नाशिक येथील कै. (सौ.) मंजुषा जोशी यांची त्यांच्या मुलीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती
नाशिक येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) मंजुषा जोशी (वय ५५ वर्षे) यांची त्यांच्या मुलीला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मृत्यूनंतर आलेल्या अनुभूती
१७.४.२०२१ या दिवशी नाशिक येथील सौ. मंजुषा शशिधर जोशी यांचे निधन झाले. १५.७.२०२१ या दिवशी त्यांचे तिसरे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. गुणवैशिष्ट्ये
१ अ. प्रेमभाव
‘माझी आई पुष्कळ प्रेमळ होती. तिच्या सर्व भावंडांचा तिच्यावर पुष्कळ जीव होता. ती सर्वांवर मनापासून आणि निःस्वार्थीपणे प्रेम करायची.
१ आ. इतरांचा विचार करणे
तिने कधीही स्वतःचा विचार केला नाही. ‘इतरांसाठी काय करू ? इतरांना साहाय्य कसे करू ?’, असा तिचा विचार असायचा. त्यासाठी ती सतत प्रयत्न करायची.
१ इ. समाधानी वृत्ती
आईला कोणत्याच गोष्टींची आसक्ती नव्हती. माझी बहीण नोकरीला जाऊ लागल्यावर तिने तिच्या पहिल्या पगारातून आईसाठी साडी घेतली होती. ती साडी आमच्या एका नातेवाईक महिलेला आवडल्याने आईने क्षणाचाही विचार न करता तिला ती साडी दिली. आईला कधीही ‘नवीन साड्या किंवा दागिने हवेत’, असे वाटत नसे. ती आहे त्यात समाधानी होती.
१ ई. दिवसभर सेवेत आणि साधनारत रहाणे
ती रात्री ११.३० – १२ वाजेपर्यंत सेवा करायची आणि पहाटे ३ वाजता उठून व्यष्टी साधना, सेवा अन् घरातील कामे करायची. दिवसभर तिचे ‘ऑनलाईन’ सत्संग आणि साधनेविषयीचे आढावे चालू असायचे. त्यातूनही आई आम्हाला वेळ द्यायची. ‘जणूकाही देव तिच्यासाठी वेळ थांबवून ठेवायचा’, असे मला वाटते. अत्यल्प झोप घेत असूनही ती नेहमी उत्साही असायची. ती आम्हालाही साधना करण्याची आठवण करून द्यायची.
१ उ. साधनेची तळमळ
२८.३.२०२१ या दिवशी बाबांची कोरोना चाचणी सकारात्मक (पॉझिटिव्ह) आली. त्यानंतर ५.४.२०२१ या दिवशी माझी आणि आईची कोरोना चाचणी सकारात्मक आली. त्याच दिवशी मी आणि आई जवळच्या अलगीकरण केंद्रात (कोविड सेंटरमध्ये) भरती झालो. तेव्हा आम्हाला सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांनी नामजप करायला सांगितला होता. आईचा ६ घंटे नामजप सकाळी ९ वाजायच्या आधीच पूर्ण व्हायचा. ती पुष्कळ मनापासून आणि भावपूर्ण नामजप करायची अन् ‘माझा नामजप होत आहे का ?’, याचा सतत आढावा घ्यायची. या कालावधीत मी आणि आई एकीकडे अन् बाबा दुसरीकडे होते. त्या वेळी ती बाबांच्याही नामजपाचा आढावा घेत होती. ९.४.२०२१ या दिवशी आईच्या रक्तातील ‘ऑक्सिजन’ची पातळी ८५ टक्के इतकी न्यून झाली होती. त्यामुळे तिला खासगी रुग्णालयात भरती केले. रुग्णालयात गेल्यावरही ती प्रतिदिन नामजप आणि प्रार्थना करायची.
२. आईच्या मृत्यूनंतर आलेल्या अनुभूती
२ अ. कोरोनामुळे आईचा मृत्यू झाल्यानंतरही वडिलांच्या हस्ते तिला अग्नी देण्यात येणे
आईचा रुग्णालयात मृत्यू झाल्यावर तिचा मृतदेह रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने स्मशानभूमीत नेण्यात आला. केवळ आईने केलेल्या साधनेमुळे आणि तिच्यातील गुणांमुळे तिला मृत्यूनंतर दीड घंट्याच्या आत बाबांनी अग्नी दिला.
२ आ. मृत्यूत्तर विधीच्या वेळी पिंडाला कावळा न शिवणे आणि बहिणींनी ‘तू समृद्धीची अन् बाबांची काळजी करू नकोस’, असे आईला मनातल्या मनात सांगितल्यावर पिंडाला लगेच कावळा शिवणे
मृत्यूनंतरचे विधी करतांना पिंड ठेवण्यासाठी मी आणि बाबा गेलो होतो. तेव्हा तिथे पुष्कळ कावळे होते; पण एकही कावळा पिंडाजवळ आला नाही. मी आणि बाबांनी ५ मिनिटे वाट पाहिली. नंतर माझ्या दोघी बहिणी (सौ. केतकी पंडित आणि सौ. श्रुती बोस) तिथे आल्या आणि त्यांनी आईला ‘तू समृद्धीची अन् बाबांची काळजी करू नकोस’, असे मनातल्या मनात सांगितले. तेव्हा एका क्षणाच्या आत पिंडाला कावळा शिवला.
२ इ. विधी करतांना कोणत्याही प्रकारचा दाब जाणवत नव्हता. त्या वेळी एक वेगळ्या प्रकारची शांतता जाणवत होती.
‘आई परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांपाशी आहे आणि ते तिची काळजी घेतच आहेत’, याची मला पूर्ण निश्चिती आहे. गुरुदेव साधकांचा हात कधीच सोडत नाहीत. ‘परात्पर गुरु डॉक्टर, ‘आईला तुमच्या चरणांजवळ ठेवा आणि तिची काळजी घ्या’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना !’
– कु. समृद्धी शशिधर जोशी (मुलगी, वय २० वर्षे), नाशिक (३०.५.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |