आडाळी (तालुका दोडामार्ग) येथील औद्योगिक क्षेत्राला चालना मिळणार
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट
दोडामार्ग – तालुक्यातील आडाळी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (‘एम्.आय.डी.सी.’च्या) औद्योगिक क्षेत्राला चालना मिळणार असून केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी याविषयी सकारात्मकता दाखवली आहे. ‘राज्यशासनाशी चर्चा करण्यात येईल. त्यांनी प्रतिसाद न दिल्यास केंद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी उद्योग आणले जातील’, असे आश्वासन राणे यांनी दिल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संजना सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण सभापती शर्वाणी गावकर, माजी अध्यक्ष संदेश सावंत आणि कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या शिष्टमंडळाने देहली येथे जाऊन केंद्रीय मंत्री राणे यांची भेट घेतली. या वेळी राणे यांच्याशी आडाळी येथील औद्योगिक क्षेत्राविषयी चर्चा करण्यात आली.