‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव २०२०’च्या आयोजनाच्या सेवेत सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांनी अडचणी दूर झाल्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती !
‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव २०२०’च्या आयोजनाच्या सेवेत आरंभी स्थुलातून तांत्रिक वाटणार्या अडचणी सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या आणि त्यांनी स्वतः केलेल्या नामजपादी उपायांनी दूर झाल्याच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती !
‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्ये सनातन आणि एस्.एस्.आर्.एफ्. यांच्या संतांच्या संदर्भात येत असलेल्या लेखांमुळे ‘पुढे मी नसेन, तेव्हा साधकांना मार्गदर्शन कोण करणार ?’,ही माझी काळजी पूर्णपणे दूर होऊन मी निश्चिंत झालो !‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमध्ये सनातन आणि एस्.एस्.आर्.एफ्.च्या अनेक संतांच्या संदर्भात साधकांनी लिहिलेले लेख काही वर्षे प्रसिद्ध होत आहेत. त्यांत संत आणि साधक यांनी लिहिलेली संतांची गुणवैशिष्ट्ये, शिकवण, त्यांच्याविषयी साधकांना आलेल्या अनुभूती इत्यादी विषय वाचून ‘पुढे मी नसेन तेव्हा साधकांना मार्गदर्शन कोण करणार ?’, ही माझी काळजी पूर्णपणे दूर झाली आहे. उलट मला वाटले, ‘मी प्रकृती अस्वास्थ्यामुळे कुठेच जाऊन साधकांना भेटू शकत नाही. याउलट सनातनचे संत साधकांना नियमितपणे भेटतात. या भेटींमुळे साधकांची प्रगती जलद होत आहे, तसेच संस्थेचे कार्यही झपाट्याने वाढत आहे.’ यामुळे मला आनंद झाला ! या आपत्काळातही सनातनच्या साधकांना संतांच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे साधनेत लाभ होत आहे. सनातनची शिकवण अशीच पुढे वृद्धींगत होऊन साधक साधनेत पुढे पुढे जाणार आहेत आणि हिंदु राष्ट्राची धुरा सांभाळणार आहेत. त्यामुळे मला काळजी वाटत नाही. यासाठी मी माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या आणि देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘वर्ष २०२० मध्ये कोरोना महामारीच्या कारणास्तव दळणवळण बंदी असल्यामुळे प्रतिवर्षीप्रमाणे सभागृहात प्रत्यक्षपणे गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करणे शक्य नव्हते, तरीही प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने ‘साधक आणि जिज्ञासू यांना या दिवशी कार्यरत असलेल्या गुरुतत्त्वाचा अधिकाधिक लाभ व्हावा’, यासाठी ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आलेे. या वर्षी ११ भाषांमध्ये गुरुपौर्णिमेच्या प्रवचनांचे ‘ऑनलाईन’ प्रक्षेपण करण्याचे नियोजन करण्यात आलेे.
या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमेचा सर्व समाजाला लाभ होणार होता. त्यामुळे या सेवेची व्याप्तीही बरीच मोठी होती. यामध्ये ‘चित्रीकरण करणे, काही चित्रफितींचे संकलन करणे, स्लाईड बनवणे, प्रत्यक्ष सोहळ्याच्या वेळी प्रक्षेपण करणे’, अशा विविध प्रकारच्या सेवा साधक करत होते. या सेवा करतांना साधकांना अनेक अडचणी आल्या. त्या अडचणींचे स्वरूप तांत्रिक वाटत असले, तरीही तांत्रिकदृष्ट्या अनुभवी आणि प्रशिक्षित साधकांनी सर्व प्रयत्न करूनही त्यांवर काही उपाय सापडत नव्हते. जवळपास प्रत्येक सेवेत काही ना काही अडचणी आल्या आणि त्यामुळे सेवांची गती उणावून ‘काही भाषांतील कार्यक्रम रहित करावा लागू शकतो’, अशी परिस्थिती निर्माण झाली.
स्थुलातून तांत्रिक वाटणार्या अडचणी साधकांनी रामनाथी आश्रमात सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांना सांगितल्या. सद़्गुरु काकांनी सूक्ष्म परीक्षण करून साधकांना नामजपादी उपाय करायला सांगितले आणि काही वेळा त्यांनी स्वतःच उपाय केले. त्यामुळे सेवेतील अडचणी दूर झाल्या आणि सर्व कार्यक्रम होऊ शकले. साधकांना बुद्धीच्या स्तरावरील सेवा करतांनाही गुरुकृपेने बुद्धीअगम्य अनुभूती घेता आल्या. ‘अडचणी आरंभी स्थुलातील आणि भौतिक स्तरावरील दिसत असल्या, तरी त्यांचे मूळ आध्यात्मिक असते’, हे साधकांना शिकायला मिळाले. सेवांमध्ये कितीही अडचणी आल्या, तरी सद़्गुरु काकांनी सांगितलेल्या उपायांमुळे या सेवांचा ताण न येता साधकांना अनुभूती आल्या आणि आनंद मिळाला. साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
श्री. अनमोल करमळकर, कोल्हापूर
१. माहितीजाल (इंटरनेट) बंद पडल्याने प्रवचनाचे प्रक्षेपण करण्याची सेवा करण्यात अडचण येणे, सद़्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर इंटरनेटची सुविधा पूर्ववत् चालू होणे आणि दिवसभर त्या संदर्भात कोणतीही अडचण न येणे : ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे ५.७.२०२० या दिवशी माझ्याकडे एका भाषेतील प्रवचनाचे प्रक्षेपण करण्याची सेवा होती; पण एक दिवस आधी, म्हणजे ४ जुलैला रात्रीपासून माझ्याकडे माहितीजाल (इंटरनेट) अकस्मात् बंद झाले आणि ते ५ जुलैला सकाळपर्यंत चालू झाले नाही. पुष्कळ प्रयत्न करूनही माहितीजालाची सुविधा देणार्या आस्थापनाला संपर्क होत नव्हता. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या प्रवचनाचे प्रक्षेपण करण्याची सेवा करण्यात अडचण निर्माण झाली होती. ही अडचण सद़्गुरु गाडगीळकाकांना सांगितल्यावर त्यांनी निरोप दिला, ‘‘तुम्ही ‘महाशून्य’ हा नामजप न्यूनतम ३० मिनिटे करा.’’ त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी हा नामजप केला. त्यानंतर माझ्याकडील इंटरनेट सुविधा पूर्ववत् चालू झाली आणि संपूर्ण दिवस इंटरनेटच्या संदर्भात कोणतीही अडचण आली नाही.’
श्री. गणेश तांबे, पनवेल, रायगड.
१. ‘माझ्याकडेही वरीलप्रमाणे इंटरनेटची अडचण निर्माण झाली होती. त्या वेळी सद़्गुरु काकांनी ‘निसर्गदेवो भव ।’ हा जप करायला सांगितला. तो २० ते ३० मिनिटे केल्यावर इंटरनेटची अडचण दूर झाली.’
श्री. संजय इंगळे, पुणे
१. संकलित झालेली चित्रफीत अंतिम करण्याची प्रलंबित सेवा सद़्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले उपाय केल्यावर पूर्ण होणे : ‘माझ्याकडे सद़्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या गुरुपौर्णिमेच्या मार्गदर्शनासाठी लागणार्या एका चित्रफितीचे संकलन करण्याची सेवा होती. चित्रफितीचे संकलन करून झाल्यावर ती अंतिम करायची होती; पण ही सेवा करतांना नेहमी जेवढा वेळ लागतो, तेवढ्या वेळेत ती पूर्ण होत नसल्याचे माझ्या लक्षात आले. काही अडचणींमुळे ही चित्रफीत बनवण्यासाठी आधीच विलंब झाला होता आणि त्यात ही अडचण आल्याने या सेवेला पुष्कळ विलंब होत होता. ही चित्रफीत वेळेत पूर्ण न झाल्यास प्रवचन रहित करावे लागू शकले असते; म्हणून आम्ही सद़्गुरु गाडगीळकाकांना यावर उपाय विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘६० टक्के किंवा त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या एका साधकाने ‘हा अडथळा दूर व्हावा’, अशी प्रार्थना करून ‘निर्गुण’ हा नामजप करावा. त्या वेळी साधकाने ‘एका हाताचा तळवा नाकासमोर आणि दुसर्या हाताचा तळवा ओठांसमोर धरणे’, ही मुद्रा करावी.’’ साधकाने हा नामजप पूर्ण केल्यावर पुष्कळ वेळ प्रलंबित असलेली चित्रफीत अंतिम करण्याची सेवा पूर्ण झाली आणि प्रवचनात अडचण आली नाही.’
कु. रश्मी परमेश्वरन्, केरळ
१. प्रवचनाच्या चित्रीकरणाच्या वेळी वीजपुरवठा खंडित होणे, सद़्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर वीजपुरवठा चालू होणे आणि प्रवचनाचे चित्रीकरण करता येणे : ‘माझ्याकडे प्रवचन करण्याची सेवा होती. प्रवचनाचे चित्रीकरण चालू होते. त्या वेळी वीज गेल्याने चित्रीकरण थांबवावे लागले. यावर सद़्गुरु गाडगीळकाकांनी सांगितले, ‘‘सेवाकेंद्रातील ६० टक्के किंवा त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या एका साधकाने अडथळा दूर होण्यासाठी प्रार्थना करून ‘महाशून्य’ हा जप १ घंटा करावा. त्या वेळी त्याने ‘एका हाताचा तळवा डोळ्यांसमोर आणि दुसर्या हाताचा तळवा नाक अन् ओठ यांसमोर धरणे’, ही मुद्रा करावी.’’ त्यानुसार ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सौदामिनी कैमल यांनी जप केल्यानंतर वीजपुरवठा चालू झाला आणि आम्हाला चित्रीकरण करता आले.
२. प्रवचनाचे चित्रीकरण करतांना साधिकेला शारीरिक आणि अन्य त्रास होणे, सद़्गुरु गाडगीळकाकांनी नामजपादी उपाय केल्यावर तिचा त्रास उणावून तिला विषय नीट मांडता येणे अन् चित्रीकरण पूर्ण करता येणे : वीजपुरवठा खंडित होण्याचा अडथळा दूर झाला; पण त्यानंतर प्रवचनाचे चित्रीकरण करतांना मला शारीरिक त्रास होऊ लागला. नंतर मला ‘विषय लक्षात न रहाणे, बोलतांना अडखळणे’, असे त्रास होऊ लागले. त्यामुळे चित्रीकरण करता येत नव्हते. याविषयी सद़्गुरु गाडगीळकाकांना सांगितल्यावर त्यांनी स्वतःच नामजपादी उपाय केले आणि त्याच क्षणी माझा त्रास उणावला अन् मला विषय नीट मांडता येऊन चित्रीकरण पूर्ण करता आले.’
कु. अदिती सुखठणकर, केरळ
१. प्रक्षेपण करणार्या साधकांना कार्यक्रमाची एक चित्रफीत पाठवतांना अडचण येणे आणि त्यावर उपाय म्हणून सद़्गुरु काकांनी सांगितल्याप्रमाणे साधिकेने नामजप करणे : ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी कार्यक्रमाच्या एका चित्रफितीचे संकलन केले. ती चित्रफीत कार्यक्रमाचे प्रक्षेपण करणार्या साधकांना पाठवतांना ४ घंटे होऊनही ३० – ४० टक्केच ‘अपलोड’ झाली होती. तेव्हा आम्ही अन्य तांत्रिक उपाययोजना केल्या; पण तरीही अडचण सुटली नाही. त्या वेळी सद़्गुरु गाडगीळकाकांना उपायांविषयी विचारले. तेव्हा त्यांनी ६० टक्के किंवा त्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीच्या साधकाला तळहात डोळ्यांसमोर धरून ‘एकम्’ हा जप अडचण सुटेपर्यंत करण्यास सांगितला. त्यानुसार केरळ सेवाकेंद्रातील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सौदामिनी कैमल यांनी ४ घंटे जप केला.
२. जप केल्यावरही चित्रफीत अपेक्षेपेक्षा सावकाश ‘अपलोड’ होणे, सद़्गुरु काकांनी संगणक ठेवलेल्या पटलाखाली दाब जाणवत असल्याने तेथील शुद्धी करण्यास सांगणे आणि तरीही ‘अपलोडिंग’ची प्रक्रिया ९५ टक्क्यांपर्यंत येणे; पण ती पूर्ण न होणे : जप झाल्यावर आणि आम्ही तांत्रिक सुधारणा करून चित्रफीत ‘अपलोड’ करत असूनही ती अपेक्षेपेक्षा पुष्कळ सावकाश ‘अपलोड’ होत होती. एका घंट्यानंतरही ‘अपलोड’ होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती आणि ती बराच वेळ शून्य टक्क्यावर होती. तेव्हा आम्ही सद़्गुरु गाडगीळकाकांना पुन्हा याविषयी विचारले. त्यावर त्यांनी सांगितले, ‘‘संगणक ठेवलेल्या पटलाखाली पुष्कळ दाब जाणवत आहे. तिथे गोमूत्र शिंपडून आणि उदबत्ती लावून शुद्धी करा, तसेच संगणकीय सेवा करणारे साधक बसलेल्या ठिकाणीही याप्रमाणेच शुद्धी करा.’’ त्यांनी आम्हाला अडथळा दूर होण्यासाठी प्रार्थना आणि जयघोष करण्यास सांगितला. आम्ही हे सर्व उपाय करत असतांना १५ – २० मिनिटांमध्ये ‘अपलोड’ होण्याची प्रक्रिया शून्य टक्क्यावरून अकस्मात् ९५ टक्क्यांवर आली; पण ती तेथेच अडकून राहिली. ती पुढे १०० टक्क्यांपर्यंत पूर्ण होत नव्हती.
३. सद़्गुरु काकांनी स्वतः उपाय केल्यावर ‘अपलोडिंग’ची प्रक्रिया पूर्ण होणे : याविषयी सद़्गुरु काकांना कळवले. तेव्हा त्यांनी स्वतःच उपाय केले आणि एका साधकाला म्हणाले, ‘‘उपाय पूर्ण झाले आहेत. अडचण सुटली असणार.’’ त्वरित त्या साधकाने आम्हाला संपर्क करून कळवले. त्याच क्षणी इकडे ‘अपलोडिंग’ची प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्या वेळी आम्हाला सद़्गुरु काकांप्रती कृतज्ञता वाटली. ‘त्यांच्याच कृपेमुळे सर्व विघ्ने दूर होऊन सेवा पूर्ण झाली’, याची आम्हाला जाणीव झाली.’
श्री. गणेश शेट्टी, बेळगाव, कर्नाटक.
१. संकलित झालेली चित्रफीत अंतिम करण्यास पुष्कळ वेळ लागणे आणि सद़्गुरु काकांनी सांगितलेले उपाय केल्यावर अल्प वेळेत चित्रफीत अंतिम होणे : ‘गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तमिळ भाषेत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचे मार्गदर्शन होते. त्यासाठी एका चित्रफितीचे संकलन करण्याची सेवा मला मिळाली होती. संकलन विलंबाने झाल्याने चित्रफीत सिद्ध होण्यासाठी विलंब झाला आणि आणि त्यानंतर अंतिम धारिका बनवणे चालू केल्यावर त्याला फार वेळ लागत होता. ‘या प्रक्रियेेसाठी साधारण ७ – ८ घंटे वेळ लागेल’, असे संगणकावर दिसत होते. त्यामुळे माझे मन अस्थिर झाले अन् मला थोडा ताण आला. ही अडचण सद़्गुरु काकांना सांगितल्यावर त्यांनी तळहात डोळ्यांसमोर धरून ‘महाशून्य’ हा जप करण्यास सांगितला. त्याप्रमाणे मी २ – ३ घंटे नामजप केला. हा जप चालू केल्यानंतर अर्ध्या घंट्यात धारिका अंतिम करण्याच्या प्रक्रियेची गती वाढली आणि ती ४ घंट्यांत पूर्ण झाली. चित्रफितीची ही अंतिम धारिका मिळाली नसती, तर तमिळ भाषेतील प्रवचनाचे प्रक्षेपण होण्यात अडचणी आल्या असत्या; पण गुरुकृपेने प्रक्षेपण यशस्वी झाले.
२. सद़्गुरु काकांनी स्वतः उपाय केल्यावर अल्प वेळेत चित्रफीत ‘अपलोड’ होणे : चित्रफीत अंतिम झाल्यानंतर जे साधक तिचे प्रक्षेपण करणार होते, त्यांच्यासाठी चित्रफीत ‘अपलोड’ करण्याची सेवा चालू केली. तेव्हा चित्रफीत ‘अपलोड’ होण्यासाठी संगणक नेहमीपेक्षा अधिक वेळ दाखवत होता. त्यामुळे ‘प्रक्षेपणाची सेवा करणार्या साधकांना चित्रफीत वेळेत मिळेल का ?’, अशी शंका वाटत होती. याविषयी सद़्गुरु गाडगीळकाकांना सांगितल्यावर त्यांनी स्वतःच उपाय केले आणि आध्यात्मिक अडथळा दूर झाल्याचे सांगितले. त्यानंतर ‘अपलोडिंग’च्या सेवेची गती वाढली आणि ‘अपलोडिंग’ वेळेत पूर्ण झाले. या प्रसंगातून ‘आध्यात्मिक उपाय किती परिणामकारक आहेत !’, हे मला शिकायला मिळाले.’
सौ. विनुता शेट्टी, भाग्यनगर
१. चित्रफीत बनवण्याची सेवा करतांना अडचणी आल्याने चित्रफीत पूर्ण न होणे, सेवाकेंद्रातील डासांचे प्रमाण वाढल्याने साधिकेच्या अंगाला खाज येऊ लागणे, त्यामुळे तिला सेवा करता न येणे आणि सद़्गुरु काकांनी हे त्रास दूर होण्यासाठी तिला उपाय सांगणे : ‘माझ्याकडे तेलुगु भाषेतील प्रवचनासाठीच्या एका चित्रफितीचे संकलन करण्याची सेवा होती. ही सेवा ४ दिवस चालू होती. चित्रफीत बनवण्याची सेवा अंतिम टप्प्यात आल्यावर अकस्मात् अडचणी आल्याने चित्रफीत पूर्ण होत नव्हती. त्याच वेळी सेवाकेंद्रातील डासांचे प्रमाण वाढले आणि माझे हात, छाती अन् मान येथे खाज येऊ लागली. त्यामुळे मला सेवा करता येत नव्हती. तेव्हा सद़्गुरु गाडगीळकाकांनी मला सेवाकेंद्रात उदबत्ती लावण्यास आणि सेवा करतांना विशुद्धचक्रासमोर हाताचा तळवा धरून ‘निर्गुण’ हा नामजप करण्यास सांगितले.
२. उपाय चालू केल्यावर एका घंट्याने पुन्हा अडचण येऊ लागणे, सद़्गुरु काकांनी तेच उपाय चालू ठेवण्यास सांगणे, उपाय केल्यावर डासांचे प्रमाण उणावून साधिकेला होणारा खाजेचा त्रास नाहीसा होणे आणि प्रवचनाची चित्रफीत कार्यक्रमापूर्वी पूर्ण होणे : हे उपाय चालू केल्यावर एका घंट्याने पुन्हा अडचण येऊ लागली. सद़्गुरु गाडगीळकाकांना पुन्हा उपाय विचारल्यावर त्यांनी तेच उपाय चालू ठेवण्यास सांगितले. त्या वेळी मी तांत्रिक साहाय्यही घेतले. त्यामुळे अडचणी दूर झाल्या. उपाय चालू केल्यावर २ घंट्यांनी डासांचे प्रमाण उणावले आणि हळूहळू मला होणारा खाजेचा त्रास न्यून होऊन ३ – ४ घंट्यांत तो नाहीसा झाला. प्रवचनाची चित्रफीत कार्यक्रमापूर्वी २.३० घंटे पूर्ण झाली. ‘गुरुकृपेनेच हे साध्य झाले’, यासाठी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
प्रा. महावीर श्रीश्रीमाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. कार्यक्रमापूर्वी भ्रमणसंगणकला मधे-मधे अडचण येणे (‘हँग’होणे), प्रक्षेपणाची सेवा करणार्या साधकांना काही न सुचणे आणि सद़्गुरु काकांनी सांगितलेले उपाय केल्यावर अडचण दूर होऊन सेवा होऊ शकणे : ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंगळुरू सेवाकेंद्रातून कन्नड भाषेतील ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार होते. दोन साधक प्रक्षेपणाची सेवा करत होते. कार्यक्रम चालू व्हायला केवळ २ घंटे शेष होते. त्याच वेळी भ्रमणसंगणकाला मधे-मधे अडचण (‘हँग’) येत होती, तसेच ही सेवा करणार्या साधकांना काही सुचत नव्हते. तेव्हा साधकांनी सद़्गुरु गाडगीळकाकांना ही अडचण सांगितली. त्या वेळी सद़्गुरु काकांनी सांगितले, ‘‘भ्रमणसंगणकाला तांत्रिक अडचण आहे, तसेच आध्यात्मिक अडथळा आहे. ही सेवा करणार्या साधकांभोवती वाईट शक्तींचे आवरण आले आहे.’’ सद़्गुरु काकांना मंगळुरू येथील सेवेच्या ठिकाणी वाईट शक्तींनी आवरण आणल्याचे जाणवल्याने त्यांनी ते दूर केले आणि १० मिनिटे स्वतः नामजप केला, तसेच सेवा करणार्या साधकांना स्वतःभोवतीचे आवरण काढून सेवा करतांना ‘शून्य’ हा नामजप करण्यास सांगितला. त्यानंतर २५ ते ३० मिनिटांनी अडथळा दूर होऊन सेवा होऊ शकली.’
संतांच्या संकल्पशक्तीमुळे ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवा’ची सेवा पूर्ण झाल्याविषयी साधकाने व्यक्त केलेली कृतज्ञता !
‘या सेवांमध्ये अनेक अडचणी येऊनही केवळ संतांच्या कृपेनेच हा ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव’ निर्विघ्नपणे पार पडला. या माध्यमातून साधकांच्या मर्यादा लक्षात आल्या आणि संतांच्या संकल्पशक्तीची प्रत्यक्ष अनुभूती घेता आली. ‘ही सेवा करण्यासाठी आम्हाला माध्यम बनवले’, यासाठी मी प.पू. गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि सद़्गुरु गाडगीळकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’ – श्री. प्रदीप वाडकर, सोशल मिडिया समन्वय कक्ष (१०.७.२०२१)
वाचा उद्याच्या अंकातसद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या आणि स्वतः केलेल्या नामजपादी उपायांचे अनुभवलेले दिव्यत्व ! |
|