या आतंकवादाचा रंग कोणता ?

शहरी नक्षलवादी फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू आणि त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या प्रश्नांविषयी ऊहापोह करणारा चिंतनात्मक लेख ! 

फादर स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूनंतरचे शोकावळे, रडे आणि आक्रोश ऐकून मन हेलावून गेले. सध्या अशी वृत्ते भ्रमणभाषवर लगेचच झळकतात. मी हे वृत्त वाचले, तेव्हाच चर्र झाले. ते अशासाठी नव्हे की, ही व्यक्ती गेली म्हणून; कारण कारागृहात कित्येक बंदीवान टाचा घासत मरतात; आजारपण भोगतात. स्टॅन स्वामी यांना तर त्यांच्या हक्काचे ख्रिस्ती रुग्णालय मिळाले होते. प्रश्न असा होता की, आता याचे भांडवल कोण आणि कसे करणार ? ‘म्हातारी मेल्याचे दु:ख नाही; पण काळ सोकावतो’, अशी आपल्याकडे म्हण आहे. उद्धटपणाचा आरोप स्वीकारून म्हणायचे झाले, तर दु:ख अशाच स्वरूपाचे म्हणजे म्हातारा मेल्याचे नव्हते, तर नक्षलवाद सोकावतो कि काय ? याचे होते आणि तसेच झाले आहे.

‘द प्रिंट’, ‘क्विंट’ आणि ‘इंडियन एक्सप्रेस’ या सर्व वृत्तसंकेतस्थळांपासून सर्वांनी गळे काढले, काढत आहेत आणि पुढे काढलेही जातील. ही शासकीय हत्या आहे; म्हणून भाड्याचे रडे काढणे होत आहे अन् होईल. प्रश्न असा आहे की, या पराकोटीच्या ध्वनीप्रदूषणात अनेक प्रश्न मुळात अनुत्तरित ठेवले जात आहेत. ते प्रश्न आपण विसरून जाण्याआधी आणि गतानुगतिकांच्या रांगेतील एक अंधश्रद्ध म्हणून भरती होण्याआधी हे मांडावेत, म्हणून हा लेख !

प्रातिनिधिक छायाचित्र

 

जेझुइट पंथाची दीक्षा

फादर स्टॅन स्वामी म्हणजे तमिळनाडूमध्ये कुठेतरी जन्मलेली व्यक्ती !  त्यांचा जन्म ख्रिस्ती घरात झाला का, याची माहिती कुठे मिळत नाही. विसाव्या वर्षी जेझुइट पंथाची दीक्षा घेऊन ते कार्यरत झाले. या पंथाची दीक्षा काय आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. आम्ही देवभोळे, सर्वधर्मसमभाव मानणारे; परंतु या धर्माची दीक्षा घेतांना घ्यावी लागणारी प्रतिज्ञा संगणकीय माहिती जालावर शोधा. शांत चित्ताने पूर्णपणे वाचा. ती वाचल्यास तिचे गांभीर्य लक्षात येईल. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय ग्रंथालयाच्या संकेतस्थळावर ही प्रतिज्ञा उपलब्ध आहे. (https://nla.gov.au/nla.obj-2478231803/view?partId=nla.obj-2478232434#page/n0/mode/1up) सोयीसाठी काही ओळींचा स्वैर अनुवाद पुढे दिला आहे. अधिक माहितीसाठी मूळ प्रतिज्ञा वाचावी.

१. चर्चच्या हितासाठी स्वतःचा धर्म आणि पंथ यांचा पाखंड समजून धिक्कार करणे : ‘कोणताही पाखंडी राजा, राजकुमार किंवा राज्य, प्रोटेस्टंट किंवा उदारमतवादी, तसेच त्यांनी केलेले कायदे यांच्याप्रती असलेल्या निष्ठेचा मी यापुढे त्याग करत आहे. यासमवेतच मी घोषित करतो की, यापुढे मी इंग्लंड आणि स्कॉटलंड येथील चर्च, तसेच कॅलव्हेनिस्ट (जॉन कॅल्विन यांनी सिद्ध केलेली प्रोटेस्टंट पंथातील एक विचारसरणी) हुगुएनॉट (फ्रेंच प्रोटेस्टंट) यांचाही धिक्कार करीन. मी प्रतिज्ञा घेतो की, मदर चर्चच्या हितात असल्याने मी माझा धर्म-पंथ यांना पाखंड समजून त्यांचा धिक्कार करीन. यासमवेतच चर्चचे सर्व प्रतिनिधी, समुपदेशक यांच्याविषयी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मी शब्द, लिखाण अथवा अन्य कोणत्याही परिस्थितीत गुप्तता पाळीन.’

२. आज्ञा मिळाल्यास पाखंडी लोकांसमवेत क्रूर आणि निर्दयी कृत्य करण्याचे टोकाचे पाऊल उचलण्यासही सिद्ध असणे : लेखात पुढे दिले आहे, ‘मी पुढे प्रतिज्ञा घेत घोषित करतो की, जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल, तेव्हा तेव्हा गुप्तपणे अथवा उघडपणे पाखंडी लोक, प्रोटेस्टंट, उदारमतवादी आदींच्या विरोधात मला जशी आज्ञा मिळाली असेल, त्याप्रमाणे त्यांच्याशी निर्दयीपणे युद्ध पुकारीन. त्यांची पाळेमुळे खणून काढीन. पृथ्वीवरून त्यांचा नायनाट करीन. यामध्ये लिंग, वय अथवा लोकांची व्यथा हे सर्व झुगारत कुणाचीही गय करणार नाही. अशा दुष्ट आणि पाखंडी लोकांना मी जाळीन, उकळत्या पाण्यात टाकीन, त्यांची कातडी (चामडी) काढीन, त्यांचा गळा दाबून त्यांना मारीन किंवा त्यांना भूमीत जिवंत पुरीन. पाखंड्यांची जमात पूर्णपणे नष्ट व्हावी, यासाठी त्यांच्या महिलांचे पोट आणि गर्भाशय बाहेर काढीन. त्यांच्या अर्भकांना भिंतीवर आपटून त्यांचा जीव घेईन. जर हे उघडपणे करणे शक्य नसेल, तर मी हे सर्व गुप्तपणे करीन. पोपचा संदेशवाहक जसे सांगेल, त्याप्रमाणे मी करीन. यासाठी मी माझे जीवन, माझा आत्मा आणि आधिभौतिक शक्ती समर्पित करत असून मला मिळालेल्या खंजिराने मी माझे रक्त काढून ते लिहीन. जर मी चुकलो अथवा माझ्या निर्धारात न्यून पडलो, तर माझ्या बंधूंनी पोपच्या सैन्याने माझे हात-पाय तोडावेत, माझा घसा आणि कान कापावेत, माझे पोट फाडावे, मला जाळावे अथवा मला ज्या कोणत्या पद्धतीने पृथ्वीवर मारता येईल, तसे मारावे. माझ्या आत्म्याला नरकात राक्षसांकडून कायमची पीडा मिळत रहावी.’

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

१. इजा, बिजा आणि तिजा !

१ अ. हिंसाचार आणि पाशवी बळ यांचा वापर करून हिंदूंचे धर्मांतर करणारा फ्रान्सिस झेवियर ! : भारतात ‘जेझुइट’ म्हटले की, दोन नावे समोर येतात. पहिले म्हणजे फ्रान्सिस झेवियर. त्याने गोव्यात हिंदूंच्या धर्मांतरासाठी हिंसाचार आणि पाशवी बळाचा वापर करून पाहिला. हिंदूंचे कसे आणि किती हाल त्याने केले अन् त्याच्या भयापायी किती हिंदु कुटंबे देशोधडीला लागली, किती मंदिरे पाडली गेली, याच्या करुण कहाण्या आपण याआधी वाचल्या असतीलच !

१ आ. जेझुइट पंथाच्या रॉबर्ट दे नोबिली याने फसवून हिंदूंचे धर्मांतर करणे आणि ‘ख्रिस्ती पंथ हा हिंदु धर्माचाच उपपंथ आहे’, असे त्याने भासवणे : यानंतरचे; परंतु इतिहासातील जवळपास लगेचच येणार्‍या काळातील नाव आहे रॉबर्ट दे नोबिली याचे ! ‘बळ आणि हिंसाचार यांच्या मार्गाने हिंदू बाटत नाहीत’, हे लक्षात आल्यावर त्यांना फसवून बाटवण्याचा प्रयत्न करणारा रॉबर्ट दे नोबिली हासुद्धा जेझुइटच होता. तो स्वत:ला रोम येथून आलेला ब्राह्मण म्हणवत असे. त्याचे असे म्हणणे होते, रोम येथील हे ब्राह्मण म्हणजे ब्रह्मदेवाचे वंशज आहेत. लोकांना असे सांगून रॉबर्ट हिंदूंच्या मंदिरांप्रमाणेच मंदिरे बांधून त्यात येशूची मूर्ती ठेवून हिंदूंच्या आरत्या आणि भजने यांच्या धर्तीवर येशूच्या आरत्या अन् भजने बसवत असे. अशा प्रकारे ‘ख्रिस्ती पंथ हा हिंदु धर्माचाच उपपंथ आहे’, हे भासवण्याचा त्याचा प्रयत्न असे. असे भासवून हिंदूंचे धर्मांतर करणारा रॉबर्ट नोबिली हा फ्रान्सिस झेवियरचे दुसरे रूप नाही तर काय ?

१ इ. फादर स्टॅन स्वामी यांना पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक होऊनही चर्चने कोणतीही भूमिका घोषित न करणे शंकास्पद ! : फादर स्टॅन स्वामी यांचा विचार करतांना ही परंपरा आपल्याला विसरून चालणार नाही. मुळात एखाद्या फादरला देशाच्या पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक होणे, हे चर्चसाठी लाजिरवाणे आहे; मात्र स्टॅन स्वामी यांच्या अटकेनंतर चर्चने कोणतीही ठोस भूमिका घोषित केली नाही. चर्चने स्टॅन स्वामी यांना पाठिंबाही दिला नाही किंवा ‘स्टॅन स्वामी दोषी असल्यास त्यांना शासन व्हायला हवे’, अशीही भूमिका घेतली नाही. केवळ त्यांचे आजार आणि वय यांची चर्चा होत राहिली.

२. स्टॅन स्वामी यांच्या अटकेविषयी अळीमिळी गुपचिळी आणि हिंदू अन् हिंदुत्वनिष्ठ यांच्याविषयी मात्र कुणालाही कळवळा न वाटता त्यांच्या विरोधात दबावाची भूमिका घेतली जाणे हा दुटप्पीपणा असल्याचे दर्शवणार्‍या घटना !

हिंदुत्वनिष्ठांच्या संदर्भात मात्र काही घटना घडली, तर त्यांच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी दबाव आणला जातो, उदा.

२ अ. गोध्रा येथे कारसेवकांना जाळून मारल्यानंतर जी प्रतिक्रिया उमटली, त्याविषयी अटलजी यांनी (अटलबिहारी वाजपेयी यांनी) नरेंद्र मोदी यांची पाठराखण करण्याऐवजी त्यांना ‘राजधर्म’ पाळण्याच्या कानपिचक्या दिल्या होत्या.

२ आ. पबमधील हानीप्रकरणी श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनाच उत्तरदायी धरले जाणे : ‘कर्नाटकातील मंगळुरू येथील एका पबमध्ये श्रीराम सेनेचे काही कार्यकर्ते घुसले आणि पबमध्ये नाचणार्‍या मुलींना बाहेर काढून तेथे नासधूस केली होती’, असा त्यांच्यावर आरोप होता. तेव्हा श्रीराम सेनेनेच हे कृत्य केल्याचे छातीठोकपणे सांगून श्रीराम सेनेचे प्रमुख श्री. प्रमोद मुतालिक यांना गुलाबी रंगाची अंतर्वस्त्रे पाठवण्याची खुळचट मोहीम स्वत:ला महिलांच्या कैवारी म्हणवणार्‍या काही फुटकळ लोकांनी चालू केली होती. आता हिंदुत्वाच्या बाजूने बोलणारे अर्णब गोस्वामी तेव्हा ‘टाइम्स’ या दूरचित्रवाहिनीवरून श्रीराम सेनेवर न्यायालयात खटला सिद्ध होण्याआधीच अद्वातद्वा (वाट्टेल तसे) बोलले होते. श्री. प्रमोद मुतालिक यांनीही तेव्हा जाहीरपणे भूमिका घेतली होती, ‘‘मी आणि माझे कार्यकर्ते दोषी असतील, तर न्यायालयात ते सिद्ध होईल. हवे तर मला तेव्हा फासावर चढवा !’’ प्रत्यक्षात याच गळेकाढू समाजाने त्यांना आधीच शिक्षा केली होती.

२ इ. चर्चचा साळसूदपणा का ? : फादर स्टॅन स्वामी यांच्या प्रकरणात चर्चने अशी कोणतीच भूमिका घेतलेली दिसत नाही. ‘आमच्या पाद्र्याला जर अशा गुन्ह्यात अटक होत असेल आणि जर त्याने गुन्हा केला असेल, तर त्याला शिक्षा व्हावी’, ही भूमिकाच दिसत नाही. केरळमधील ज्या ननने चर्चमधील लैंगिक अत्याचार समाजासमोर आणले, त्या ननला काढून टाकणारी चर्च इथे साळसूदपणे शांत का आहे ? जगभरातील जेझुईटांचे डोळे मात्र ख्रिस्ताच्या अपार करुणेने पाणावत आहेत. पोप याविषयी काही बोलणार आहेत का ? खरेतर त्यांनी एका जेझुईट फादरच्या अटकेनंतर लगेच आपली भूमिका स्पष्ट करायला हवी होती.

३. आधी ‘हिरवा’, मग ‘भगवा’ आणि आता या आतंकवादाच्या रंगाचे नाव काय ?

खरे पहाता या स्वरूपाचे किंवा असे कुठलेही विधान फादर स्टॅन स्वामी यांच्या अटकेनंतर चर्चने केल्याचे दिसून आलेले नाही. ‘आर्चबिशप मच्याडो’ या ‘कॅथॉलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया’ या संस्थेने काढलेल्या प्रेसनोटमध्ये केवळ ‘अशी अटक कशी केली ? त्यांना त्रास होईल’, इतक्याच रूपात सूत्र मांडले आहे. मृत्यूनंतरची प्रतिक्रियाही तशीच गुळमुळीत आहे. ‘कायद्याने प्रत्येक जण अपराध सिद्ध होईपर्यंत निर्दाेष असतो. स्टॅन यांचे निर्दाेषत्व सिद्ध होण्याची आम्ही वाट पहात होतो’, अशी ती प्रतिक्रिया आहे. असे आहे म्हणजे ‘स्टॅन स्वामी यांना चर्चचा पाठिंबा आहे’, असे समजायचे का ? तसे असेल, तर आतंकवादाचा रंग आधी ‘हिरवा’ होता, मग ‘भगवा रंग’ लावण्याचा प्रयत्न केला गेला. आता याला कोणत्या रंगाचे नाव द्यायचे ? याचे उत्तर चर्च देणार आहे का ?

४. शासकीय खून, मग तो कोणत्या शासनाचा ?

आधी महाराष्ट्राची अन्वेषण यंत्रणा आणि नंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा यांनी स्टॅन स्वामी यांची चौकशी केली. त्यांच्या घरातून साहित्य कह्यात घेतले आणि मग आवश्यकता वाटली म्हणून अटक केली. वृत्तांवरूनही असे दिसून येते की, ऑक्टोबर २०२० मध्ये झारखंडमधून अटक केल्यानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने त्यांना स्वत:च्या कोठडीतही अधिक काळ न ठेवता लगेच न्यायालयीन कोठडीत पाठवले. अटकेनंतरचा काळ म्हणजे २९ मे २०२१ पर्यंत ते राज्य शासनाच्या अधीन असलेल्या कारागृहात होते. त्यानंतर त्यांना एका ख्रिस्ती‘च’ रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथपासून ते मृत्यूपर्यंत ते या रुग्णालयात होते. ते जामिनावर नव्हते. त्यामुळे अशा ठिकाणी म्हणजेच रुग्णालयातही पोलीस असायलाच पाहिजेत. बरे, असे बंदोबस्ताला असणारे पोलीसही ना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे, ना भाजपचे, ना संघाचे ! ते स्थानिक पोलीस होते. स्थानिक पोलीस ठाण्यातील किंवा कारागृहातील ! अशा वेळी कुणालाही भेटण्यास प्रतिबंधच असतो; कारण रुग्णालयात असला, तरी तो रुग्ण बंदीवानच असतो. त्याचा बंदीवास तो भोगत असतो.

५. पोलीस बंदोबस्त खरंच होता का ? मग दगाफटका कुठे झाला ?

झेवियर डायस हा स्टॅन स्वामी यांचा एक पाद्री मित्र होता. ट्विटरवर प्रचंड सक्रीय असणारा आणि केंद्रशासनावर सशक्त टीका करणारा ! त्याच्या खात्यावरून ३० मे २०२१ च्या रात्री २.१० वाजता एक ट्वीट करण्यात आले होते. त्यातील छायाचित्रात (बहुधा) श्रीमान डायस हे स्टॅन स्वामींच्या शेजारी उभे आहेत.

स्टॅन स्वामींशी बोलतांना श्रीमान डायस

स्टॅन स्वामी रुग्णालयातील खाटेवर झोपलेले आहेत आणि श्रीमान डायस त्यांच्या शेजारी उभे आहेत. मग हे छायाचित्र कुणी काढले असावे ? बहुधा पोलिसाने ? खरेतर त्याने (पोलिसाने) कुणालाच जवळ फिरकू द्यायला नको होते. मग हे (छायाचित्र काढणे) चालत होते का ? (https://scroll.in/latest/996170/activist-stan-swamy-tests-positive-for-coronavirus-after-being-moved-to-private-hospital)

२९ मे या दिवशी नंतर स्टॅन स्वामी हे ख्रिस्ती रुग्णालयातच होते. त्यांच्या मृत्यू कशाने झाला असेल ? उपचारांमध्ये कमतरता झाल्याने झाला असेल का ? याची चौकशी होणार नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ऑक्टोबर २०२० पासून हे स्वामी तळोजा, पुणे किंवा आर्थर रोड कारागृहात होते. तेथे तर केंद्र सरकारची सत्ताही नाही. स्टॅन स्वामी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे असणार्‍या गृह खात्याच्या अखत्यारीत येते. मग हे कसे झाले ? तेथे त्यांची हेळसांड कशी झाली ?

स्टॅन स्वामी यांना अटक होण्यामागे त्यांनीच दिलेले महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी जवळजवळ ३ सहस्र युवकांना केलेली अटक कशी चुकीची आहे, त्यांना जामीन का मिळायला हवा ? हे सांगणारी जनहित याचिका झारखंड उच्च न्यायालयात प्रविष्ट केली होती. त्यासाठी म्हणे त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यांतून माहिती अधिकारात कागदपत्रे मिळवली होती.

६. दुःख व्यक्त करणार्‍यांसाठी प्रश्न ! 

अ. स्टॅन स्वामी यांच्या मृत्यूनंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दु:ख व्यक्त करत केंद्र सरकारला पत्र लिहिले. डिसेंबर २०१९ पासून तेथे सोरेन यांचे राज्य आहे. त्याआधी वर्ष २०१४ पासून भाजपचे, तर त्याआधी सोरेन हेच मुख्यमंत्री होते. मग ‘दु:ख व्यक्त करणार्‍यांनी केलेली अटक चुकीची होती’, असे दु:ख व्यक्त करणारे म्हणणार आहेत का ?

आ. स्टॅन स्वामी यांची संकेतस्थळावरील छायाचित्रे पहावीत. एका छायाचित्रात त्यांच्या मागील कापडी फलकावर लिहिले आहे, ‘लोकतांत्रिक – वामशक्तीयोंका प्रतिवाद’ (https://www.ncronline.org/news/earthbeat/imprisoned-elderly-jesuit-defended-indigenous-land-rights-india), तर दुसर्‍यात लिहिले आहे, ‘धर्म-निपेक्ष्य साझा कदम’ (https://www.jagran.com/jharkhand/ranchi-stan-swami-died-in-mumbai-nia-arrested-him-from-ranchi-in-bhima-koregaon-case-maharashtra-jharkhand-news-21800952.html and https://scroll.in/latest/995441/activist-stan-swamy-refuses-hospitalisation-asks-bombay-hc-for-interim-bail)

समाजवादी जन परिषदेत भाषण करतांना स्टॅन स्वामी

अजून एका छायाचित्रामध्ये लिहिले आहे, ‘गांधी, लोहिया, जे.पी., आंबेडकर, बिरसा मुंडा, किशन पटनायक की धारा के वाहक – समाजवादी जन परिषद.’ यात स्टॅन स्वामी भाषण करत आहेत. यातील चर्चला काय मान्य होते ? धर्मनिरपेक्षता कि बिरसा मुंडा यांचे विचार ?

हे सर्व चर्चला मान्य होते का ? नव्हते, तर चर्चची काय भूमिका आहे ? हे खरेतर विचारले गेले पाहिजे. (https://www.ncronline.org/news/earthbeat/imprisoned-elderly-jesuit-defended-indigenous-land-rights-india) कारण ‘हे चर्चला मान्य ‘जर होते, तर ते चर्चपुरस्कृत आहे’, असाच त्याचा अर्थ होणार ना !

७. कोरेगाव भीमा प्रकरणी अटक झालेल्यांचा स्टॅन स्वामी यांना पुळका का ?

‘पोपने सांगितलेले कार्य करत रहाणे, ही जेझुईटची प्रतिज्ञा आहे’, असे ‘ब्रिटानिका’च्या संकेतस्थळावर म्हटले आहे. पोपने यांना काय सांगितले होते ? पोप महाशय सांगतील का ? बरे हे इतकेच आणि एवढेच नाही, तर यांचा जामीनही नाकारला गेला.

न्यायालयात झालेल्या युक्तीवादात सांगण्यात आले आहे की, स्टॅन स्वामी हे अनेक नक्षलवादी कार्यकर्त्यांसमवेत पत्रव्यवहार करायचे. त्यांच्याकडे काही दायित्व दिलेले होते. वर नमूद केलेल्या याचिकेचे दायित्वही अशाच संघटनेकडून मिळाले होते. अटक होण्याआधी जून २०१९ मध्ये स्टॅन स्वामी हे कोलकत्यातील एका सभेला उपस्थित राहिले होते. तेथे बाकीच्यांनी बंगालीत, तर स्टॅन स्वामी यांनी इंग्रजीत भाषण केले होते. कोरेगाव भीमा प्रकरणात ज्यांना अटक झाली आहे, त्यांच्या निषेधार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले होते. ‘आदिवासींसाठी काम करतो’, असे म्हणणार्‍या ८२ वर्षांच्या (तेव्हा होते असे गृहितक) स्टॅन स्वामी यांना (जे स्वतः झारखंडमध्ये काम करतात, तसेच मूळचे तमिळनाडूचे आहेत त्यांना) पुणे येथील कोरेगाव भीमा प्रकरणी अटक झालेल्यांचा इतका पुळका ? वर्ष २०१७ मध्ये गडचिरोली न्यायालयाने जी.एन्. साईबाबा यांना शिक्षा ठोठावली. त्यासाठी स्वामी यांनी निषेध सभा घेतली होती. ‘विस्थापनविरोधी जनविकास आंदोलन’ या संस्थेवर बंदी आणण्यात आली आहे. स्टॅन स्वामी हे या संस्थेचे संस्थापक सदस्य होते. चर्चच्या कुठल्या कामात हे बसते ?

८. पांढर्‍या रंगाचा आतंकवाद अस्तित्वात आहे का ?

स्टॅन यांच्या अधिवक्त्यांकडून न्यायालयातील युक्तीवादात सांगितले जायचे की, जो पुरावा आहे, त्याला तांत्रिक कारणाने पुरावा मानण्यात येऊ नये. स्टॅन स्वामी यांच्याकडे माओवादी साहित्य मिळाले असले, तरी ‘केवळ साहित्य मिळाले; म्हणून जामीन नाकारता येत नाही’, असेही सांगितले गेले. जो पाद्री आहे आणि ज्यांनी जिझसला वाहून घेतले आहे, तो माओवादी साहित्य कसे काय ठेवतो ? हा विरोधाभास ‘पांढर्‍या रंगाचा आतंकवादही अस्तित्वात आहे’, अशा तर्काकडे आपल्याला नेतो का ? ज्यांनी देशाच्या पंतप्रधानाला मारण्याचा कट रचला होता, त्यांच्या संपर्कात रहाण्याची आवश्यकता एखाद्या पाद्र्याला का भासते ?

त्यांच्या मृत्यूमुळे या प्रश्नांची उत्तरे शोधायच्या वाटा बंद झालेल्या आहेत आणि स्टॅन स्वामी यांना गांधी, दाभोलकर (उतरत्या क्रमाने वाचावे) अशांच्या रांगेत बसवण्याचे प्रयत्न चालू झालेले आहेत.

‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे अन्वेषण प्रत्येक वेळी सत्य असते’, असे मला म्हणायचे नाही. ‘पोलीस छळ करत नाहीत’, असेही मला म्हणायचे नाही. न्यायालयात खटले एरव्ही जलद गतीत चालतात. स्टॅन स्वामी यांना रखडवण्यात आले, असे झाले असावे, असेही नाही; परंतु या कोलाहलात आम्ही आपले दु:खही विसरून जाण्याने गोंधळ माजेल.

९. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा हिंदुद्वेष दर्शवणारी ढळढळीत उदाहरणे !

अ. आज जे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेवर टीका करत आहेत, ते सोयीस्करपणे हे विसरतात की, याच यंत्रणेने गोव्यातील मडगाव स्फोटात ६ निरपराध तरुणांना अटक करून त्यांच्या आयुष्यांचे धुमारे कुस्करून टाकले, त्यांच्या कुटुंबियांना कित्येक अस्वस्थ रात्री जागून काढाव्या लावल्या.

आ. हीच यंत्रणा होती की, जिने वर्ष २००६ च्या मालेगावच्या अन्वेषणात आतंकवादविरोधी पथक आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणा यांचे अन्वेषण खोटे ठरवून स्वामी असीमानंद यांना आरोपीच्या पिंजर्‍यात बसवले. आज आक्रोश करणारे तेव्हा सर्कशीतील विदुषकाला पाहून लोक हसतात, तसे आनंदाने हसत होते.

इ. ज्या बेकायदेशीर कारवाई प्रतिबंधक कायद्याला आज ‘राक्षसी’ म्हणून हे संबोधत आहेत, तोच कायदा दाभोलकर प्रकरणात निरपराध्यांच्या विरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेने लावला आहे आणि आधीच डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासारख्यांना ५ वर्षे कारागृहात सडवले आहे.

ई. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय आदी १२ हिंदुत्वनिष्ठांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी एक असलेले शाम भवंरलाल साहू यांचे ज्येष्ठ बंधू त्यांना भेटण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयात आले होते. आपल्या भावाला पोलिसांच्या गराड्यात उभा राहिलेला पाहून शाम साहू यांच्या बंधूंना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि न्यायालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. आमच्या मनातील त्या घटनेचा चटका अजून गेलेला नाही; परंतु त्याच्या बातम्या आता कोल्हेकुई करणार्‍यांनी प्रसिद्धच केल्या नव्हत्या. या सर्वांची उत्तरे ते देणार नाहीत; कारण त्यांना उत्तरे द्यायचीच नसतात.

१०. कारागृहातही दिसून येणारा हिंदुद्वेष !

आजही कारागृहातील आरोपींच्या वेदना ऐकल्या जातच नाहीत; पण येथे तर संपूर्ण आंतरराष्ट्र्रीय यंत्रणा स्टॅन स्वामी यांच्या मागे उभी राहिली, तेव्हा त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु असे कितीजण कारागृहात हालअपेष्टा भोगत आहेत. त्यांच्यासाठी कोण उभे रहाणार ? जे न्यायाने त्यांना मिळाले पाहिजे, ते मिळत नाही.

अगदी सध्याचे उदाहरण द्यायचे झाले, तर नालासोपारा प्रकरणातील सुधन्वा गोंधळेकर यांच्या दोन्ही बाजूंच्या दाढा किडल्या आहेत. त्यांना गेले २ मास खाताही येत नाही. आधीच कारागृहातील खाणे, त्यात तेही खाता येत नसेल, तर माणसाने कसे जगावे ? गणेश मिस्कीन नावाच्या दुसर्‍या आरोपीच्या पायांना ‘व्हेरिकोज व्हेन्स’चा (पायात अशुद्ध रक्त वहन करण्यासाठी त्वचेच्या खाली मुख्यतः दोन मोठ्या रक्तवाहिन्या असतात. या रक्तवाहिन्यांमध्ये जर कुठल्या कारणाने रक्त जमा झाले आणि त्यामुळे त्या फुगीर झाल्या, तर या त्रासाला ‘व्हेरिकोज व्हेन्स’ असे म्हणतात.) असह्य त्रास होतो. त्यालाही औषधोपचार मिळत नाहीत. हिंदुत्वनिष्ठांच्या गटातल्यांना त्रास झाला, तर त्या (विरोधकांच्या) गटातल्यांना आनंद व्हावा आणि ‘त्याचीच उलटसुलट पुनरावृत्ती होत रहावी’, असे मानणार्‍यातला मी नाही; पण आज हेच होत आहे. मूळ समस्या तशीच रहाते. उत्तरे सर्वांची हवीत आणि त्यासाठी आपण अजून हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात झोकून दिले पाहिजे. हेच खरे !

अभिनेता सलमान खान यांच्यासारखा न्याय सर्वसामान्यांना मिळेल का ? 

सलमान खान नावाच्या अभिनेत्याने दारू पिऊन गाडी चालवत काही लोकांना चिरडले. त्याला मुंबईच्या सत्र न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली. ही शिक्षा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सुनावली गेली. त्यानंतर या शिक्षेच्या विरोधात अपील सिद्ध करणे, ते प्रविष्ट होणे, मग जामिनासाठी अर्ज सिद्ध करणे, तो अर्ज प्रविष्ट होऊन सुनावणीला येणे, त्यावर सुनावणी होणे, न्यायालयाने सलमान खानला जामीन देणे आणि जामिनाच्या पूर्ततेची प्रक्रिया पूर्ण होऊन सलमान खान आपल्या घरी जाणे, या सर्व गोष्टी केवळ ५ घंट्यांत पूर्ण झाल्या होत्या. खरेतर सर्वसामान्य माणसाच्या संदर्भात या गोष्टी घडण्यासाठी किमान ६ मास तरी लागतात. स्टॅन स्वामी यांचे भक्त या भेदभावाच्या विरोधात कधी आवाज उठवतांना दिसले नाहीत.

११. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री बुटासिंग यांच्या मुलाला जामीन मिळणे आणि कारागृहात खितपत पडणार्‍या अल्पवयीन मुलांवर मात्र अन्याय होणे याविषयी स्टॅन  स्वामी भक्तांना कळवळा नाही का ?

काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री बुटासिंग यांचा (१०० किलोग्रॅमपेक्षा अधिक वजन असलेला आणि केवळ २९ वर्षे वय असलेला ‘अल्पवयीन’) सानुला (मुलगा) कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कारागृहात गेला. त्याला जामीन देतांना मुंबई उच्च न्यायालयाने असे कारण नोंदवले की, हा मुलगा कारागृहात राहिला, तर त्याच्यावर वाईट संस्कार होतील; मात्र आजच्या स्थितीत न केलेल्या गुन्ह्यांत कित्येक अल्पवयीन मुले कारागृहात खितपत पडली आहेत. त्यांच्या आयुष्याचे काय आणि त्यांच्यावरील संस्कारांचे काय ? स्टॅन स्वामी यांच्या भक्तांनी या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवल्याचे आजवर कधीही ऐकिवात किंवा वाचनात आले नाही. त्यामुळे ‘स्टॅन स्वामी यांच्या निधनानंतर स्वामींच्या भक्तांच्या डोळ्यांतून वहाणारे अश्रू सामान्य माणसासाठीच्या कळवळ्यातून वहात नाहीत’, असे म्हणायला जागा आहे.

१२. सखोल आणि नि:पक्षपातीपणे अन्वेषणाची आवश्यकता !

स्वत:ला रोमन ब्राह्मण म्हणवणार्‍या ‘जेझुइट’ पंथाचे हे स्टॅन स्वामी साम्यवाद्यांच्या कळपात कसे ? ‘धर्म ही अफूची गोळी आहे’, असे म्हणणार्‍या साम्यवाद्यांना एका पाद्र्याच्या मृत्यूचे दु:ख कसे ? स्टॅन स्वामी साम्यवादी होते कि माओवादाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले आरोपी हे चर्चप्रणित आहेत ? स्टॅन स्वामी यांच्या निधनाच्या निमित्ताने या सर्व गोष्टींचेही सखोल आणि नि:पक्षपातीपणे अन्वेषण होऊन सत्य समाजासमोर यायला हवे.’

– अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद