सनातनच्या रामनाथी आश्रमात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला गती देण्यासाठी उभारलेल्या धर्मध्वजातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे
अध्यात्माविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
धर्मध्वजावरील एका बाजूकडील सिंहासनाधिष्ठित श्रीरामाचे चित्र आणि दुसर्या बाजूकडील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रभु श्रीरामाच्या रूपातील चित्र यांच्या सकारात्मक ऊर्जेत भेद आढळून आल्याचे कारण‘धर्मध्वजाच्या एका बाजूला सिंहासनावर बसलेल्या प्रभु श्रीरामाचे चित्र आहे. ते निर्गुण-सगुण स्तरावर अप्रकट स्वरूपात कार्यरत असून त्याचे कार्य अधिकतर काळाच्या स्तरावर चालणारे आहे. धर्मध्वजाच्या दुसर्या बाजूला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रभु श्रीरामाच्या रूपातील चित्र आहे. ते प्रकट स्वरूपात सगुण-निर्गुण स्तरावर कार्यरत आहे; कारण परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य सध्या चालू आहे. असे असल्याने आरंभी धर्मध्वजाच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या चाचणीमध्ये धर्मध्वजाच्या श्रीरामाचे चित्र असलेल्या बाजूच्या छायाचित्राची सकारात्मक ऊर्जा १८९.५ मीटर, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रभु श्रीरामाच्या रूपातील चित्र असलेल्या बाजूच्या छायाचित्राची सकारात्मक ऊर्जा २९८.१ मीटर आढळली. कार्य प्रकट स्वरूपात सगुण स्तरावर अधिक प्रमाणात चालू असल्यास सकारात्मक ऊर्जा अधिक असते. आरंभी धर्मध्वजाची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करून झाल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धर्मध्वजाला हस्तस्पर्श केला. त्यांच्या हस्तस्पर्शामुळे धर्मध्वजाच्या दोन्ही बाजूंकडील चित्रांमध्ये त्यांच्याकडून एकाच वेळी चैतन्य प्रक्षेपित झाले. त्यानंतर धर्मध्वजाच्या दोन्ही बाजूंची छायाचित्रे काढण्यात आली आणि त्या छायाचित्रांची पुन्हा ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. तेव्हा असे लक्षात आले, ‘धर्मध्वजाच्या दोन्ही बाजूंच्या छायाचित्रांच्या सकारात्मक ऊर्जेत दुपटीहून अधिक आणि सारख्याच प्रमाणात वाढ झाली.’ – सद़्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. |
‘सप्तर्षींच्या आज्ञेने १४.५.२०२१ या दिवशी, म्हणजे अक्षय्य तृतीयेला सनातनच्या रामनाथी आश्रमाच्या परिसरातील श्री तन्नोटमाता, त्रिनेत्र गणेश आणि व्यास शिळा यांच्या मंदिराच्या जवळ ६ मीटर उंचीच्या स्तंभावर भगव्या रंगाच्या धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. या भगव्या रंगाच्या कापडी ध्वजावर एका बाजूला सिंहासनावर बसलेल्या प्रभु श्रीरामाचे आणि दुसर्या बाजूला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रभु श्रीरामाच्या रूपातील चित्र आहे. या धर्मध्वजाचे पूजन आणि त्याची स्थापना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केली. या धर्मध्वजातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत कापडी धर्मध्वजाचे पूजन करण्यापूर्वी धर्मध्वजाची दोन्ही बाजूंनी छायाचित्रे काढण्यात आली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कापडी धर्मध्वजाला हस्तस्पर्श करण्यापूर्वी आणि हस्तस्पर्श केल्यानंतर धर्मध्वजाची पुन्हा दोन्ही बाजूंनी छायाचित्रे काढण्यात आली. या सर्व छायाचित्रांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.
१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण – धर्मध्वजाच्या छायाचित्रांतून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) प्रक्षेपित होणे : धर्मध्वजाच्या छायाचित्रांमध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच आढळली नाही. धर्मध्वजाच्या छायाचित्रांमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असल्याचे पुढील सारणीतून लक्षात येते.
वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.
१. धर्मध्वजाच्या दोन्ही बाजूंकडील छायाचित्रांमध्ये आरंभी (परात्पर गुरु डॉक्टरांनी धर्मध्वजाला हस्तस्पर्श करण्यापूर्वी) पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती.
२. परात्पर गुरु डॉक्टरांनी धर्मध्वजाला हस्तस्पर्श केल्यानंतर त्या धर्मध्वजाच्या दोन्ही बाजूंकडील छायाचित्रे काढण्यात आली. या छायाचित्रांमध्ये आधीच्या तुलनेत पुष्कळ अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असल्याचे आढळून आले. यातून ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी धर्मध्वजाला हस्तस्पर्श केल्यानंतर त्या धर्मध्वजातील चैतन्यात पुष्कळ अधिक प्रमाणात वाढ झाली’, असे लक्षात येते.
२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. सनातनच्या रामनाथी आश्रमात स्थापन करायच्या धर्मध्वजात आरंभीच पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे : एखाद्या ध्वजातून प्रक्षेपित होणारी स्पंदने ध्वजस्थापनेचा उद्देश, त्या ध्वजाचा आकार, ध्वजावर असलेले चिन्ह, ध्वज बनवण्यासाठी उपयोगात आणलेले साहित्य, उदा. कापडाचा प्रकार, कापडाचा रंग इत्यादी अनेक घटकांवर अवलंबून असतात. हे घटक जितके सात्त्विक असतील, तितका तो ध्वजही सात्त्विक बनतो. सनातनच्या रामनाथी आश्रमात सप्तर्षींच्या आज्ञेने स्थापन केलेला धर्मध्वज पुष्कळ सात्त्विक आहे. ‘या धर्मध्वजाच्या स्थापनेमुळे सर्वत्र हिंदु धर्माची पुष्कळ कीर्ती होईल आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला गती येईल’, असे आशीर्वचन सप्तर्षींनी दिले होते. तो धर्मध्वज स्थापन करण्याचा व्यापक आणि सात्त्विक उद्देश आहे. या धर्मध्वजाचा आकार त्रिकोणी असून तो भगव्या रंगाचा आहे. सप्तर्षींच्या आज्ञेनुसार धर्मध्वजावर एका बाजूने प्रभु श्रीराम आणि दुसर्या बाजूने श्रीरामरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांची चित्रे घेतलेली आहेत. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या तत्त्वानुसार जेथे श्रीरामाचे रूप आहे, तेथे श्रीरामाची शक्ती (चैतन्य) आहे. या धर्मध्वजातून श्रीरामतत्त्व आणि सध्याच्या कलियुगात कार्यरत झालेले श्रीविष्णूचा अंशावतार असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील श्रीविष्णुतत्त्व प्रक्षेपित होत आहे. (परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा अंशावतार आहेत’, असे सप्तर्षींनी नाडीपट्टीतून सांगितले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये ५ टक्के श्रीविष्णुतत्त्व आहे.) त्यामुळे या धर्मध्वजामध्ये आरंभीच (धर्मध्वजाला परात्पर गुरु डॉक्टरांनी स्पर्श करण्यापूर्वीच) पुष्कळ प्रमाणात चैतन्य असल्याने त्यामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती.
२ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धर्मध्वजाला हस्तस्पर्श केल्यानंतर त्यातील चैतन्यात पुष्कळ अधिक प्रमाणात वाढ होण्याचे कारण : श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांच्या चैतन्यमय हस्तस्पर्शाने धर्मध्वजातील श्रीरामतत्त्व जागृत होऊन कार्यरत झाले. त्यामुळे त्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात (दुपटीहून अधिक प्रमाणात) वाढल्याचे या चाचणीतून लक्षात आले. धर्मध्वजातील श्रीरामतत्त्व कार्यरत झाल्याने सप्तर्षींनी दिलेल्या आशीर्वादाप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला गती आल्याची प्रचीती आली.
‘धर्मध्वजाच्या स्थापनेमुळे सर्वत्र हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला गती येईल’, असे सप्तर्षींनी आशीर्वचन दिले आहे. यासाठी सप्तर्षींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२७.५.२०२१)
ई-मेल : mav.research2014@gmail.com