विटा (जिल्हा सांगली) येथे अटल भूजल योजना चित्ररथाचा शुभारंभ !
विटा (जिल्हा सांगली), १२ जुलै – भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सांगली कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या अटल भूजल या योजनेच्या प्रसिद्धीसाठी चित्ररथाच्या संचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रशासन पुरस्कृत अटल भूजल योजना ही राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत आहे. ११ जुलैला शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते अटल भूजल योजना चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी प्रांताधिकारी संतोष भोर, पंचायत समितीचे सभापती महावीर शिंदे, तहसीलदार ऋषिकेश शेळके, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा सांगली कार्यालयाचे यांत्रिकी अभियंता नीलेश जाधव उपस्थित होते.
ही योजना सांगली जिल्ह्यातील भूजल पातळीत सातत्याने घट होत चाललेल्या खानापूर, कवठेमहांकाळ, जत, तासगाव या तालुक्यांतील ९२ गावात राबवण्यात येणार आहे. चित्ररथाच्या माध्यमातून जागृती हा योजनेचा पहिला टप्पा असून पुढे लोकसहभागातून गावांचा जलसुरक्षा आराखडा बनवणे, अभिसरणातून विविध यंत्रणांशी संबंधित जलसंधारासाठी आणि पाणी बचतीच्या उपाययोजनांची कामे हाती घेणे, गावांमध्ये जलपरिपूर्णतेसाठी लोकसहभागातून ठोस व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहेत.