कोकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊया ! – नारायण राणे, केंद्रीय मंत्री

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या ‘सागररत्न’ या सुसज्ज मत्स्य बाजारपेठेचे लोकार्पण

नारायण राणे

वेंगुर्ला – सर्वपक्षीय नेते एकत्र आल्यास विकास दूर नाही. त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आणि पर्यायाने कोकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊया. मला मिळालेल्या मंत्रीपदाचा लाभ निश्चितच कोकणच्या विकासासाठी करीन, अशी ग्वाही केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी येथे दिली.

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ‘सागररत्न’ या सुसज्ज मत्स्य बाजारपेठेचा लोकार्पण सोहळा ११ जुलैला पार पडला. या कार्यक्रमास भाजपचे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे ‘ऑनलाईन’उपस्थित होते, तर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी आदी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.

या वेळी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले, ‘‘वेंगुर्ल्याच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी नक्कीच उपलब्ध करून दिला जाईल. भविष्यात वेगवेगळ्या योजना आहेत, त्यांना साहाय्य करण्याचा माझा प्रयत्न असेल.’’

या वेळी खासदार राऊत म्हणाले, ‘‘वेंगुर्ले नगरपरिषदेने वैभव उभे केले आहे. सरकार निधी देत असते; मात्र त्याचा सदुपयोग करणाराही तेवढाच खंबीर असावा लागतो.’’ त्यांनी वेंगुर्ले नगरपरिषदेच्या कार्याचे कौतुक केले.

कोकणच्या विकासासाठी एकत्र येण्याची वेळ आल्यास आम्ही सर्व लोकप्रतिनिधी खांद्याला खांदा लावून यापुढे काम करू, असे आमदार राणे यांनी या वेळी सांगितले.  या वेळी अन्य मान्यवरांनीही त्यांचे विचार मांडले.