कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेले कर्मचारी आणि गोमंतकीय नागरिक यांना गोव्यात प्रवेश देण्यास न्यायालयाची मान्यता
लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यास कोरोना ‘निगेटिव्ह’ प्रमाणपत्र नको
पणजी, १२ जुलै (वार्ता.) – कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेला उद्योग, बांधकाम आदी क्षेत्रांतला कर्मचारीवर्ग, व्यावसायिक आणि मूळचे गोमंतकीय नागरिक यांना कोरोना ‘निगेटिव्ह’ प्रमाणपत्राविना गोव्यात प्रवेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने मान्यता दिली आहे. खंडपिठाने ५ ऑगस्ट २०२१ पर्यंत गोवा शासनाला ही सूट दिली आहे; मात्र गोव्यात प्रवेश करणार्या पर्यटकांना कोरोना ‘निगेटिव्ह’ प्रमाणपत्र समवेत बाळगणे अजूनही बंधनकारक रहाणार आहे. दक्षिण गोवा अधिवक्ता संघटनेने राज्यातील कोरोना व्यवस्थापनावरून प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी गोवा खंडपिठाने हा अंतरिम आदेश दिला. याविषयी पुढील सुनावणी ५ ऑगस्ट या दिवशी होणार आहे. या वेळी शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या पर्यटकांना कोरोना ‘निगेटिव्ह’ प्रमाणपत्राविना गोव्यात प्रवेश देण्याची मागणी केल्यास त्यावर खंडपीठ पुढे निर्णय देणार आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या पुढील वर्गांतील व्यक्तींना कोरोना ‘निगेटिव्ह’ प्रमाणपत्राविना गोव्यात प्रवेश मिळणार आहे.
१. गोव्यात उद्योगक्षेत्र, बांधकाम क्षेत्र आदींमध्ये काम करणारे कर्मचारी आणि कामगार
२. व्यवसायाच्या निमित्ताने गोव्यात प्रवेश करू इच्छिणारे
३. कोरोना महामारी किंवा अन्य तत्सम् कारणे यांमुळे गोव्याबाहेर अडकून पडलेले मूळचे गोमंतकीय नागरिक
४. काम किंवा वैद्यकीय कारण यांसाठी गोव्याबाहेर जाऊ इच्छिणारे आणि पुन्हा काही दिवसांनी परत येणारे गोमंतकीय नागरिक
कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेले याचा अर्थ ‘कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा घेऊन २ किंवा ३ आठवडे उलटले आहेत अशी आणि कोरोनाची लक्षणे नसलेली व्यक्ती’, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.