साधिकेच्या मोठ्या बहिणीला कर्करोगासारखा दुर्धर आजार झाल्यावर साधिका आणि तिचे कुटुंबीय यांनी अनुभवलेली गुरुकृपा !
‘एका नाडीवाचनात महर्षींनी गुरुदेवांविषयी लिहिले होते, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ज्या साधकाला आपले म्हटले, त्याचे कुटुंबीय आणि त्यांचे प्रारब्ध भोगून संपवण्याचे दायित्वही त्यांनी स्वतःवर घेतले आहे.’ साधकांनी याची प्रचीती अनेक वेळा घेतली आहे. आमच्या कुटुंबातही अशी एक घटना घडली आणि त्यातून गुरूंच्या कृपेने आम्ही बाहेर पडलो.
१. झालेला त्रास
१ अ. मोठी बहीण सौ. रजनी विनोद हिला कर्करोग झाल्याचे समजणे आणि कुटुंबियांना धक्का बसल्यासारखे होणे : वर्ष २०२० च्या गुरुपौर्णिमेच्या कालावधीत माझ्या मोठ्या बहिणीला( सौ. रजनी विनोद हिला) अकस्मात् रक्तस्राव होऊ लागला. एक आठवडाभर रात्री २ वाजता रक्तस्राव चालू व्हायचा आणि तो थांबतच नसे. तिला दुसर्या दिवशी रुग्णालयात घेऊन जावे लागायचे. आई, ताई ( सौ. रजनी विनोद) आणि ताईचा मुलगा देवनारायण हे थिरूवनंतपूरम् येथे रहातात. दळणवळण बंदीमुळे ताईला रुग्णालयात घेऊन जातांना अडचणी यायच्या. आधुनिक वैद्यांनी तिची कर्करोगाचे निदान करण्याची चाचणी (बायोप्सी) केली. १२.७.२०२० या दिवशी तिचा अहवाल (रिपोर्ट) मिळाला आणि ‘तिला कर्करोग आहे’, असे समजले. तिच्या या रोगाविषयी कळल्यानंतर आम्हा कुटुंबियांना धक्का बसल्यासारखे झाले. आमच्या मामीलाही फेब्रुवारी २०२० मध्ये कर्करोगाचे निदान होऊन तिच्यावर उपचार चालू होते. ताईच्या सगळ्या चाचण्या केल्यावर ‘रोग तिसर्या ‘स्टेज’ला आहे’, असे कळले. ‘कर्करोग गर्भाशयाच्या बाहेर पसरला आहे. यामध्ये जगण्याची शक्यता ५ वर्षांत ६० टक्के आहे’, असेही एका आधुनिक वैद्यांनी सांगितले.
२. अनुभवलेली गुरुकृपा
२ अ. कुटुंबियांनी स्थिर राहून साहाय्य करणे : आमची धाकटी बहीण सौ. संध्या गिरीश अमेरिकेत असते. धाकट्या बहिणीला तिच्या यजमानांनी आधार दिला आणि ‘ताईला आपण आर्थिक साहाय्य करूया’, असे सांगितले. ताईचा (मोठ्या बहिणीचा) मुलगा देवनारायण १७ वर्षांचा आहे. तो सध्या बारावी इयत्तेत शिकत आहे. तोे अभ्यास सांभाळून त्याच्या आईला सकारात्मक ठेवून आवश्यक ते साहाय्य करत होता. माझ्या आईची ‘या संकटकाळात गुरुदेव जवळ आहेत’, अशी श्रद्धा असल्याने ती स्थिर होती.
२ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी भ्रमणभाष करून आधार देणे : एक दिवस श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा मला भ्रमणभाष आला. त्या म्हणाल्या, ‘‘ताईला मंत्रजप करायला आणि सगळे ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकायला सांग. तिला त्यातूनच चैतन्य मिळेल. आपण प्रारब्ध टाळू शकत नाही; पण साधना केल्याने ते सुसह्य होईल.’’
२ इ. रुग्णालयात अनुभवलेली गुरुकृपा
२ इ १. रुग्णांच्या आर्थिक साहाय्यासाठी असलेल्या विभागाकडून ‘प्रत्येक रुग्णाला २ लक्ष रुपयांपर्यंत औषधोपचार निःशुल्क होऊ शकतात’, असे समजणे : २१.७.२०२० पासून एका रुग्णालयात ताईवर ‘रेडिएशन’ चालू झाले. ताईला ४ ‘केमोथेरपी’ आणि २६ ‘रेडिएशन’ घ्यायला सांगितले होते. ताईला प्रथम ‘केमोथेरपी’साठी रुग्णालयात नेल्यावर तेथे उपचार घेण्यासाठी आलेल्या एका बाईने रुग्णांना मिळत असलेल्या आर्थिक साहाय्याविषयी आम्हाला सांगितले. आम्ही तेथे रुग्णांच्या आर्थिक साहाय्यासाठी असलेल्या विभागात जाऊन चौकशी केल्यावर ‘प्रत्येक रुग्णाला २ लक्ष रुपयांपर्यंत औषधोपचार निःशुल्क होऊ शकतात’, असे समजले. आम्हाला गुरुकृपेने ही सुविधा मिळाली.
२ इ २. ताईने भ्रमणभाषवरून ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकल्याने तिच्या मनाची नकारात्मकता अल्प होणे : ‘केमोथेरपी’ झाल्यावर ताईला उलट्या होत असत. या वेळी तिने फलाहार आणि ‘सॅलॅड’ घेतले. ती प्रतिदिन त्रिफळा चूर्ण घ्यायची. तिने काळजी घेतल्यामुळे तिला फार त्रास झाला नाही. पहिली ‘केमोथेरपी’ झाल्यावर ‘उपचार पूर्ण होईपर्यंत जगूच शकणार नाही’, असे ताईला वाटायचे. दुसर्या ‘केमोथेरपी’च्या वेळी तिने ‘सलाईन’मधून देवाचे चैतन्य शरिरात जात आहे’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न केला. तिने प्रार्थना आणि मंत्रजप केला. ती भ्रमणभाषवरून ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकत असे. त्यामुळे तिच्या मनातील नकारात्मक विचार न्यून होत असत. ती प्रतिदिन सकाळी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे घेत असलेला भावसत्संग ऐकत असे. ताईवर पहिल्या टप्प्यातील उपचार पूर्ण झाल्यावर तिचा ‘एम्.आर्.आय.’ काढल्यावर आधुनिक वैद्यांनी ‘ताईमध्ये चांगला पालट आहे’, असे सांगितले.
२ इ ३. ‘ब्रेकीथेरपी’च्या वेळी पुष्कळ वेदना होणे, आईने घरी राहून नामजपादी उपाय केल्यावर ताई शांत होणे : त्यानंतर आधुनिक वैद्यांनी ‘ताईची २ वेळा ‘ब्रेकीथेरपी’ करावी लागेल’, असे सांगितले. ‘ब्रेकीथेरपी’च्या वेळी ताईला रुग्णालयात एक रात्र भरती केले होते. त्या वेळी ताईला पुष्कळ वेदना व्हायच्या आणि तिला रात्री झोप लागत नव्हती. तिला रात्रभर एकाच स्थितीत न हालता पडून रहावे लागायचे. आईने घरी राहून ताईसाठी नामजपादी उपाय केल्यावर ती शांत झाली. ताई हे सर्व गुरूंच्या अपार कृपेनेच सहन करू शकली.
२ इ ४. गुरुमाऊलीने पदोपदी सांभाळले असल्याची जाणीव होऊन पुष्कळ कृतज्ञता वाटणे : ताईचे उपचार पूर्ण झाल्यानंतर आधुनिक वैद्यांनी तिला ६ आठवड्यांनी तपासणीसाठी येण्यास सांगितले. आधुनिक वैद्यांनी ताईची तपासणी करून सांगितले, ‘‘आता सर्व ठीक आहे. तुम्ही पूर्वीसारखी सर्व कामे आणि व्यायाम करू शकता, तसेच तुम्ही गाडीही चालवू शकता.’’ तेव्हा ताई फार आनंदात होती. तिला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
३. मामीला कर्करोग झाल्यावर लाखो रुपये व्यय करूनही काही लाभ न होणे
माझ्या मामीला याच कालावधीत कर्करोग झाल्याने तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करायचे ठरवले. त्यासाठी लाखो रुपये व्यय झाले आणि ७ मासांत तिची स्थिती पुष्कळ बिकट होऊन तिचा मृत्यू झाला. मामांनी आयुष्यभरात कमावलेले सगळे धन खर्च झाले आणि त्यांना कर्ज घ्यावे लागले. त्यांची स्थिती पहाता ‘आम्हाला गुरुमाऊलीने पदोपदी सांभाळले’, याची जाणीव होते.
४. ताईला झालेले आध्यात्मिक त्रास
ताईला रात्री २ वाजण्याच्या सुमारास जाग येत असे. त्या वेळी तिला सूक्ष्मातून अनिष्ट शक्ती दिसायची. तेव्हा ताईच्या हृदयाची धडधड वाढून तिला रक्तस्राव चालू व्हायचा. असे आठवडाभर चालू होते. तिचे वजनही १० किलोने न्यून झाले होते. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा मला भ्रमणभाष आल्यापासून ताईला अनिष्ट शक्ती दिसणे बंद झाले. ताईने नामजपादी उपाय केल्याने तिचा आध्यात्मिक त्रासही न्यून झाला.
५. कुटुंबियांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये
५ अ. आई (श्रीमती सावित्री परमेश्वरन्) : माझी आई या सगळ्या प्रसंगात पुष्कळ स्थिर होती. तिची परात्पर गुरुदेवांवर अपार श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेच्या बळावरच ती सर्व सांभाळत होती.
५ आ. ताई (सौ. रजनी विनोद) : तिला तीव्र शारीरिक त्रास असूनही ‘माझी सेवा किंवा साधना यात खंड पडू नये’, असे तिला वाटायचे. माझा भ्रमणसंगणक बिघडल्यावर तिने तो लवकर दुरुस्त करून घेतला. ताई आता भाषांतराची सेवा करत आहे. तिला पुनर्जन्म मिळाल्यासारखे वाटत आहे.
५ इ. ताईचा मुलगा (देवनारायण ) : देवनारायण एक दैवी बालक आहे. आता तो बारावीत शिकत आहे. त्याला पुष्कळ अभ्यास असूनही तो आईसमवेत चिकित्सालयात जाणे, घरी भाजी किंवा अन्य साहित्य आणून देणे, आजीला घरकामात साहाय्य करणे, हे सगळे मनापासून करतो. तो स्वतःच्या वेळेचे नियोजन करून नियमित व्यायामही करतो. त्याला आईसमवेत चिकित्सालयात जावे लागले, तर तो तेथे बसूनही अभ्यास करतो, तसेच तो आईचे मनोबळ वाढवतो. तो आजीला सांभाळतो आणि मला काही अडचण असल्यास साहाय्य करतो. त्याच्या वयाच्या मानाने तो पुष्कळ स्थिर आहे. तो त्याच्या आईला सतत सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करतो.
५ ई. धाकटी बहीण आणि तिचे यजमान (सौ. संध्या आणि श्री. गिरीष शर्मा) : धाकटी बहीण आणि तिचे यजमान अमेरिकेत होते. (ऑक्टोबर २०२० मध्ये ते भारतात स्थलांतरित झाले.) ते अमेरिकेत असतांनाही त्यांच्या ओळखीच्या कर्करोगतज्ञांना विचारून आम्हाला साहाय्य करत होते. ते दोघे या प्रसंगात दायित्व घेऊन निर्णय घेत होते आणि आर्थिक साहाय्य करत होते. धाकट्या बहिणीला प्रत्येक प्रसंगात गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटत होती. या प्रसंगानंतर तिच्या साधनेच्या प्रयत्नांमध्ये सातत्य आले आहे.’
– कु. रश्मि परमेश्वरन्, कोची, केरळ. (१७.११.२०२०)
|