त्यामुळे गोठ्यातील पशूपालनामध्ये तांत्रिक गोष्टी पडताळून त्यांची काटेकोरपणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. अन्यथा अनुवंशिक शुद्धता लयास जाऊन देशी गोवंश संपूर्णत: नष्ट होण्यास वेळ लागणार नाही.
जैवविविधता जपली जाणे महत्त्वाचे
सृष्टीच्या संवर्धनासाठी जैवविविधता जपली गेली पाहिजे. पृथ्वीवरील जैवविविधतेचा विचार केला, तर निसर्गात सध्या डोळ्यांनी न दिसणार्या विषाणूंपासून ते मोठ्या प्राण्यांपर्यंत अब्जावधी प्रजाती उपलब्ध आहेत. जीवसृष्टीच्या संवर्धनामध्ये गोमातेचे योगदान सर्वाधिक आहे. त्यामुळेच तिला ‘गोमाता’ म्हटले जाते. गोमातेपासून मिळणारे दूध, गोमूत्र आणि गोमय यांचा उपयोग मनुष्याच्या सुदृढ आरोग्यासाठी महत्त्वाचा असल्याचे शास्त्राने सिद्ध झाले आहे. विविध आजारांमध्ये औषध म्हणून गोमूत्र आणि कोरोना विषाणूपासून रक्षणासाठी केल्या जाणार्या अग्निहोत्रामध्ये गोमयाचा उपयोग होतो. त्यामुळे देशी गोवंशियांच्या संवर्धनावर भर दिल्यास निश्चितच जैवविविधतेच्या संवर्धनाला मोठा हातभार लागणार आहे.
लोकचळवळीची आवश्यकता !
शेतकरी बांधव, पशूपालक आणि पैदासकार संघ यांची एक मोठी लोकचळवळ उभी राहिल्याविना गोवंशियांच्या संवर्धनाच्या लढ्याला अपेक्षित यश येणार नाही. यासाठी विविध सरकारी योजनांवर प्रभावीपणे कार्यवाही झाली पाहिजे. महाराष्ट्रासह काही राज्यांत गोवंशियांच्या हत्याबंदीसारखे कठोर कायदे केले गेले आहेत; मात्र अजूनही त्यांची प्रभावी कार्यवाही केली जात नाही, हे दुर्दैवी आहे. भाकड जनावरांना कसायांच्या कह्यात देणे, कसायांनी गोमांसासाठी जनावरांची पशूवधगृहात हत्या करणे, हे प्रकार थांबले पाहिजेत. देशी गोवंश जपला, तरच जैवविविधता जपली जाईल, हा विश्वास शेतकरी आणि संपूर्ण समाजमन यांच्यावर बिंबवला पाहिजे. त्यासाठी पशूपालक आणि पैदासकार संघ यांनी गोवंशियांच्या रक्षणासाठी सिद्ध झाले पाहिजे. या दोघांनी स्वत:चे उत्तरदायित्व लक्षात घेऊन विविध बाजारपेठांना काय आवश्यक आहे ? याचा अभ्यास करून विपणन (ब्रॅण्डींग) केले पाहिजे. त्यासाठी सामाजिक संकेतस्थळे, प्रसिद्धीमाध्यमे आदींचा सयुक्तिक उपयोग करून घेतला पाहिजे. पशूपालक आणि पैदासकार संघ यांना सरकारने विपणनासाठी विशेष निधीची तरतूद केली पाहिजे.
– श्री. राहुल कोल्हापुरे, सातारा