‘न भूतो न भविष्यति’ अशा झालेल्या वर्ष २०२० मधील गुरुपौर्णिमेच्या वेळी पुणे येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘सद्यःस्थितीत कोरोनामुळे दळणवळण बंदी असल्याने प्रतिवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमा सोहळ्यात सहभागी होता येणार का ?’, असे सर्वांना वाटत होते; मात्र अशा परिस्थितीत श्रीविष्णुरूपी कृपाळू गुरुमाऊलींच्या साधकांवर असलेल्या अपार प्रीतीमुळे प्रत्येक साधकाला या वर्षीची गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा अनुभव घेता आला. वर्ष २०२० मध्ये झालेल्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमेचा प्रत्येक साधकाने घरात राहून आनंद अनुभवला. गुरुपौर्णिमेच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ सेवांमध्ये, तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुणे येथील साधकांनी अनुभवलेला गुरुकृपेचा वर्षाव अनुभूतींच्या रूपात येथे देत आहोत.                              

(भाग १)

सौ. नीता विलास पाटील आणि श्री. विलास पाटील

१. गुरुपौर्णिमेचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम बघण्याची ओढ लागणे : ‘या वर्षीची गुरुपौर्णिमा वेगळी असणार आहे’, असे आम्हाला आधीपासून वाटत होते. ‘गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम ‘ऑनलाईन’ आहे’, असे समजल्यापासून ‘हा कार्यक्रम कसा असेल ?’ अशी मनाला ओढ लागून आनंद जाणवत होता.

२. आपत्काळ असूनही विविध सेवा मिळणे आणि ‘ऑनलाईन’ अर्पणाची सेवा नवीन असूनही ती शिकतांना ताण न येता कृतज्ञता वाटणे : गुरुपौर्णिमेच्या आधीपासून नातेवाइकांना ‘ऑनलाईन’ सत्संगाविषयी सांगणे, सर्वांना सत्संगाची लिंक पाठवणे, तसेच अर्पण मिळवण्यासाठी साहाय्य करणे इत्यादी सेवा होत्या. प्रतिवर्षीप्रमाणे सेवांची लगबग नव्हती, तरीही सेवा मिळून त्या करतांना मला पुष्कळ आनंद मिळाला. ‘ऑनलाईन’ अर्पणाची सेवा नवीन होती, तरीही ती शिकतांना कोणताही ताण आला नाही. ‘हे सर्व गुरुदेवांच्या कृपेने शिकता आलेे’, याविषयी आम्हाला कृतज्ञता वाटत होती.

३. ‘आपत्काळात कुठेही न जाता घरातच सेवा करा, मी तुमच्या घरीच सर्वांना आनंद द्यायला येत आहे’, असे गुरुमाऊली सांगत आहे’, असे जाणवणे आणि त्या वेळी आनंद होणे : गुरुपौर्णिमेच्या आधी २ दिवस मला मागच्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेच्या सेवा, नियोजन सर्व आठवत होते. ‘इतकी वर्षे साधकांना समाजात जाऊन, कधी पाऊस, तर कधी ऊन असतांना प्रसारसेवा करता येत होती; परंतु या वर्षी ‘आपत्काळात कुठेही न जाता शांतपणे घरातच सर्व सेवा करा. मी तुमच्या घरीच सर्वांना आनंद द्यायला येत आहे’, असेच जणू गुरुमाऊली सांगत होती. आम्हाला आतून आनंद होत होता.

४. गुरुमाऊलींच्या कृपेने गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी सर्व सिद्धता झाली. ‘सभागृहात होत असल्याप्रमाणेच घरात सोहळा करायचा’, असे आम्ही ठरवले. आम्ही पूजेची सिद्धता केली.

५. पूजेच्या ठिकाणी आम्ही ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ ठेवला. त्यातून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत होते.

६. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ गुरुपूजन करत असतांना ‘घरातच पूजा होत आहे’, असे आम्हाला वाटत होते.

७. ‘गुरुमाऊली आमच्यासमोर आहेत आणि आम्ही त्यांच्यासमोर बसून कार्यक्रम अनुभवत आहोत’, अशी आम्हाला अनुभूती येत होती.

८. नातेवाईक आणि यजमानांचे मित्र यांनी कार्यक्रम चांगला झाल्याचे सांगणे अन् त्यांनी गुरुमाऊलींना प्रथमच पाहिले असूनही त्यांना आनंद जाणवणे : आम्हाला सकाळपासून रात्रीपर्यंत आनंद जाणवत होता. गुरुपौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी नातेवाईक आणि यजमानांचे मित्र यांनी भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘आम्ही तुमचा कार्यक्रम पाहिला. कार्यक्रम फार चांगला होता.’’ त्यांनी प्रथमच गुरुमाऊलींना पाहिले होते, तरीही त्यांना आनंद जाणवत होता.

९. गुरुपौर्णिमेपूर्वी २ दिवस पाचव्या मजल्यावर असलेल्या घरात फुलपाखरू येणे आणि ते गुरुपौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी रात्रीपर्यंत भिंतीवर बसलेले दिसणे : गुरुपौर्णिमेच्या आधी २ दिवस एक फुलपाखरू अकस्मात् घरातील बैठककक्षात येऊन बसले होते. आमचे घर पाचव्या मजल्यावर असल्याने सहसा घरात कधी फुलपाखरू येत नाही; मात्र फुलपाखरू दुसर्‍या दिवशी रात्रीपर्यंत भिंतीवर बसून होते. ‘ते रात्री केव्हा गेले ?’, ते कळले नाही. देवाने ही आनंददायी अनुभूती दिली.

१०. कृतज्ञता : आधी आमचा कार्याकडे अधिक ओढा होता. आता आमचे साधनेचे प्रयत्न वाढल्यामुळे आम्हाला भाव अनुभवता येत आहे. ही सर्व गुरुमाऊलींची कृपा आहे. त्याविषयी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

११. प्रार्थना

सेवा करावी गुरुराज यांची ।
चिंता हरावी सकळही मनाची ॥

सांभाळ आमुचा बरवा करावा ।
आनंदमूर्ती मनी आठवावा ॥’

 सौ. राणी चिंचकर

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या रूपात साक्षात् महालक्ष्मी गुरुपूजन करण्यासाठी घरी आली आहे’, असे वाटणे आणि ‘महालक्ष्मीसहित गुरुदेव घरी आले’, असे जाणवून डोळ्यांत आनंदाश्रू येणे : प.पू. गुरुदेवांनी या वर्षी समाधान, भावजागृती, शांती, चैतन्य आणि आनंद असे सर्वकाही दिले. मी गुरुपौर्णिमेच्या आधी २ दिवस सोहळ्याची सिद्धता चालू केली. ‘अडथळे दूर होऊन मला सोहळ्यातून चैतन्य ग्रहण करता येऊ दे’, अशी माझ्याकडून प्रार्थना होत होती. प्रत्यक्ष सोहळा चालू झाल्यावर मी एकदम स्थिर होते. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, म्हणजे साक्षात् महालक्ष्मी गुरुपूजन करण्यासाठी माझ्या घरी आली’, असे मला वाटले. ‘गुरुदेव, माझी काही पात्रता नसतांना तुम्ही महालक्ष्मीसहित घरी आलात’, अशी माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होऊन माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.

सौ. योगेश्री घोळे

१. ‘मी सकाळी उठल्यापासून ‘प.पू. गुरुदेव येणार आहेत’, असा भाव ठेवून सर्व कृती करत असल्याने मला आनंद मिळत होता.

२. ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा सोहळ्यात श्री गुरुपूजन चालू असतांना आणि संध्याकाळच्या कार्यक्रमात प.पू. गुरुदेवांना बघून माझी पुष्कळ भावजागृती झाली.

३. मुलीला शारीरिक त्रास चालू झाल्याने ती जोरात रडू लागणे, तिला घरात मांडलेल्या पूजेसमोर नेऊन श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव यांच्या प्रतिमेला वाहिलेल्या फुलाने तिच्यावरील आवरण काढणे अन् त्यानंतर ती शांत होणे : कार्यक्रम आरंभ झाल्यावर माझी मुलगी चि. राधिका (वय ३ वर्षे) हिला अकस्मात् शारीरिक त्रास चालू झाल्याने ती जोरात आणि विचित्र रडत होती. ‘ती शांत होत नाही’, हे लक्षात आल्यावर तिला घरात मांडलेल्या पूजेसमोर घेऊन बसले. मी देवाला आर्ततेने प्रार्थना केली. मी राधिकाला विभूती लावली. श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव यांच्या प्रतिमेला वाहिलेल्या फुलाने तिच्यावरील आवरण काढले. तेव्हा ती ५ मिनिटांनी शांत झाली.

४. ‘अनिष्ट शक्ती मुलीला गुरुदेवांचे दर्शन घेण्यापासून परावृत्त करत असल्याने तिला त्रास होत आहे’, असे लक्षात येणे : ‘मला आबांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) बघायचे आहे’, असे म्हणून ती ध्वनीचित्र-चकती पाहू लागली. तिला प.पू. गुरुदेवांना बघायचे होते; पण अनिष्ट शक्ती तिला त्यापासून परावृत्त करत असल्याचे लक्षात येत होते; कारण तिच्यासाठी  आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर ती लगेच ओढीने ‘मला आबा आवडतात’, असे म्हणून कार्यक्रम पहात होती.’

श्री. वसाणे

१. ‘आतापर्यंत २० गुरुपौर्णिमा साजर्‍या केल्या; परंतु या वर्षी झालेली गुरुपौर्णिमा पुष्कळ चैतन्यमय वाटली.

२. गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवसापासूनच ‘प.पू. गुरुमाऊली घरी येणार आहे’, या भावाने सर्व कृती होत होत्या. मला कोणत्याही सेवेचा ताण आला नाही.

३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ गुरुपूजन करत होत्या. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात चैतन्य जाणवत होते.

४. प.पू. गुरुमाऊली घरी आल्याचे जाणवत होते. घरात सगळीकडे प्रकाश दिसत होता.’

(क्रमशः)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक