सनातनचे ४७ वे संत पू. रघुनाथ राणे (वय ८२ वर्षे) यांचा ठाणे येथे देहत्याग !
मुंबई – मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओझरम या गावचे रहिवासी आणि सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेले सनातनचे संत पू. रघुनाथ वामन राणे (पू. राणेआजोबा) (वय ८२ वर्षे) यांनी ११ जुलै २०२१ या दिवशी उत्तररात्री २ वाजता मुंबई येथील रुग्णालयात देहत्याग केला. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुलगे, १ मुलगी, एक सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. १२ जुलै या दिवशी त्यांच्या पार्थिवावर बाळकुम, ठाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
पू. राणेआजोबा यांनी वर्ष १९९९ मध्ये, म्हणजे वयाच्या ६० व्या वर्षी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. केवळ १६ वर्षांत तळमळीने साधना करून ते संतपदी विराजमान झाले. १५.३.२०१५ या दिवशी त्यांना ‘सनातनचे ४७ वे संतरत्न’ म्हणून घोषित करण्यात आले. त्यांनी वर्ष २०११ ते २०१५ या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या आयनी-मेटे येथील तपोधाम येथे सेवा केली होती.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पूर्वी पू. राणेआजोबा यांच्याविषयी काढलेले कौतुकोद्गार !
‘सर्वस्वाचा त्याग, अखंड सेवा, सर्वांप्रती प्रेम, कशाविषयीही कधीच तक्रार नसणे इत्यादी अनेक गुणवैशिष्ट्ये असलेल्या पू. राणेआजोबांनी साधकांसमोरच नाही, तर अनेक संतांपुढेही आदर्श संतांचे उदाहरण ठेवले आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पू. राणेआजोबा यांनी परात्पर गुरु डॉक्टरांशी झालेल्या प्रथम भेटीचे केलेले भावपूर्ण वर्णन !
‘परात्पर गुरु डॉक्टरांशी माझी पहिली भेट वर्ष २००१ मध्ये कणकवली येथे झाली. तेथे परात्पर गुरु डॉक्टरांचे मार्गदर्शन होते. गावापासून कणकवलीला जायला मला गाडी मिळाली नाही. मी अर्धा कि.मी. अंतर पायी चालत गेल्यावर मला वाहन मिळाले. सभागृहाच्या समोर असलेल्या एका दाराने परात्पर गुरु डॉक्टर आणि दुसर्या दाराने मी आत आलो. तेथेच आमची पहिली भेट झाली. दोघांनीही एकमेकांकडे बघून नमस्कार केला.’ – (पू.) रघुनाथ राणे
पू. राणेआजोबा यांचा परिचय आणि संक्षिप्त शब्दांत साधनाप्रवास
१. नोकरी न करता वडिलांना साहाय्य करण्यासाठी शेती करणे आणि ‘उत्तम शेतकरी’ म्हणून पुरस्कार मिळवणे
‘पू. राणेआजोबांचे शिक्षण जुन्या ७ व्या इयत्तेपर्यंत झाले होते. त्यांना शिक्षकाच्या नोकरीसाठी बोलावणेही आले होते; पण वडिलांना शेतीच्या कामात साहाय्य करण्यासाठी ते घरीच राहिले. त्यांना ‘उत्तम शेतकरी’ म्हणून पुरस्कारही मिळाला होता. पू. आजोबांनी शेतीसमवेतच ‘आरोग्य रक्षक’ आणि ‘होम गार्ड’ म्हणूनही काम केले.
२. साधनेत येण्यापूर्वी
‘साधनेत येण्यापूर्वी पू. राणेआजोबांना देवपूजा, तसेच समाजसेवा करण्याची आवड होती. पहाटे ४ वाजता उठून ते प्रथम देवपूजा करत आणि नंतर शेतीच्या कामाला आरंभ करत. ते सायंकाळी नामस्मरण आणि आरती न चुकता करत.
३. प्रसार करून सत्सेवेला आरंभ !
कणकवली तालुक्यातील ओझरम गावी (पू. राणेआजोबांचे गाव) सनातनची एक सभा होती. त्या वेळी त्यांनी सगळ्या लोकांना सभेचा उद्देश समजावून सांगितला. त्यांना अजूनही पुष्कळ काही करायचे होते; म्हणून पुढे त्यांनी सनातनच्या माध्यमातून साधनेला आणि सेवेला आरंभ केला. ते दुपारी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करत. शेतीची कामे करून ते सत्संगाला जात. ते गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अर्पण गोळा करणे, तसेच प्रसार करणे आदी सेवाही करत. ते संसारात राहून साधना करत होते.
४. साधना चालू केल्यावर कुलदेवीचे दर्शन होणे
पू. आजोबांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना चालू केल्यावर केवळ ३ दिवसांतच त्यांची कुलदेवता श्री महाकालीदेवी हिने त्यांना सूक्ष्मातून दर्शन दिले होते. तेव्हापासूनच आजोबांची साधना जोमाने चालू झाली.