द्वारका (गुजरात) येथील द्वारकाधीश मंदिरावर वीज कोसळली; मात्र मंदिराची हानी नाही !

द्वारकाधिशाने आम्हाला मोठ्या संकटातून वाचवले ! – स्थानिक नागरिक

द्वारकाधीश मंदिर

द्वारका (गुजरात) – येथील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरावरील ५२ फूट ध्वजावर १३ जुलै या दिवशी दुपारी २.३० वाजता वीज कोसळल्याने ध्वजाची अल्प प्रमाणात हानी झाली. यात द्वारकाधीश मंदिराची कुठलीही हानी झालेली नाही. वीज कोसळली, तेव्हा मंदिरात पूजा-अर्चा चालू होती आणि भाविकही उपस्थित होते. ‘मंदिराच्या एखाद्या भागावर वीज कोसळली, हे पहिल्यांदाच घडले आहे. द्वारकाधीश म्हणजे स्वतः श्रीकृष्ण जिथे विराजमान आहे, तेथील लोकांवर कुठलेच संकट येणार नाही. द्वारकाधिशाने शहरातील नागरिकांना मोठ्या दुर्घटनेपासून वाचवले आहे’, असे स्थानिक नागरिक म्हणत आहेत. द्वारकाधीश मंदिरावर वीज कोसळतांनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. मंदिराच्या आजूबाजूला अतिशय दाट लोकवस्ती असून तिच्यावर वीज कोसळली असती, तर मोठी हानी झाली असती. द्वारकाधीश मंदिरावर लावण्यात आलेल्या ध्वजाचे एक विशेष महत्त्व आहे. या ध्वजाला ‘५२ फूट ध्वजा’ असे म्हटले जाते.

द्वारकाधीश मंदिराचे महत्त्व !

द्वारकाधीश मंदिर हे गुजरातमधील सर्वांत प्राचीन आणि पवित्र मंदिर मानले जाते. हे मंदिर गोमती नदीच्या काठावर आहे. भगवान श्रीकृष्णाचे हे मंदिर आहे. देशातील श्रीकृष्णाच्या काही प्रमुख मंदिरांपैकी हे एक मंदिर मानले जाते. द्वारकाधीश मंदिर हे सुमारे २ सहस्र २०० वर्षे प्राचीन असून ते वज्रनाभ यांनी बांधल्याचे बोलले जाते. या मंदिराच्या परिसरात भगवान श्रीकृष्णासह सुभद्रा, बलराम, रेवती, वासुदेव, रक्मिणी यांसह अनेक देवी आणि देवता यांचीही मंदिरे आहेत. येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीला होणारा उत्सव पहाण्यासाठी लाखो नागरिक येत असतात.