इयत्ता १० वीचा ऐतिहासिक निकाल : ९९.७२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
पणजी, १२ जुलै (वार्ता.) – यंदा इयत्ता १० वीचा ऐतिहासिक निकाल लागला आहे. इयत्ता १० वीतील ९९.७२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी हा निकाल ९२.६९ टक्के लागला होता. गोवा शालांत मंडळाने यंदा कोरोना महामारीमुळे १०वीच्या परीक्षा रहित करून अंतर्गत मूल्यांकन पद्धतीच्या माध्यमातून प्रत्येक विद्यालयामध्ये निकाल समिती स्थापन करून हा निकाल सिद्ध केला आहे. गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी १२ जुलै या दिवशी हा निकाल घोषित केला.
यंदा इयत्ता १० वीसाठी २३ सहस्र ९६७ नियमित विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते, तर ५१७ विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेसाठी अर्ज भरले होते. यामधील २३ सहस्र ९०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यांपैकी १२ सहस्र ९४६ मुले आहेत आणि १० सहस्र ९५४ मुली आहेत.
निकालाविषयी मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये म्हणाले,‘‘एखादा विद्यार्थी निकालावरून समाधानी नसल्यास त्याने मंडळाला संपर्क साधावा. संबंधित विद्यार्थ्याला पुढे प्रत्यक्ष परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करण्यात येणार आहे.’’