देवभक्ती आणि साधनेवरील दृढ विश्वास यांमुळे प्रतिकूल परिस्थितीचा धैर्याने सामना करणार्या तपोधाम (जिल्हा रत्नागिरी) येथील श्रीमती कल्पना चव्हाण (वय ६७ वर्षे) !
‘अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही साधनेत पुढे जाता येते, हे श्रीमती कल्पना चव्हाण यांनी लिहिलेल्या पुढील लेखावरून लक्षात येईल. त्याविषयी त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
लहानपणापासून घरची स्थिती गरिबीची असूनही घरातील धार्मिक संस्कारांमुळे मुंबईसारख्या रज-तमात्मक वातावरणातही देवाच्या स्मरणात राहिल्यामुळे श्रीमती चव्हाण यांचे लहानपणीचे जीवन आनंदी होते. त्यांना सासरी पुष्कळ त्रास होता, तरीही त्या सर्व त्रास सोसू शकल्या, ते केवळ देवभक्ती आणि साधना यांमुळे मिळालेल्या बळामुळेच ! यातून ‘बालपणीच मनावर साधनेचे आणि धार्मिकतेचे संस्कार होणे किती आवश्यक आहे, ईशस्मरणाने आत्मबळ कसे वाढते !’ या गोष्टी लक्षात येतात. श्रीमती कल्पना चव्हाण यांनी सांगितलेल्या त्यांचा जीवनपटातील काही सूत्रे पुढे दिली आहेत.
१. बालपण
‘माझा जन्म वर्ष १९५२ मध्ये झाला. आम्ही ३ भाऊ आणि २ बहिणी अशी ५ भावंडे आहोत. आमच्या घरी गरिबी होती. आमचे वडील मुंबईत रेल्वेत नोकरीला होते. आम्ही ५ भावंडे, आई, आमच्या २ आत्या, २ काका, आजी आणि आजोबा असे एकत्र कुटुंबात वहाळ या गावी रहात होतो. आमची वडिलोपार्जित भूमी फारशी नव्हती. गावी उत्पन्नाचे दुसरे साधन नव्हते. माझ्या वडिलांवर या मोठ्या कुटुंबाचे दायित्व असल्याने त्यांना मिळणार्या वेतनात आमचे भागत नसे.
२. देवधर्म आणि कुलाचार यांचे पालन करणे
आमच्या घरातील सर्व जण देवाची भक्ती करत होते. आजी-आजोबा कुलाचाराचे काटेकोरपणे पालन करायचे. ते प्रतिदिन सकाळी देवपूजा करायचे. त्यांच्यामुळेच आमच्यावर देवभक्तीचे संस्कार झाले. आई-वडील सर्व प्रकारचे उपवास करायचे. ते प्रतिदिन काशीखंड आणि शनिवारी शनिमहात्म्य वाचायचे. एकदा ते शिर्डीला गेलेे होते. तेव्हापासून ते साईबाबांची भक्ती करू लागले. आई मार्गशीर्ष मासातील गुरुवार आणि अन्य उपवास करायची. त्यामुळे आम्हा सर्वांवर चांगले संस्कार होऊन आमच्यात भक्तीमार्गाचे बीज रोवले गेले.
३. मुंबईत स्थायिक होेणे, शिक्षण अर्धवट सोडावे लागून नोकरी करणे; मात्र मनावरील चांगल्या संस्कारामुळे मन श्रीकृष्णाच्या अनुसंधानात राहून आनंदी असणे
मुंबईत रहात असलेल्या माझ्या वडिलांच्या जेवणाचे हाल होऊ लागले. तेव्हा मी सातवीत असतांना आम्ही सर्व भावंडे आईसह मुंबईत रहायला आलो. अन्य कुटुंबीय गावातच रहात होते. वडील त्यांना पैसे पाठवायचे. आम्हा भावंडांमध्ये मी मोठी आहे. माझे सातवीपर्यंत शिक्षण झाल्यावर मला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. नंतर मला एका साध्या आस्थापनात नोकरी लागली. मी आस्थापनातून घरी आल्यावर आम्ही वायरच्या पिशव्या बनवून विकत होतो. त्यामुळे घरी आर्थिक साहाय्य होत असे. यामुळे मला लहान वयातच दायित्वाची जाणीव झाली. लहानपणी माझ्यावर झालेल्या चांगल्या संस्कारांमुळे मी आनंदी होते. माझे मन शुद्ध आणि निर्मळ होते. त्या वेळी मी सतत श्रीकृष्णाची गाणी गुणगुणायचे. मला श्रीकृष्णाची ओढ लागली होती; म्हणून मी देवदेवतांची पुस्तके वाचू लागले. माझी देवावरची श्रद्धा अधिकच दृढ झाली.
४. वैवाहिक जीवन
माझा वयाच्या २० व्या वर्षी विवाह झाला. सासूबाईंना त्यांच्या भावाची मुलगी करायची होती; पण माझ्या यजमानांना ती पसंत नव्हती. ‘गरिबाची मुलगी आईची सेवा चांगली करेल’, या विचाराने त्यांनी मला होकार दिला.
४ अ. यजमान लहानपणापासून अन्य पंथियांच्या वस्तीत राहिल्याने त्यांना हिंदु देवतांविषयी आदरभाव न वाटणे, त्या लोकांच्या संगतीने यजमानांना मद्याचे व्यसन लागणे : माझे यजमान लहानपणापासून अन्य पंथियांच्या वस्तीत राहिले होते. त्यामुळे त्यांचे त्या लोकांशी अधिक संबंध होते. ते हिंदूंच्या देवतांना न मानता त्या पंथियांच्या देवतांना मानायचे. त्यांच्या प्रत्येक सणात ते सहभागी होत असत. त्यांचा हिंदु देवतांवर विश्वास नव्हता. ते हिंदु देवतांचा रागही करायचे. मी त्यांना आपल्या देवतांविषयी सांगायचे; परंतु त्यांनी ते कधी ऐकले नाही. इतर पंथियांशी संबंध असल्याने त्यांना उंची दारूचे व्यसनही लागले. मी हे सर्व सहन करायचे.
४ आ. यजमानांची एक गोष्ट चांगली होती. मी जे देवाचे करायचे, त्यात यजमानांनी कधी आडकाठी केली नाही. एकदा यजमानांच्या जिवावर बेतलेल्या प्रसंगात देवाने त्यांना वाचवले. त्यामुळे मी माझ्या समजुतीप्रमाणे देवाची उपासना चालू ठेवली होती.
५. सनातन संस्थेशी संपर्क होणे
५ अ. मुंबईहून गावी आल्यावर सनातन संस्थेचे प्रवचन ऐकायला मिळणे आणि ‘येथेच मनाला शांतता लाभेल’, असे वाटून साधना करणेे : वर्ष १९९५ मध्ये माझ्या दुसर्या मुलीचा प्रेमविवाह झाला. मी माझ्या मुलांना घेऊन गावी आले. त्यानंतर २ मासांंनी घरी एक मुलगी आली आणि तिने ‘सनातन संस्थेच्या प्रवचनाला या’, असे मला सांगितले. ‘प्रवचन काय आहे ?’, हे ऐकण्यासाठी मी तिथे गेले. त्यांचे मार्गदर्शन मला भावले. ‘येथेच माझ्या मनाला शांतता लाभेल’, अशी माझ्या मनाला निश्चिती वाटली. त्यानंतर लगेचच मी सनातन संस्थेने सांगितल्यानुसार साधनेला आरंभ केला.
५ आ. साधना चालू केल्यानंतर कुटुंबियांकडून झालेला विरोध आणि साधनेने लाभलेले आध्यात्मिक बळ
५ आ १. यजमानांनी साधनेला विरोध करणे : त्यानंतर माझ्या यजमानांचे गावाकडेच स्थानांतर झाले. ‘मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करायचे’ हे माझ्या यजमानांना पसंत नव्हते. ते मला म्हणायचे, ‘‘तू सनातन संस्थेत जातेस. त्यामुळे आम्हाला त्रास होतो.’’ मी सत्संगाला जायचे. तेव्हा त्यांना फार राग यायचा. ते त्या दिवशी जेवायचे नाहीत. मी साधनेत येण्यापूर्वी घरचे सर्व दायित्व माझ्याकडे होते. मी साधनेत आल्यावर यजमानांनी ते दायित्व त्यांच्याकडे घेतले. त्यांना ‘मी सनातन संस्थेला पैसे देईन’, असे वाटायचे. एकदा त्यांनी प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र रागाने भिरकावून दिले. त्या वेळी मला फार त्रास झाला. तेव्हा मी नामजप करून त्या त्रासावर मात केली.
५ आ २. गावी आल्यावर मुलाला त्रास होणेे : माझ्या मुलाला गावी आल्यानंतर त्रास व्हायला लागला. आमच्या घराचे प्रवेशद्वार दक्षिण दिशेला होते आणि घरासमोर अन्य पंथियांचे प्रार्थनास्थळ होते. त्यामुळे मुलाला होत असलेल्या त्रासात वाढ झाली. माझे यजमानही मुलाला घाबरायचे. कधी कधी तो रात्रीच्या वेळीही बाहेर जायचा. तो दिवसभर दूरदर्शनवरील दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम लावून गाणी म्हणायचा. एकदा एक अन्य पंथीय व्यक्ती काही हिंदु लोकांना घेऊन त्याला मारण्यासाठी आली होती. तेव्हा मी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना घरी घेऊन आले. तेव्हा ते सर्व लोक पसार झाले.
५ आ ३. आम्ही नवीन घर बांधले. ती जागा आमच्या नावावर करण्यासाठी एका नातेवाईकाने मला सांगितले, ‘‘तुमचे मृत्यूपत्र करा. मग मी यावर सही करून देतो’’; पण आम्ही त्याचे काही ऐकले नाही. असा भयंकर त्रास चालू असतांना माझी साधनाही चालू होती.
६. अनुभूती
६ अ. सत्संगाला जाऊ लागल्यावर शारीरिक त्रास उणावून औषधांवर होणारा व्यय न्यून होणे : माझी साधना व्यवस्थित चालू झाली. मी सत्संगांना जायला लागल्यावर माझा शारीरिक त्रास उणावला. त्यामुळे माझे औषधे घेणे बंद झाले. माझा औषधांवर होणारा व्यय न्यून झाला.
६ आ. मी साधना करू लागल्यावर काही दिवसांनी एका रात्री देवीने मला स्वप्नात दर्शन दिले. त्यामुळे माझा साधनेवरील विश्वास वाढला.
६ इ. एकदा हिंदु राष्ट्र-जागृती सभा चालू असतांना मला श्रीकृृष्णाचेे विराट रूपात दर्शन झाले.’
– श्रीमती कल्पना चव्हाण (तपोधाम), तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. (१७.८.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |