चाय पे चर्चा !
केंद्रीय मंत्रीमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यात ७ नवीन महिला मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या मंत्रीमंडळात आता एकूण ११ महिला आहेत. निरंजन ज्योती, रेणुका सिंह, निर्मला सीतारामन् आणि स्मृती इराणी या ४ महिला आधीपासूनच मंत्रीमंडळात आहेत, तर नवीन मंत्र्यांमध्ये अनुप्रिया पटेल, शोभा करंदळजे, दर्शना जरदोश, मीनाक्षी लेखी, अन्नपूर्णा देवी, प्रतिमा भौमिक आणि डॉ. भारती पवार यांचा समावेश आहे. या ११ महिला मंत्र्यांनी नुकत्याच निर्मला सीतारामन् यांच्या निवासस्थानी अनौपचारिक गप्पागोष्टी केल्या. केंद्रीय मंत्रीमंडळात एकाच वेळी इतक्या महिला मंत्री असणे ही विशेष गोष्ट आहे आणि त्यातही त्यांनी एकत्र येणे अन् अनौपचारिक संवाद साधणे, हे त्याहून अधिक मोठे आहे.
महिलांनी राज्यकारभार करण्याचा भारताचा जुना इतिहास आहे. इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान होत्या आणि त्यांनी एक युद्ध लढून पाकची फाळणीही केली, हे विशेष ! आताच्या मंत्रीमंडळामध्ये निर्मला सीतारामन् यांच्याकडे महत्त्वाचे म्हणजे अर्थमंत्रीपद आहे. या महिला शक्तीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि देशालाही अनेक अपेक्षा आहेत. डॉ. भारती पवार यांच्याकडे सध्या आरोग्य मंत्रालयाचे राज्यमंत्रीपद आले आहे. सध्या देशात कोरोनाच्या संकटात या मंत्रालयाचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळे डॉ. भारती पवार यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. हे आव्हान त्या स्वतः डॉक्टर असल्याने पेलतील, अशी अपेक्षा आहे. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाचे दायित्व स्मृती इराणी यांच्याकडे आहे. गेल्या २ वर्षांपासून त्यांच्याकडे हे पद आहे. त्यात त्या आणखी भरीव कार्य करतील. शोभा करंदळजे या प्रखर धर्माभिमानी आहेत. सामाजिक माध्यमांतून त्या सातत्याने हिंदु धर्मावर होणार्या आघातांच्या विरोधात आवाज उठवत होत्या. आता त्यांना कृषी राज्यमंत्री करण्यात आले आहे. गेले काही मास केंद्रशासनाने केलेल्या ३ कृषी कायद्यांना शेतकर्यांकडून विरोध होत आहे. शेतकर्यांच्या या विरोधाचा सामना करण्यासह नवे कायदे कार्यान्वित करण्याचा, त्यांतील अडचणी सोडवून शेतकर्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करंदळजे यांना करायचा आहे. प्रथमच एका महिला मंत्र्याला अशा प्रकारचे दायित्व मिळाले आहे. करंदळजे यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर धर्मरक्षणासाठी करावा, असेच हिंदूंना वाटते. ज्या गोष्टी पूर्वी अधिकार नसल्याने शक्य होत नव्हत्या, हिंदूंना न्याय देऊ शकत नव्हत्या, त्या गोष्टी आता त्या मंत्रीपदाच्या अधिकारातून करू शकतात. मीनाक्षी लेखी या अधिवक्त्या आहेत. ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात, तसेच धर्मांतराच्या विरोधात त्यांनी हिंदूंची नेहमीच बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या राज्यमंत्री बनवण्यात आले आहे. मोदी सरकारच्या मागील कार्यकाळात सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्रालयाच्या कॅबिनेट मंत्री होत्या. त्यांनी या पदाला पूरक असे कार्य केले होते. मीनाक्षी लेखी विदेशातील विशेषतः इस्लामी देशांतील, उदा. पाकिस्तान, बांगलादेश येथील हिंदूंना न्याय देण्याचा प्रयत्न करतील, अशी हिंदूंना अपेक्षा आहे. त्यासाठी त्यांना कठोर व्हावे लागणार आहे. पाकमधील हिंदु मुलींचे होणारे अपहरण, धर्मांतर आणि धर्मांधांशी होणारे विवाह रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवेत. त्यांच्यातील कणखरपणा आणि कायद्याचा अभ्यास त्यांनी येथे दाखवला पाहिजे. त्यासाठी त्यांना पंतप्रधान मोदी यांचे समर्थन मिळेल, अशी अपेक्षा करता येईल. काही ठिकाणी महिलाही पुरुषांप्रमाणे लाचखोरी, घोटाळे आणि भ्रष्टाचार करतांना आढळून येतात. मोदी यांच्या मंत्रीमंडळात मंत्र्यानी भ्रष्टाचार केल्याचे गेल्या ७ वर्षांत एकही उदाहरण समोर आलेले नाही आणि पुढेही भ्रष्टाचार होणार नाही, अशीच अपेक्षा आहे. त्यामुळे या महिला मंत्र्यांनाही निष्कलंक कार्य करावे लागणार, हेही महत्त्वाचे आहे.
हिंदु धर्मासाठी कार्य करणे आवश्यक !
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी राज्यकारभार केला. त्यांचा आदर्श समोर ठेवण्याची आवश्यकता आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. स्वतःच्या मंत्रालयाचा वापर अधिकाधिक हिंदु धर्मासाठी कसा होईल, हे या महिला मंत्र्यांनी पहायला हवे. या महिला मंत्र्यांकडे महत्त्वाची खाती आहेत. त्यावर त्यांनी त्यांच्या कामाची छाप पाडावी आणि देश अन् धर्म यांसाठी कार्य करावे, अशीच अपेक्षा करता येईल. अल्पसंख्यांक मंत्रालयाचे मंत्री मुसलमानांसाठी भरीव कार्य करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या खात्याची आर्थिक तरतूद पूर्णपणे कशी व्यय होईल, याचा ते विचार करतात आणि त्यात यशस्वीही होतात. तो प्रयत्न या महिलांनीच नव्हे, तर सर्वच मंत्र्यांनी करायला हवा, असेच हिंदूंना वाटते. हिंदु म्हणून हिंदूंना कुठलेच लाभ मिळत नाहीत; मात्र अल्पसंख्यांकांना त्यांच्या धर्माच्या आधारे विविध लाभ दिले जातात, हे निधर्मी भारताला शोभत नाही. त्यातही केंद्रातील भाजप शासनाने हा पूर्वपार चालत आलेला प्रकार आतातरी थांबवायला हवा आणि हिंदूंनाही न्याय देण्याचा, सुविधा देण्याचा प्रयत्न करावा, असेच बहुसंख्यांक हिंदूंना वाटते. महिला मंत्र्यांपैकी अनुप्रिया पटेल या भाजपच्या नसून अपना दल या पक्षाच्या खासदार आहेत. त्यांच्याकडून हिंदु धर्मासाठी कार्य करण्याची अपेक्षा करता येणार नाही, असे म्हणता येणार नाही. त्यांनी एक हिंदु म्हणून त्यांचे कर्तव्य पार पाडले पाहिजे. मंत्रीमंडळाच्या एकूण विस्तारामध्ये ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात केवळ ७ महिला मंत्री आहेत, तर उर्वरित पुरुष मंत्री आहेत. यात भाजपच्या व्यतिरिक्त त्यांच्या मित्र पक्षांचेही मंत्री आहेत. त्यांच्याकडून हिंदु धर्मासाठी कार्य करण्याची अपेक्षा हिंदूही करणार नाहीत; कारण हे पक्ष स्वतःला धर्मनिरपेक्षतावादी म्हणवून घेत असतात आणि लांगूलचालनाचे राजकारण करण्यात पुढे असतात. सत्तेसाठी आणि काँग्रेस नको म्हणून त्यांनी भाजप आघाडीला साथ दिली आहे. सरकारकडे बहुमत आहे. त्यामुळे अशा मंत्र्यांनीही हिंदूंसाठी कार्य करण्याचा आदेश त्यांना भाजपकडून देता येऊ शकतो. एकूणच महिला असो कि पुरुष मंत्रीमंडळातील प्रत्येक मंत्र्याने राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे.