करीना कपूरने बायबलचे नाव ‘प्रेग्नसी बायबल’ पुस्तकासाठी वापरल्याने बीड येथे ख्रिस्त्यांकडून पोलिसांत तक्रार 

अभिनेत्री करीना कपूर ‘प्रेग्नसी बायबल’ पुस्तकासमवेत

बीड – बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने ख्रिस्ती पंथियांच्या ‘बायबल’चे नाव ‘प्रेग्नसी बायबल’ असे एका पुस्तकासाठी वापरल्यामुळे आक्षेप घेण्यात आला आहे. करीना कपूरच्या विरोधात येथे तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे ‘अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघा’च्या वतीने येथील शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे प्रदेशाध्यक्ष आशिश शिंदे यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. (हिंदु धर्म आणि देवता यांचा नाटक, चित्रपट, विज्ञापने यांद्वारे अनेक वेळा अवमान केला जातो. अशा वेळी किती हिंदू सनदशीर मार्गाने विरोध करतात ? – संपादक)

‘करीना कपूरने स्वत:च्या पुस्तकावर ‘बायबल’ शब्द वापरून ख्रिस्ती पंथियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे पुस्तकाच्या नावातील ‘बायबल’ हा शब्द तात्काळ हटवावा’, अशी मागणी ‘ख्रिश्चन महासंघा’ने केली आहे. या तक्रारीविषयी अद्याप करीना कपूर किंवा पुस्तक प्रकाशक यांकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही; मात्र ‘या प्रकरणी तातडीने गुन्हा नोंद करावा’, अशी मागणी ‘ख्रिश्चन महासंघा’कडून करण्यात आली आहे.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक