महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील साधिकांनी सादर केलेल्या भरतनाट्यम् आणि कथ्थक या नृत्याची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !
‘जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च २०२१ मध्ये ‘उर्वशी डान्स म्युझिक आर्ट अँड कल्चरल सोसायटी’ या संस्थेने ‘सुर ताल हुनर का कमाल’, या नावाने भारतीय शास्त्रीय गायन अन् नृत्य यांची आंतरराष्ट्रीय ‘ऑनलाईन’ स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये देश-विदेशांतील विविध वयोगटांतील अनेक कलाकारांनी भाग घेतला होता. यामध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ४ साधिकांनी सहभाग घेतला होता. कु. वेदिका मोदी आणि कु. अपाला औंधकर यांनी भरतनाट्यम्, तर कु. शर्वरी कानस्कर आणि कु. अंजली कानस्कर यांनी कथ्थक नृत्य सादर केले. या चौघींनी सादर केलेले नृत्य आणि स्पर्धेतील अन्य कलाकारांनी सादर केलेले नृत्य पहातांना साधिका कु. मधुरा भोसले यांना जाणवलेले भेद येथे देत आहोत.
१. स्पर्धेतील अन्य कलाकारांनी आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकांनी सादर केलेले भारतीय शास्त्रीय नृत्य यांतील भेद
२. विदेशी कलाकारांनी सादर केलेल्या भारतीय शास्त्रीय नृत्याची वैशिष्ट्ये
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत (‘फायनल राऊंड’मध्ये) पोचलेल्या कलाकारांमध्ये विदेशी कलाकारांचाही समावेश होता. विदेशी असूनही त्यांनी कथ्थक, भरतनाट्यम्, उडिसी आणि मोहिनीअट्टम् हे भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार अतिशय सात्त्विक पद्धतीने सादर केले. त्यांनी नृत्याचे पारंपरिक पोषाख धारण करण्यासह नृत्याला अनुसरून असणारे पार्श्वसंगीत निवडले होते. विशेष म्हणजे नृत्याच्या पार्श्वसंगीताचा अर्थ समजून विदेशी कलाकार नृत्य सादर करत असल्यामुळे त्यांच्या मुखावर योग्य हावभाव दिसत होते. ते पाहून भाव आणि आनंद जाणवत होता. या कलाकारांनी ऑडिशन (निवड करण्याच्या) फेरीपासून अंतिम फेरीपर्यंत स्वतःच्या नृत्यामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक पालट केले होते. त्यांच्या नृत्यामध्ये अचूकता आणि सुंदरता (gracefulness) पुष्कळ होती. या तुलनेत भारतातील काही कलाकारांनी नृत्य सादर करतांना पारंपरिक पोषाख न घालता असात्त्विक पोषाख परिधान केला होता. त्याचप्रमाणे काही भारतीय कलाकारांचे नृत्य करतांना नृत्याच्या संगीताला अनुसरून मुखावर भाव दिसत नव्हते. त्यामुळेच विदेशातील काही कलाकारांनी कथ्थक, भरतनाट्यम्, उडिसी आणि मोहिनीअट्टम् या भारतीय शास्त्रीय नृत्यांमध्ये विजेत्या होऊन पुरस्कारही प्राप्त केला. (हे भारतीय स्पर्धकांसाठी लज्जास्पद ! – संकलक)
३. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील साधिकांनी सादर केलेल्या नृत्याचे वैशिष्ट्य
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील साधिकांवर कलेचे सादरीकरण साधना म्हणून करण्याचा संस्कार झालेला आहे. त्यामुळे त्या ‘कलेसाठी कला सादर करत नसून ईश्वरप्राप्तीसाठी कला’ सादर करतात. त्यामुळे त्यांनी सादर केलेले नृत्य पहातांना रसिकांना अनेक अनुभूती येऊन त्यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो.
४. भारतीय शास्त्रीय नृत्याची जाणवलेली काही आध्यात्मिक वैशिष्ट्ये
४ अ. नृत्याची परिपूर्णता त्याचे पार्श्वसंगीत आणि त्यामागील भाव यांवर अवलंबून असणे : नृत्याच्या प्रकाराशी त्याचे पार्श्वसंगीत जुळत असेल, तर त्या नृत्याची आणि नृत्यातील संगीताची स्पंदने एकमेकांशी पूर्णपणे जुळतात. त्यामुळे नृत्य परिणामकारक होते. जर नृत्याचे पार्श्वसंगीत चुकीचे असेल, तर संगीत आणि नृत्य यांची स्पंदने एकमेकांशी जुळत नाहीत. त्यामुळे त्या नृत्याची परिणामकारकता न्यून होऊन ‘असे नृत्य पाहू नये’, असे वाटते.
४ आ. नृत्य करण्यामागील उद्देशाचा परिणाम नृत्यावर होणे : नृत्य करतांना ‘नृत्य करण्यामागील नर्तकांचा उद्देश काय आहे ?’ यावर नृत्यातून प्रक्षेपित होणारी स्पंदने अवलंबून असतात. केवळ स्पर्धात्मक वृत्तीने केलेले नृत्य स्थुलातून कितीही अचूक आणि सुंदर दिसत असले, तरी त्यातून चांगली स्पंदने येत नाहीत. ‘असे नृत्य पाहू नये’, असे वाटते. याउलट ईश्वरप्राप्तीच्या तळमळीने केलेले नृत्य पाहून त्यातून चांगली स्पंदने येतात. यावरून ‘नृत्य करण्यामागील उद्देशाचा नृत्यावर कसा परिणाम होतो’, हे शिकायला मिळते.
४ इ. ईश्वरप्राप्तीच्या तळमळीने आणि भावपूर्णरित्या नृत्य केल्यामुळे त्या नृत्यातून आध्यात्मिक चैतन्य मिळणे : ईश्वरप्राप्तीच्या तळमळीने आणि भावपूर्णरित्या नृत्य केल्यामुळे त्या नृत्यातून वातावरणात पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात. त्यामुळे नृत्य पहाणार्यांची भावजागृती होऊन त्यांना आध्यात्मिक चैतन्य मिळते. त्याचप्रमाणे भावपूर्ण नृत्य केल्यामुळे सभोवतालचे वातावरणही शुद्ध आणि भावमय होते.
५. कलाकार, रसिक आणि प्रेक्षक यांची भूमिका अन् कलेप्रती असणारे कर्तव्य
नृत्य करणारे कलाकार, नृत्य पहाणारे रसिक आणि नृत्याचे परीक्षण करणारे परीक्षक जर साधना करत असतील, तर ते केवळ ‘स्थुलातून नृत्य योग्य प्रकारे होत आहे कि नाही ?’ हेच न पहाता ‘नृत्यातून कोणत्या प्रकारची स्पंदने प्रक्षेपित होतात ?’ याकडेही लक्ष देतील. कलाकार, रसिक आणि परीक्षक यांनी साधना केल्यास त्यांना संगीत अन् नृत्य यांतून प्रक्षेपित होणारी स्पंदने कळतील. त्याचप्रमाणे ते सतत आध्यात्मिक स्तरावर राहिल्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या सात्त्विक अनुभूतीही अनुभवण्यास येतील. अशा प्रकारे नृत्य करणारे, पहाणारे आणि त्याचे परीक्षण करणारे या सर्वांकडून कलेसाठी कला न जोपासता ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ जोपासली जाऊन त्यांच्याकडून व्यष्टी साधना होईल. जेव्हा कलाकार, रसिक आणि प्रेक्षक हे तिन्ही घटक सात्त्विक संगीत अन् नृत्य यांचा प्रसार करतील, तेव्हा त्यांच्याकडून समष्टी साधना होईल. अशा प्रकारे सात्त्विक कलेची जोपासना केल्यामुळे भगवंत प्रसन्न होऊन त्याचे कृपाशीर्वाद लाभतील. त्यामुळे या घोर कलियुगातही सात्त्विक कलेची जोपासना होऊन त्यातून ईश्वरप्राप्ती करण्याचा मार्ग प्रशस्त होईल.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.४.२०२१)