साधकांप्रतीच्या निरपेक्ष प्रेमामुळे साधकांना आधार देणारे बहुगुणी पू. विनय नीळकंठ भावे !
२५.६.२०२१ या दिवशी सनातनचे ३५ वे संत पू. वैद्य विनय भावेकाका (वय ६९ वर्षे) यांनी मोर्डे, जिल्हा रत्नागिरी येथे देहत्याग केला. साधकांना पू. विनय नीळकंठ भावेकाका म्हणजे ‘एक पितृतुल्य संत आहेत’, असे वाटत असे. देवद आश्रमातील साधिका कु. नलिनी राऊत यांनी त्यांच्या सहवासात अनुभवलेले भावक्षण येथे दिले आहेत.
‘साधारण १९९९ मध्ये मी रायगड जिल्ह्यात संस्थेच्या प्रसार सेवेसाठी जात होते. त्या वेळी वैद्य भावेकाका वरसई (पेण) येथे त्यांच्या गावी असत. ते लहानथोर सर्वांवर भरभरून प्रेम करायचे. त्यांनी भरभरून केलेल्या प्रेमाच्या काही आठवणी पुढे दिल्या आहेत.
१. साधकांच्या आवडीप्रमाणे खाऊ आणणे
ते कधीही पनवेलला येतांना आठवणीने माझ्या आवडीच्या काकड्या घेऊन यायचे. दोन वर्षांपूर्वी मी पुष्कळ रुग्णाईत होते. त्या वेळीही त्यांनी आवर्जून माझ्यासाठी एका साधकाकडे पैसे दिले. मला मधुमेह असल्यामुळे त्यांनी त्याला मला शर्कराविरहित आईस्क्रिम विकत घेऊन देण्यास त्या साधकाला सांगितले.
२. पूर्णवेळ साधकांप्रती असलेला भाव
मी रुग्णाईत असतांना त्यांनी कधी त्यांच्याकडील औषधे दिली, तर ते माझ्याकडून पैसे घेत नसत. पैसे देऊ केले, तर ते म्हणायचे, ‘‘तुम्ही घरदार सोडून पूर्णवेळ साधना करता. मला तुमची तेवढी तरी सेवा करू दे !’’
३. प्रार्थना
‘पू. वैद्य भावेकाका यांच्यासारखे भरभरून प्रेम मलाही सर्वांवर करता येऊ दे !’, हीच ईश्वरचरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– कु. नलिनी राऊत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.६.२०२१)