प्रसिद्ध शिल्पकार विजय गुजर यांनी उभारले हनुमानाची २५ फुटी सुंदर मूर्ती !
मिरज, १४ जुलै – येथील प्रसिद्ध शिल्पकार विजय गुजर यांनी पंढरपूर महामार्गालगत कळंबी येथील त्यांच्या ‘फार्म हाऊस’मध्ये हनुमानाचे २५ फुटी सुंदर मूर्ती उभारली आहे. मिरजेच्या वैभवात या मूर्तीमुळे भर पडली असून लवकरच या मूर्तीचे अनावरण होणार आहे. हनुमानाची ही भव्य मूर्ती अत्यंत सात्त्विक असून पंढरपूर महामार्गावरून जाणार्या प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
हनुमानाची भव्य मूर्ती महामार्गाच्या पुलावरून दिसावी, अशी योजना करण्यात आली आहे. त्यासाठी पुलाच्या उंचीएवढा चबुतरा सिद्ध करण्यात आला आहे. रत्नागिरी-नागपूर हा महामार्ग कळंबी गावाजवळून जातो. याच ठिकाणी रस्त्यालगत गुजर यांच्या ‘फार्म हाऊस’मध्ये उभारलेल्या हनुमानाच्या भव्य मूर्तीमुळे महामार्गालाही वेगळी ओळख मिळणार आहे. या ‘फार्म हाऊस’मध्ये मोठे शिल्पसंग्रहालयही करण्याचा मानस विजय गुजर यांनी व्यक्त केला आहे