गुरुपौर्णिमेला प्रकाशित होणार्या ‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग १)’ या सनातनच्या ग्रंथातील भजन अन् त्याचा भावार्थ !
गुरुपौर्णिमेच्या दिवशी (२३ जुलै २०२१ या दिवशी) सनातनचा ‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग १)’ हा ग्रंथ प्रकाशित होत आहे. या ग्रंथातील भजनांच्या भावार्थांचे लिखाण प.पू. भक्तराज महाराज यांचे मुलुंड (मुंबई) येथील भक्त कै. चंद्रकांत (दादा) दळवी आणि त्यांना साहाय्य त्यांची कन्या सौ. उल्का बगवाडकर यांनी केले आहे. या ग्रंथाचे आणखी २ भाग लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. आज या ग्रंथातील एक भजन आणि त्याचा भावार्थ येथे देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/493073.html |
श्री येई आता येई प्रभु साईनाथा ।
भजन स्फुरण्यामागील पार्श्वभूमी
प.पू. बाबांना प्रतिदिन सकाळी जाग आली की, पहिली आठवण सद्गुरूंची (प.पू. श्री अनंतानंद साईश यांची) यायची. प.पू. बाबांचा २२ मासांचा (महिन्यांचा) परिपाठ होता की, उठल्याबरोबर ते सद्गुरूंकडे धावत जायचे. जातांना वाटेतील फूलवाल्याकडून ते एक पैशाचे गुलाबाचे फूल विकत घ्यायचे आणि ते फूल सद्गुरूंना अर्पण करायचे. फुलाच्या देठाजवळ असलेले काटे सद्गुरूंच्या हातांना लागू नयेत; म्हणून प.पू. बाबा फुलाचे सगळे काटे काढून मगच सद्गुरूंना फूल द्यायचे. सद्गुरूंनी ते फूल स्वीकारले की, प.पू. बाबांना अतिशय आनंद व्हायचा. एकदा प.पू. बाबांच्या मनात गुरुभेटीची आर्तता निर्माण झाल्यावर त्यांना पुढील भजन स्फुरले आणि त्यांनी त्याच भावस्थितीत सद्गुरूंच्या समोर उभे राहून हे भजन म्हटले.
श्री येई आता, येई प्रभु साईनाथा ।
मम हृदया शांतवी आता ।। धृ. ।।
भावार्थ : आई दिसली नाही की, मूल आर्ततेने आईला साद घालते. प.पू. बाबा तसेच गुरुमाऊलीला आर्ततेने साद घालतांना म्हणतात, ‘प्रभु साईनाथा ! तू ये आणि मला जवळ घे अन् माझे हृदय (मन) शांत कर !’
मांस-रुधिर-हाडे समुची देह हा नटला ।
कोण कमी हो या थाटाला ।
तव रूप डोळा पहाता संशय फिटला ।
देहातूनी जीव हा विटला ।
या आत्म्याला कोण रक्षी रे देवा ।
नामाचा मेवा द्यावा ।
होईल कांता का साथी ।
राहील सत्ता ही हाती ।
का देतील संग-संगाती ।
मम मंदिरी या तवविण शून्य हे भासे ।
काळोख दीपविण जैसे ।। १ ।।
भावार्थ : हा देह मांस, रक्त आणि हाडे यांनी युक्त आहे. तसे म्हटले, तर या देहाला काय कमी आहे ? या देहाला जगातले सगळे उपभोग घेता येतात, पाहिजे ते सुख मिळते; परंतु सद्गुरुनाथा, तुम्हाला पहाताक्षणीच माझ्या मनातल्या सगळ्या शंका मिटल्या अन् माझ्या मनाला पटले की, तुम्हीच या विश्वाचे निर्माते आहात आणि तुम्हीच परब्रह्मही आहात ! हा क्षुल्लक देह आणि आत्मा यांचा काहीही संबंध नाही. मायेच्या चिखलात लोळणार्या मला ‘देहाचे इथले वास्तव्य क्षणभंगूर आहे’, हे कळल्याने या देहाचा वीट आला आहे. अशा परिस्थितीत या आत्म्याचे रक्षण कोण करणार ? माझ्या मुखात सतत नाम असू दे; कारण नामाचा मेवाच शेवटी मला संसारसागर पार करायची शक्ती देईल, तसेच माझ्या आत्म्याचे रक्षण करील, म्हणजे मला ईश्वराशी एकरूप करील.
या जगात मी एकटाच आलो आहे आणि या जगातून एकटाच जाणारही आहे. मृत्यूनंतरच्या प्रवासात मला पत्नीची किंवा मित्रांची साथ थोडीच मिळणार आहे ? कुणाची सत्ता तेथे कामाला येणार नाही. जसे दीप प्रज्वलित नसलेल्या मंदिरात काळोख असतो, तसे तुमच्याविना माझ्या मनमंदिरात सर्वकाही शून्य आहे.
काम-क्रोध सदा या अंगी धगधगतो ।
तव नाम मुखीचे मुकतो ।
या संसारी नाना खेळ मांडियले ।
त्यामाजी मना गुंफियले ।
हे त्यागूनी बा रूप कसे आठवावे ।
तव चरणी कसे लीन व्हावे ।
सामर्थ्य ओपी (टीप) रे ऐसे ।
मायेत जीव ना गुंते । भजनातच मन हे रंगे ।
तव नामामध्ये देहवृत्ती विरघळू दे ।
नामीच चित्त राहू दे ।। २ ।।
टीप – ओत, दे
भावार्थ : मी षड्रिपूंना अजून जिंकू शकलो नाही. काम आणि क्रोध यांची कुंडे तर माझ्या अंगात सदा धगधगत असतात. त्यामुळे माझ्या मुखात नाम येत नाही. (मनाला शांती असेल, तरच नामस्मरण होते.) या संसारात नाना खेळ आहेत. त्या खेळांत माझे मन गुंग होऊन रंगून जाते. सद्गुरुराया, या खेळांचा त्याग करून मी तुमचे रूप माझ्या डोळ्यांसमोर केव्हा आणि कसे आणू ? तुमच्या चरणी मी कसा लीन होऊ ?
‘गुरुराया, आता आपण मला असे सामर्थ्य द्या की, मी मायेला जिंकून तिला बाजूला सारू शकेन. ‘माझा जीव परत संसाररूपी मायेत गुंतणार नाही आणि मन भजनानंदात रंगेल’, असे करा ना हो !
गुरुराया, मला नामाविना दुसरे काही नको. नामस्मरणात माझी देहवृत्ती पूर्णपणे विरघळून जाऊ दे, म्हणजे ‘देह म्हणजे मी’, ही जाणीव नष्ट होऊन ‘तूच या देहाद्वारे सर्वकाही करत आहेस’, ही तुझ्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होऊ दे. माझे चित्त सदैव नामातच राहू दे, मी देहाने कोणतीही कृती करत असलो, तरी माझ्या अंतर्मनात नामस्मरण सतत चालू राहू दे !’
प.पू. श्री अनंतानंद साईश यांनी प.पू. बाबांना गुरूंच्या सगुण पूजेत न अडकण्याची दिलेली शिकवण !हे भजन लिहिल्यावर प.पू. बाबांनी ते श्री गुरूंना म्हणून दाखवले आणि मग ते नेहमीप्रमाणे त्यांची पूजा करू लागले. तेव्हा रागावून श्री गुरु म्हणाले, ‘‘तू लिखता है और तू ही बिगाडता है ।’’ तेव्हा प.पू. बाबांना कळेना, ‘आपली चूक काय झाली ?’ श्री गुरूंना नमस्कार करून ते बाजूला उभे राहिले आणि त्यांनी विचार केला की, भजन परत वाचावे. तेव्हा ‘मांस-रुधिर-हाडे समुची देह हा नटला । … देहातूनी जीव हा विटला ।’ या ओळींतून त्यांना बोध झाला की, ‘आता पूर्वीसारखे इतरांप्रमाणे गुरूंच्या देहाच्या, म्हणजे सगुणाच्या पूजेत अडकू नकोस’, असे श्री गुरूंना शिकवायचे आहे. तेव्हापासून त्यांची सगुणातील पूजा बंद झाली ! (अन्य भजनांचा भावार्थ क्रमशः गुरुवारी प्रसिद्ध करत आहोत.) |
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/496868.html |