गोव्यातील संचारबंदीत १९ जुलैपर्यंत वाढ
मर्यादित उपस्थितीत धार्मिक स्थळे, निम्म्या क्षमतेने व्यायामशाळा (जीम) आणि प्रेक्षकांविना क्रीडा संकुले खुली करण्यास मान्यता
पणजी, ११ जुलै (वार्ता.) – गोवा शासनाने राज्यव्यापी संचारबंदीत आणखी १ आठवड्याने वाढ केली आहे. संचारबंदी १९ जुलै या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्वीट करून ही घोषणा केली.
राज्यशासनाने संचारबंदीत आता पुढीलप्रमाणे सूट दिली आहे. मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे आदी कोरोना प्रतिबंधासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून अधिकाधिक १५ व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये धार्मिक स्थळे चालू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रक्षेकांविना ‘इनडोअर’ किंवा अन्य क्रीडा संकुले, तसेच मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून निम्म्या क्षमतेने व्यायामशाळा (जीम) खुली करण्यास मान्यता देण्यात आली आहे. गोव्यात ९ मेपासून संचारबंदी लागू आहे आणि वेळोवेळी संचारबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता देऊन तिचा कालावधी वाढवला जात आहे.
दिवसभरात १३१ नवीन कोरोनाबाधित, तर २ मृत्यू
११ जुलै या दिवशी दिवसभरात कोरोनाविषयक ४ सहस्र १९७ चाचण्या करणयात आल्या. यांपैकी १३१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण ३.१ टक्के आहे. दिवसभरात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात २४१ रुग्ण बरे झाले. प्रत्यक्ष उपचार घेणार्या रुग्णांची संख्या १ सहस्र ८४८ आहे.