गणेशोत्‍सवानिमित्त कोकणात जाण्‍यासाठी मुंबई येथून २ सहस्र २०० जादा ‘एस्.टी.’ गाड्यांची सोय !

मुंबई – १० सप्‍टेंबरपासून चालू होणार्‍या गणेशोत्‍सवानिमित्त महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाकडून कोकणासाठी २ सहस्र २०० ‘एस्.टी.’ गाड्या सोडण्‍यात येणार आहेत. १६ जुलैपासून ‘एस्.टी.’चे आरक्षण चालू होणार आहे’, अशी माहिती राज्‍य परिवहन महामंडळाने दिली. मुंबई, ठाणे, पालघर येथून कोकणात जाण्‍यासाठी ४ सप्‍टेंबर ते १० सप्‍टेंबर या कालावधीत जादा गाड्यांचे नियोजन केलेले आहे, तर १४ सप्‍टेंबर ते २० सप्‍टेंबर या कालावधीत गाड्या कोकणातून परतीच्‍या प्रवासाला लागतील. १६ जुलैपासून आरक्षणाला प्रारंभ होणार असून चाकरमान्‍यांना परतीच्‍या प्रवासाचेही एकाच वेळी आरक्षण करता येणार आहे. प्रवासापूर्वी सर्व बसगाड्या निर्जंतुक केल्‍या जाणार असून प्रवासाच्‍या कालावधीत सर्व प्रवाशांना ‘मास्‍क’चा वापर बंधनकारक आहे.