शिवकालीन राजमार्ग खुला होण्यासाठी खासदार आणि आमदार यांना निवेदने
सातारा, १४ जुलै (वार्ता.) – शिवकालीन राजमार्ग कास पठार ते माचूतर, महाबळेश्वर हा रस्ता पूर्ववत् चालू रहावा, यासाठी सह्याद्री कोयना संघर्ष समिती (४३ गावे) यांच्या वतीने सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील आणि सातारा-जावळी विधानसभेचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये म्हटले आहे, सध्या कास पठार ते माचूतर हा शिवकालीन राजमार्ग बंद आहे. तो पूर्वी जसा चालू होता, तसाच चालू ठेवावा. डोंगरमाथ्यावरील लोकांसाठी ते सोयीचे होईल. या भागातील पर्यटन वाढीच्या दृष्टीकोनातून या रस्त्याला विशेष महत्त्व आहे. या भागातील जवळपास सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे; मात्र वनविभागाच्या सीमेतील १०० ते १५० मीटर रस्त्यांचे डांबरीकरण झालेले नाही. तेही तातडीने पूर्ण करून द्यावे.