पाकमध्ये चिनी अभियांत्रिक आणि कामगार यांच्या बसवरील आक्रमणात १० ठार
६ चिनी नागरिकांचा समावेश
चीनने पाकमधील आतंकवादाला प्रोत्साहन दिले. त्याचे परिणाम त्याला भोगावे लागत आहेत. या घटनेनंतर तरी चीन शहाणा होईल का, ते पहावे लागेल !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – चिनी अभियंते घेऊन जात असलेली बस रस्त्याच्या शेजारी लपवण्यात आलेल्या स्फोटकांनी उडवून देण्यात आल्याची घटना पाकच्या कोहिस्तानमध्ये घडली आहे. यामध्ये कमीतकमी १० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये ६ चिनी नागरिकांचा समावेश आहे. या बसमध्ये ३६ चिनी नागरिक प्रवास करत होते. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
१. चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गाचा एक भाग असलेल्या दासू बंधार्याच्या बांधकामासाठी हे चिनी अभियंते आणि कामगार या बसमधून बांधकामाच्या ठिकाणी जात होते. त्यांच्यासमवेत पाकिस्तानचे २ सैनिकही होते. या दोन्ही सैनिकांचा या स्फोटात मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलाने या स्फोटाची चौकशी चालू केली आहे.
२. पाकिस्तानमधील आर्थिक महामार्गाला स्थानिकांनी वारंवार विरोध केला आहे. बलुचिस्तानमधील कट्टर संघटनांनी याविरोधात उघड भूमिका घेतली आहे. काही मासांपूर्वी क्वेटामध्ये चीनचे राजदूत थांबलेल्या हॉटेलमध्ये स्फोट घडवण्यात आला होता. या स्फोटाच्या वेळी राजदूत हॉटेलमध्ये नव्हते. या स्फोटात ५ जण ठार झाले होते. हा स्फोट बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने केला असल्याचा संशय व्यक्त केला जात होता.
Pakistan bus blast: Massive explosion kills 10 including 6 Chinese engineers https://t.co/sO6XEJwuEA
— Republic (@republic) July 14, 2021
पाकने चौकशी करावी ! – चीनची मागणी
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी या आतंकवादी आक्रमणाचा निषेध केला. या प्रकरणातील दोषींना अटक करण्याची, तसेच पाकमध्ये असलेले चिनी अभियंते आणि कामगार यांना पूर्ण संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली.
याआधी पाकने या स्फोटाला अपघात असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला होता; मात्र चिनी दूतावासाने हे आक्रमण असल्याचे म्हटल्यावर पंतप्रधान इम्रान खान यांचे संसदीय सल्लागार बाबर अवान यांनी आक्रमण असल्याचे म्हटले.