परभणी येथे ढगफुटी सदृश पाऊस;
पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला !
परभणी – ११ जुलै या दिवशी शहरासह जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यातील पाणी शहरात शिरल्याने शेकडो घरातील साहित्य वाहून गेले आहे, तसेच जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आल्याने रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. सखल भागातील शेतांना नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे कोवळी पिके आता सडण्याची भीती व्यक्त होत आहे.
मराठवाडा कृषी विद्यापिठाच्या हवामान विभागाने १२ जुलै या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत २३२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद केली आहे. ही अतीवृष्टी नव्हे, तर ढगफुटी होती, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. नालेसफाई नसल्याने नाल्यांमधून पाण्याचा निचरा होत नव्हता. त्यामुळे कित्येक घंटे हे पाणी रस्त्यावर साचून राहिले.
येथील रेल्वे स्थानकाच्या ठिकाणचे रेल्वे मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे पोखर्णी रेल्वे स्थानकावर बेंगळुरू एक्सप्रेस दीड घंटा अडकून पडली होती. अन्य रेल्वे गाड्या विलंबाने धावत होत्या. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रात्री विलंबापर्यंत प्रशासनासमवेत सामाजिक कार्यकर्ते युद्धपातळीवर साहाय्य कार्यात गुंतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. परभणी तालुक्यातील मिरखेलजवळ पुरात अडकलेले ६ पुरुष, ५ महिला आणि १० बकरे यांची जिल्हा प्रशासनाने अन्य यंत्रणांच्या साहाय्याने सुटका केली.
कोकणासह पुणे आणि सातारा येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता !
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून पुढील ५ दिवस राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह पुणे आणि सातारा या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने याविषयी ११ जुलै या दिवशी ‘ॲलर्ट’ लागू केला होता. कोकण आणि मध्य महाराष्ट्र यांसाठी पुढील ५ दिवस ‘रेड ॲलर्ट’, तर मुंबई शहर आणि उपनगर यांसाठी ४ दिवस ‘ऑरेंज ॲलर्ट’ लागू केला आहे.