‘नाबार्ड’कडून सातारा जिल्हा बँकेला ‘बेस्ट परफॉर्मन्स’ पुरस्कार
सातारा, १३ जुलै (वार्ता.) – राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (‘नाबार्ड’) यांच्याकडून प्रतिवर्षी उत्कृष्ट कार्यक्षमतेविषयीचा ‘बेस्ट परफॉर्मन्स’ बँक पुरस्कार दिला जातो. तो या वर्षी सातारा जिल्हा बँकेला प्रदान करण्यात आला आहे.
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना पुरस्कार देण्यात आला. या वेळी बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे उपस्थित होते. शेतीसाठी कर्जपुरवठा, वंचित घटकांना प्रवाहात घेणे, महिला सक्षमीकरण, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, बँकेची आर्थिक प्रगती, कर्ज वितरण आणि वसुली यांतील सातत्य, उत्कृष्ट लाभ (नफा), या निकषांवर बँकेला हा पुरस्कार देण्यात आला आहे, असे बँकेच्या पदाधिकार्यांनी सांगितले आहे.
सातारा जिल्हा बँकेला ‘ईडी’ची नोटीस नसून केवळ जरंडेश्वर कारखान्याची माहिती मागितली आहे ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले
जरंडेश्वर साखर कारखान्याला केलेल्या कर्ज पुरवठ्यावरून बँकेला ‘ईडी’ची नोटीस आलेली नसून केवळ माहिती मागवण्यात आली आहे. यामुळे बँकेच्या कोणत्याही धोरणास बाधा येणार नाही. इतर कारखान्यांप्रमाणेच जरंडेश्वरलाही योग्य तारण घेऊनच कर्ज पुरवठा करण्यात आलेला आहे. त्यामुळे बँक पूर्णत: सुरक्षित आहे, असे बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.