इंग्लंडमधील गोर्यांची विकृती !
नुकताच फूटबॉलचा ‘युरो कप २०२१’चा अंतिम सामना इंग्लड आणि इटली या देशांमध्ये झाला. दोन्ही देशांच्या संघामध्ये तुल्यबळ लढत झाली. परिणामी अतिरिक्त वेळ देऊन दोन्ही बाजूच्या संघांना ‘पेनल्टी कीक’ (फूटबॉलचा ‘गोल’ करण्यासाठी मैदानावरील जाळीजवळ फूटबॉल ठेवून कीक मारणे.) मारण्याची समान संधी देण्यात आली. यामध्ये इंग्लडचे ३ कृष्णवर्णीय खेळाडू ‘गोल’ करण्यास अयशस्वी ठरले. पराभवामुळे इंग्लंडमधील गोर्यांची डोकी फिरली. त्यांनी तिन्ही खेळाडूंविषयी वर्णद्वेषी टीका करण्यास प्रारंभ केला. या समाजकंटकांनी खेळाडूंच्या आई-वडिलांनाही ‘ई-मेल’, भ्रमणभाष यांद्वारे संदेश पाठवून, भ्रमणभाषने संपर्क करून आणि सामाजिक माध्यमांद्वारे वर्णद्वेषी टिपण्या करण्यास प्रारंभ केला. त्याचा तेथील काही सुजाण नागरिक आणि नेते यांनी निषेध केला असला, तरी या निमित्ताने इंग्लडमधील गोर्यांमध्ये वर्णद्वेषाची भावना किती मुरलेली आहे, हे लक्षात आले. यामुळे इंग्लडमधील वातावरण गढूळ झाले.
खेळात यश-अपयश अथवा जय-पराजय हा कुणाच्या तरी वाट्याला येतोच. खिलाडू वृत्तीने पराभव स्वीकारून विजयी संघाचे अभिनंदन करणे चांगल्या मनोवृत्तीचे लक्षण आहे. इंग्लिश लोकांनी मात्र याच्या अगदी विपरीत कृती केली. त्यांनी मैदानाबाहेर येणार्या इटलीच्या नागरिकांना अक्षरश: लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे व्हिडिओ प्रसारित झाले. या व्हिडिओमध्ये इंग्लंडमधील पोलीस तेथील नागरिकांना रोखण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत; मात्र हे गोरे नागरिक एवढे मग्रूर आणि आक्रमक झाले होते की, ते पोलिसांनाही न जुमानता हाणामारी करत होते. त्यांचे हे विकृत रूप पाहून जगानेही तोंडात बोटे घातली असतील. हे गोरे नागरिक एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी कोक आणि अन्य शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्या रस्त्यांवर रागाने आपटल्या, स्वत:जवळ जे काही आहे, ते रस्त्यावर भिरकावले. मैदानात बसण्याच्या आसंद्यांच्या ठिकाणी यामुळे कचर्याचा अक्षरश: ढीग सिद्ध झाला होता, तर रस्ते केराने भरले होते. आपण ज्यांचा उदोउदो करतो, ज्यांच्याकडे सुजाण आणि प्रगत समाज म्हणून पहातो, ते पाश्चात्त्य हेच आहेत का ? असा प्रश्न या निमित्ताने भारतियांना पडला आहे.
विजयी इटलीचा विचार करता, तर त्या देशाच्या नागरिकांनी फटाक्यांच्या पुष्कळ मोठ्या माळा दूर अंतरापर्यंत रस्त्यावर लावल्या होत्या. ते फटाके बराच वेळ फुटत होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण इटलीतील त्या भागांत झाले. विजयाचा आनंद असावा, अतिरेक नसावा. या हवेच्या प्रदूषणाविषयी कुणी का बोलले नाही ? भारतियांच्या सणांमुळे प्रदूषण होते, असे बोलणारे पुढारलेले लोक याविषयी मात्र गप्प !पाश्चात्त्यांचे ते सगळे चांगले, असा अपसमज असणारे कोट्यवधी लोक भारतात आहेत. पाश्चात्त्यांच्या या प्रकारांकडे पाहून तरी ‘सभ्य कोण?’ ‘सुशिक्षित कोण’ आणि ‘पुढारलेले कोण’ हे या सूज्ञ जनांना लक्षात यावे एवढीच येथे अपेक्षा !